एक ऑगस्टपासून राज्यात युवा जागर; महाराष्ट्रावर बोलू काही

सुहास सदाव्रते 
Thursday, 25 July 2019
  • नऊ हजार कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा सहभाग

जालना: युवानेतृत्व कौशल्य गुण विकसित व्हावा यासह राष्ट्रीय व राज्य विकास प्रक्रियेत युवावर्गास सामावून घेण्यासाठी राज्यात महाराष्ट्रावर बोलू काही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एक ऑगस्टपासून कनिष्ठ महाविद्यालयीन युवक वक्तृत्व स्पर्धातून राज्यात युवा जागर मांडणार आहे, हे विशेष. 

राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे महाराष्ट्रावर बोलू काही हा युवा जागर कार्यक्रम एक ऑगस्टपासून सुरू होत आहे. बुधवारी (ता 24) दुपारी 2.30 वाजता व्हीडीओ कॉन्फरन्सदारे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी राज्यातील शिक्षणाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना युवा जागर कार्यक्रमाबाबत सूचना दिल्या आहेत. राज्यातील 9 हजार 700 कनिष्ठ महाविद्यालयातील लाखो विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे.

महाविद्यालय, तालुका व जिल्हा तसेच राज्यस्तरावर या स्पर्धा होतील. राज्यात एक ते आठ ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयस्तर, तालुकास्तरवर नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान स्पर्धा होतील. जिल्हास्तरावर 16 ते 25 ऑगस्ट तर राज्यपातळीवर 26 ते 30 ऑगस्ट दरम्यान स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री शेलार यांनी सांगितले.

तालुकास्तरावर तीन हजार, दोन हजार, एक हजार, जिल्हास्तरावर 10 हजार, सात हजार व 5 हजार असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. राज्य पातळीवर पहिले पारितोषिक हे एक लाख रूपये असून दुसरे 75 हजार तर तिसरे बक्षीस 50 हजार रूपये ठेवण्यात आल्याची माहितीही शिक्षणमंत्री यांनी दिली. वक्तृत्व स्पर्धा ही मराठी भाषेतूनच होणार असून एखाद्या विद्यार्थ्यांनी हिंदी वा इंग्रजी भाषेतून विचार मांडले असतील तर ते ग्राह्य धरण्यात यावेत अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. 

कनिष्ठ महाविद्यालयास्तरावर वक्तृत्व स्पर्धाच्या माध्यमातून प्रधानमंत्री-जन-धन योजना, स्वच्छ भारत, आयुष्यमान भारत, पीक विमा, जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री, पंतप्रधान ग्रामसडक योजना अशा विविध 14 योजना आदी विषयावर स्पर्धकांना आपले विचार मांडणे बंधनकारक आहे. प्रत्येक तालुक्यातून जिल्हाफेरीसाठी तीन स्पर्धक निवडले जातील. जिल्हाफेरीत पहिले तीन स्पर्धक हे राज्यफेरीसाठी पात्र असतील.

जालना जिल्हयातील दोनशेपेक्षा अधिक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी युवा जागर कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या स्पर्धासाठी जिल्हा नियोजन समितीही गठित करण्यात आली आहे.

-मंगल धुपे, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जालना 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News