पती- पत्नीतील वादाचा फायदा उठवून झेडपीच्या कर्मचाऱ्याने केला बलात्कार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • पती- पत्नीतील वादाचा फायदा उठवून लग्नाचे व नोकरीचे आमिष दाखवून डिसेंबर 2017 ते जुलै 2019 दरम्यान वेळोवेळी बलात्कार केल्याची फिर्याद आज शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा - पती- पत्नीतील वादाचा फायदा उठवून लग्नाचे व नोकरीचे आमिष दाखवून डिसेंबर 2017 ते जुलै 2019 दरम्यान वेळोवेळी बलात्कार केल्याची फिर्याद आज शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. गोपीचंद तानाजी पवार (रा. अमरलक्ष्मी स्टॉप, एमआयडीसी, सातारा) असे तक्रार झालेल्याचे नाव असून, तो जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. 

फिर्यादी महिलेने या संदर्भात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की लग्नानंतर आमच्या दोघांत सतत भांडणे होत होती. त्यामुळे मी माहेरी सातारा येथे जात होती.

लग्नापूर्वी माझी गोपीचंद पवार याच्याशी ओळख होती. डिसेंबर 2017 मध्ये पतीशी भांडण झाल्याने मी माहेरी आल्यावर गोपीचंदने फोन करून "तुझे तुझ्या नवऱ्याबरोबर पटत नाही, मला माहीत आहे. तू त्याच्याबरोबर राहू नकोस.

माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझा व तुझ्या मुलांचा सांभाळ करेन व तुला नोकरी देखील लावून देईन,' असे आमिष दाखवून इच्छा नसताना जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तो माझ्याशी जबरदस्ती करू लागला. त्याला "माझा घटस्फोट झाला आहे. आता तू माझी व माझ्या मुलांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार हो, असे म्हटल्यावर त्याने "तुझा माझा काही संबंध नाही. मी तुझी जबाबदारी स्वीकारणार नाही,' असे बोलून टाळले. त्यानंतर त्याने भेटण्याचे सतत टाळले. त्यामुळे ही तक्रार दिल्याचे म्हटले आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News