जि.प. शाळेवर बहिष्कार कायम; शाळेत आलेल्या दहा मुलांना पालकांनी परत नेले

मंगेश शेवाळकर
Saturday, 29 June 2019
  • विद्यार्थ्यांना  बसण्यासाठी आठ खोल्या आहेत.
  • बहुतांश खोल्यांच्या भितींना तडे गेले आहेत.
  • टीनपत्रे पावसाळ्यात गळत आहेत.
  • तीन खोल्यांवरील टीनपत्रे उडून गेली आहेत.

हिंगोली: सेनगाव तालुक्यातील जामदया येथील जिल्हा परिषद शाळेवर पालकांनी टाकलेला बहिष्कार कायम 
असून शनिवारी (ता.२९) शाळेत आलेल्या दहा मुलांना पालकांनी परत नेले आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागासमोर पेच निर्माण झाला  आहे. 

सेनगाव तालुक्यातील जामदया येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत  शाळा असून या ठिकाणी १३८ विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना  बसण्यासाठी आठ खोल्या आहेत. मात्र बहुतांश खोल्यांच्या भितींना तडे गेले आहेत. या शिवाय टीनपत्रे पावसाळ्यात गळत आहेत. शिवाय तीन खोल्यांवरील टीनपत्रे उडून गेली आहेत. आता 
पावसाळ्यात शाळेची भिंत कोसळून दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल करीत पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पालकांनी  शुक्रवारपासून (ता.२८) शाळेवर बहिष्कार टाकला आहे.  

दरम्यान, गावकऱ्यांच्या या निर्णयानंतर शाळा प्रशासनाने तातडीने या  प्रकाराची माहिती पंचायत समिती व जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पाठवली आहे. त्यानंतर शुक्रवारी (ता.२८) सेनगावचे  गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली.  त्यानंतर काही पालकांशी संवादही साधला. शाळेच्या पाहणी नंतर बऱ्यापैकी असलेल्या तीन खोल्यांमधे विद्यार्थी बसविण्याच्या सुचना  त्यांनी केल्या. तर पाच खोल्या पाडण्याबाबत ग्रामपंचायतीचा ठराव  पाठविण्याचेही त्यांनी कळविले आहे. 

दरम्यान, शनिवारी (ता.२९) सकाळी दहा विद्यार्थी शाळेत आले होते. मात्र काही वेळातच त्यांच्या पालकांनी त्यांना परत नेल्याने शिक्षकांना शाळेच्या वेळेत रिकामे बसावे लागले आहे. वरिष्ठ अधिकारी आल्या शिवाय बहिष्कार मागे घेणार नाही अशी भुमीकाही पालकांनी घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळ मिळेना 
जामदया शाळेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासन मुग गिळून गप्प आहे. विशेष म्हणजे  वरिष्ठ अधिकारी दोन दिवसांपुर्वीच सेनगावच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी 
जामदया शाळेला भेट दिली असती तर हा प्रश्न मार्गी लागला असता. मात्र गुणवत्ता वाढीच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना  यावरून गुणवत्ता वाढीची किती काळजी आहे हे दिसून येत  असल्याच्या तिखट प्रतिक्रिया पालकांतून व्यक्त होत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News