तरुणांनो, व्यासंग वाढवा ज्ञाननिष्ठा घेऊन जीवनाचा प्रवास करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा सल्ला अमृतमहोत्सवानिमित्ताने सत्कार
 

लातूर : जुनी पिढी म्हणते, आजचा तरुण वर्ग बिघडला आहे. पण या टिकेशी मी पूर्ण सहमत नाही. आजचे अनेक तरुण विविध क्षेत्रात आपले कर्तव्य बजावत आहेत. हे चित्र समाधानकारक आहे; पण प्रमाण समाधानकारक नाही. त्यामुळे आजच्या तरुणांनी अधिक कष्ट घ्यायला हवेत. व्यासंग वाढवावा. आजूबाजूच्या घटनांकडे डोळसपणे पहावे. ज्ञाननिष्ठा घेऊन जीवनाचा प्रवास कसा होईल, याचा विचार करावा, असा सल्ला ज्येष्ठ विचारवंत-साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी तरुणांना दिला.

साहित्य क्षेत्रात वेगळी मुद्रा उमटवलेल्या डॉ. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवानिमित्ताने खास सत्कार सोमवारी (ता. 8) करण्यात आला. संविधानाची प्रत, महात्मा फुलेंची पगडी, तुळशीची माळ आणि मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते. तरुणांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या अमृतमहोत्सव समितीतर्फे हा सोहळा आयोजिण्यात आला होता. या सोहळ्यास माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, लेखक श्रीकांत देशमुख उपस्थित होते.

विविधतेमध्ये असंख्य स्तर आहेत. जात, धर्म, पंथ, पेहराव, संस्कृती, आहार-विहार अशा विविध स्तरातील लोकांना जोडण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करत आलो. ही विविधता जपण्याची आज जास्त गरज आहे. विविधतेने आपल्याला कुरूप बनवले नाही. ती समाजाची त्रुटी नाही. कलंकही नाही. ही विविधताच आपल्या समाजाचे खरे सौंदर्य आहे. भूषण आहे. त्यामुळे संघर्षाच्या नव्हे सलोख्याच्या, माणसे तोडण्याच्या नव्हे जोडण्याच्या मार्गाने आपल्याला पुढे जावे लागेल.

डॉ. साळुंखे म्हणाले, वारकरी संप्रदायाचा वारसा घेऊन मी वाढत गेलो. स्वतःचा विकास साधत गेलो. एका टप्प्यावर मला चार्वाक भेटला. त्यानंतर चार्वाक तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 'आपले आयुष्य ललित साहित्यासाठी खर्ची करायचे नाही', हे मी ठरवले. खरतर चार्वाकाने मला अत्यंत आवडीच्या अशा ललित साहित्यापासून पळवून नेले. पण याची मनात खंत नाही. 

डोळस राहणे गरजेचे 
जीवनात सत्य-असत्य, हितकारक-अहितकारक मिसळून आलेले असते. नेमकेपणाने जे हिताचे, ज्ञानाचे, प्रकाशाचे आहे, ते वेचून घेणे, त्यासाठी जागरूक राहणे, डोळस राहणे गरजेचे आहे. कुठलीही गोष्ट स्वीकारताना स्वतःचा अनुभव महत्वाचा असतो. तो घ्या. मेंदू धारण करणाऱ्या माणसाला आपले डोके सत्यापुढे झुकवायचे की असत्यापुढे, याचा अधिकार आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे जायचे असेल तर बुद्धीचा स्वतंत्रपणे उपयोग करायचा असतो, हे मी शिकलो, असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले. विवेक सौताडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News