‘यूथ इन्स्पिरेटर्स अवॉर्ड’ने युवा सेवाव्रतींचा सत्कार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या युवकांचे कौतुक व्हावे आणि अन्य युवकांनाही सकारात्मक कामाची प्रेरणा मिळावी, या हेतूने दरवर्षी ‘यिन समर यूथ समिट’मध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.

नागपूर - ध्येयाने झपाटून समाजासाठी काही देणे लागते या भावनेने काम करणाऱ्या सहा युवा सेवाव्रतींचा ‘यिन यूथ इन्स्पिरेटर्स अवॉर्ड’ने बुधवारी (ता. १२) कविवर्य सुरेश भट सभागृहात सत्कार करण्यात आला. डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे आयोजित ‘यिन समर यूथ समिट’मध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात पुरस्कार वितरण झाले. 

विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या युवकांचे कौतुक व्हावे आणि अन्य युवकांनाही सकारात्मक कामाची प्रेरणा मिळावी, या हेतूने दरवर्षी ‘यिन समर यूथ समिट’मध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वनराईचे डॉ. गिरीश गांधी, गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त नीलेश भरणे, सकाळचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, जे. डी. कॉलेजचे संचालक अविनाश दोरसटवार, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच माजी आमदार मोहन मते आणि सकाळ कम्युनिटी नेटवर्कचे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी  उपस्थित होते.

यावेळी दारूबंदीसारख्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनीषा काटे, नेतृत्व गुणासाठी निखिल आष्टणकर आणि युवा उद्योजक राहुल जवादे यांना डॉ. गिरीश गांधी यांच्या  हस्ते अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे यांच्या हस्ते विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या धम्मदीपक वाघमारे, जे. डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक अविनाश दोरसटवार यांच्या हस्ते  शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारा पीयूष आंबटकर आणि सांस्कृतिक क्षेत्रातील युवा कलाकार शिल्पा ठाकरे हिचा तेजस गुजराथी यांच्या हस्ते अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अवॉर्ड विजेत्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सकाळच्या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News