तरुणांनो, स्वत:च्या घरातूनच क्रांती घडवा : दुर्गा गुडीलू 

सोनल मंडलिक (सकाळ वृत्तसेवा-यिनबझ)
Thursday, 18 April 2019

आजच्या तरुणांच्या हाती आपल्या देशाची सत्ता आहे. त्यामध्ये ते नक्कीच बदल घडवू शकतात. खरी क्रांती ही आपल्या घरातूनच सुरू होत असते. समाजातील विविध प्रश्‍नांना वाचा फोडून क्रांती करायची असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरापासून करावी. घरातील स्त्रीला सन्मान, स्वातंत्र्य, समानतेची वागणूक द्या, त्याचेच परिवर्तन समाजात दिसेल, असे मत दुर्गा गुडीलू यांनी व्यक्त केले. "सकाळ माध्यम समूहा'च्या "यिन-बझ'च्या "तरुणाईचे आयडॉल'मध्ये चर्चा करताना दुर्गा यांनी समाज, महिला आणि तरुणाई अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. 

आजच्या तरुणांच्या हाती आपल्या देशाची सत्ता आहे. त्यामध्ये ते नक्कीच बदल घडवू शकतात. खरी क्रांती ही आपल्या घरातूनच सुरू होत असते. समाजातील विविध प्रश्‍नांना वाचा फोडून क्रांती करायची असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरापासून करावी. घरातील स्त्रीला सन्मान, स्वातंत्र्य, समानतेची वागणूक द्या, त्याचेच परिवर्तन समाजात दिसेल, असे मत दुर्गा गुडीलू यांनी व्यक्त केले. "सकाळ माध्यम समूहा'च्या "यिन-बझ'च्या "तरुणाईचे आयडॉल'मध्ये चर्चा करताना दुर्गा यांनी समाज, महिला आणि तरुणाई अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. 

दुर्गा यांनीही घरातून क्रांती करून वैदू समाजात अशाच रीतीने परिवर्तन घडविले आहे. दुर्गा आपल्या बालपणाबद्दल म्हणाल्या की, मी अनेक वर्षांपासून जोगेश्‍वरी येथील संजयनगरमध्ये राहते. आमच्या वैदू समाजात जेवण बनविण्याची परंपरा नव्हती. आम्ही भीक मागून जेवायचो. मी स्वत: सातवीपर्यंत लोकांच्या घरी जाऊन भिक्षा मागितली आहे. आमच्या घराच्या जवळच युवा संस्थेची बालवाडी होती. त्या मुलांना शाळेत शिकताना पाहून आम्हीही दुरून पाहायचो. त्या वेळी युवा संस्थेने गावातील मंदिरात आमच्यासाठीही बालवाडी उघडली. मी माझी बहीण आणि इतर मुलेही तिथेच शिकू लागलो. याच संस्थेने आम्हाला एका शाळेत दाखला मिळवून दिला; पण तिथेही आम्ही भीक मागतो म्हणून आम्हाला जमिनीवर आणि इतर मुलांना बेंचवर बसवले जायचे. आमच्या डब्यात भीक मागून आणलेली चपाती आणि शिळा भात असायचा, ते पाहून कोणीच आमचा डबा खात नसे. काही वेळा तर आम्ही आमच्या वर्गातील मुलांच्याच घरी भीक मागायला पोहोचायचो, त्यांना पाहून आमचीच आम्हाला लाज वाटायची. 

दुर्गा पुढे म्हणाल्या की, आम्ही ज्या झोपडपट्टीत राहतो, त्याला डबेवाल्यांची चाळ म्हणूनच ओळखले जाई. त्या वेळी "युवा' नावाच्या संस्थेने प्रथमच आमच्या वंचित समाजासोबत काम करायला सुरुवात केली. "युवा' संस्थेचे काम हे इतर एनजीओप्रमाणे सर्व्हिस बेस नव्हते; तर राईट बेस होते. त्यामुळे सुरुवातीपासून अधिकार, हक्क याची जाणीव या कार्यकर्त्यांनी आम्हाला करून दिली. माझ्या अगोदरची पिढी ही पूर्ण अशिक्षित! माझी बहीण वैदू समाजातील पहिलीच उच्चशिक्षित मुलगी आहे. इथूनच आम्हाला नवी ओळख मिळायला सुरुवात झाली. बाल सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत मी असल्याने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ५४ कलमी अधिकारानुसार आम्हा मुलांचे मुंबईभर एक मोठे संघटन युवाने तयार केले. यामार्फत विविध कार्यक्रम हाती घेतले गेले. या सर्व गोष्टींमुळे माझे मानसिक बळ वाढविण्यासाठी मदत झाली. "युवा'च्या सामाजिक कार्यकर्त्यांचा मला माणूस म्हणून घडविण्यात मोलाचा वाटा आहे. या संस्थेमार्फत मला ब्राझील येथे भारताच्या मुलांची प्रतिनिधी म्हणून ज्या चार मुली भारतातून गेल्या त्यात जाण्याची संधी मिळाली. "वर्ल्ड सोशल फोरम' हा सगळ्या जागतिक एनजीओंचा एक मोठा कार्यक्रम प्रथमच "युवा' संस्थेच्या मिनार पिंपळेंनी भारतात भरवला होता. त्याला प्रचंड यश मिळाले. त्यानंतर दुसरा "वर्ल्ड सोशल फोरम' हे ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आले. या सामाजिक महोत्सवामध्ये भारतातून वेगवेगळ्या वंचित समाजातून विविध प्रश्‍न घेऊन वेगवेगळे प्रतिनिधी एकत्रित आले होते. मी भारतातील मुलांच्या प्रश्‍नांविषयी माझी मते, भारतीय मुलांची सद्यस्थिती मांडून आले. 

जातपंचायतीपासून मुक्ती मिळविण्याची सुरुवात कशी झाली, याबाबत दुर्गा म्हणाल्या, ज्या वेळी माझ्या कुटुंबाला या जातपंचायतीचा फटका बसला, त्या वेळी संघर्ष करताना आम्हाला जातपंचायतमुक्त समाजाचा मार्ग सापडला. माझी मोठी बहीण गोविंदी हिचे लग्न आईच्या पोटात असतानाच मामाच्या मुलाशी ठरले होते. गोविंदी पोटात असतानाच आईने मामला वाचन दिले होते की, मुलगी झाली तर तुझ्या मुलाशी लग्न लावून देईन. यात काही नवीन नव्हते; मात्र आमच्या समाजातील इतर मुलींसारखी गोविंदी अशिक्षित राहिली नाही, ती सॉफ्टवेअर इंजिनिअर झाली. मामाचा मुलगा मात्र आठवी नापास, वैदूचा धंदा करत होता. बहिणीला साहजिकच ते पसंत नव्हते; मात्र आईचा हट्ट होता की, मामाच्या मुलाशीच लग्न व्हावे. त्यामुळे गोविंदीही आईच्या हट्टामुळे साखरपुड्याला तयार झाली; मात्र मुलाने वैदू धंदा सोडून किमान चार हजार वेतन मिळेल असे काम पुढील सहा महिन्यांत करावे, अशी अट घातली; मात्र तो काही ते काम करायला तयार नव्हता. त्यामुळे मी मामाच्या कुटुंबाला आणि दोन पंचांनादेखील बोलावले आणि सगळा प्रकार सांगितला. ते लग्न तिथेच मोडले; मात्र मामाचा मुलगा आणि समाजातील काहींनी आमच्यावर राग ठेवला होता. त्याचा परिणाम असा झाला की, समाजातील बोगस वैदूंचा धंदा करणाऱ्यांना मी पकडून देते, असा खोटा प्रचार केला गेला. यावर जातपंचायत बसली. सुरुवातीला आमच्याकडून २५ हजार रुपये पंच बसविण्यासाठी घेतले गेले. त्यानंतर ५० हजार रुपये मागण्यात आले; मात्र आपण समाजाच्या विरोधात काही केले नाही.

त्यामुळे दंडही नाही द्यायचा आणि माफीही मागायची नाही, यावर मी ठाम होते. माझे आई-बाबा समाजाच्या दबावाखाली होते; पण मी वैदू समाजाच्या ३५० घरांमध्ये राहणाऱ्या पुरुषांच्या विरोधात आवाज उठवला. आम्हाला त्या वेळी समाजातून बहिष्कृत करण्यात आले. शेवटी दंड म्हणून आमच्याकडून २५  हजार रुपये घेतले गेले. त्यानंतर मोठी पंचायत बसेल ज्यासाठी ३ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्या वेळी माझ्या आई-वडिलांनी रडून-रडून त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मी माझ्या पत्रकार सहकार्यासोबत पंचांना भेटायला देखील गेले; मात्र पंचांनी आम्ही दिलेल्या पैशांची उधळपट्टी केली होती. नशेत त्यांनी त्याला खूप मारहाण केली. त्या वेळी पोलिस आणि मीडिया आल्याने प्रकरण गंभीर झाले. त्यानंतर माझ्या जीवाला धोका म्हणून मला पोलिसांचे संरक्षण देण्यात आले. त्या वेळी समाजातील लोकांच्या लक्षात आले की, मी आता मागे हटणार नाही. त्या वेळी त्यांनीच माझ्याकडे येऊन माफी मागितली. मी म्हटलं, माझा राग समाजावर नाही; तर त्यांच्या मागासलेल्या परंपरांवर आहे. ही जातपंचायतच बंद करा. त्या वेळी काही दिवसांनी मीडियासमोर वैदू समाजाची जातपंचायत कायमसाठी बंद करण्यात आली. मात्र समाजातील समस्या कायम होत्या. बालविवाह, अशिक्षितपणा, पुरुषांची अनेक लग्नं, स्त्रियांवर अत्याचार हे सगळ सुरूच होतं. हे सगळं थांबवणं गरजेच होतं. मी हे मुळापासून बंद करण्यासाठी काही संस्थांशी हातमिळवणी करून सर्वात आधी समाजातून बहिष्कृत केलेल्या लोकांना पुन्हा समाजात सन्मान मिळवून दिला. तसेच बालविवाह प्रथेवरही पूर्णविराम लावला. 

वैदू समाजातील जातपंचायतीबाबत दुर्गा म्हणाल्या की, महाराष्ट्रात १५ लाखाच्या आसपास वैदू समाज आहे. तो भटका आहे. झाडपाल्याच्या औषधांची विक्री करत भटकणं हा या समाजाचा रोजीरोटीचा मुख्य धंदा. राज्यात जिथे त्यांची वस्ती आहे, तिथे त्यांची जातपंचायत आहे. ही जात पंचायत वैदू समाजातील वैयक्तिक नात्यापासून आर्थिक व्यवहारापर्यंत सर्व गोष्टींवर निर्णय देते. शिक्षा म्हणून आर्थिक दंड करण्याचा अधिकार तिला आहे. अनेकदा हा निर्णय अन्यायकारक असायचा; मात्र त्याविरोधात कोणीही जात नसे. समाजाच्या विरोधात मी कधीच नव्हते; मात्र जातपंचायतीच्या माध्यमातून स्त्रियांवर होणारा अन्याय, चुकीच्या रूढी आणि परंपरा याला माझा विरोध होता. जातपंचायत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती एकत्रित येऊन जातपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माझ्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र वैदू समाज विकास समितीची स्थपना करण्यात आली. त्यावेळी जातपंचायतीमधील प्रमुखांना समितीचे अध्यक्ष करावे, असा माझा आग्रह होता. मात्र 'अंनिस'ने सुचवले की, आपल्याला ही व्यवस्था नव्याने प्रस्थापित करायची असेल, तर नवीन विचारांची व्यक्तीच तिथे असावी. त्यामुळे माझी निवड करण्यात आली. 

वैदू समाजातील शाळाबाह्य मुलांना शिक्षण देण्याबाबत दुर्गा म्हणाल्या की, ज्या वेळी माझ्या समाजाचे मागासलेपण पाहिले, त्या वेळी लक्षात आले की, हे सर्व निरक्षरतेमुळे आहे. आम्ही जर सुशिक्षित असतो तर आज आमची अवस्था अशी नसती. त्यानंतर वैदू समाजाच्या मुलांसाठी शिक्षणाचे काम सुरू केले. ५१७ पैकी ३१७ मुलांना शाळेत दाखला मिळवून दिला. शिक्षणाच्या बाबतीत बोलायचे तर काही मुलांना आम्ही शिकवतो; तर २२३ मुलांना दत्तक घेतले आहे. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी अनेकांनी घेतली आहे. कोणी वैदू समाजाच्या मुलांना शिकविण्याची जबाबदारी घेत असेल तर नक्की आम्हाला कळवू शकता, असं दुर्गा यांनी सांगितलं. 

२०१५ साली आम्ही "स्वयंसंघर्ष सामाजिक संस्थे'ची स्थापना केली. मी अध्यक्ष झाले. १५-२० लोकांच्या समूहात काही तरुण माझ्यासोबत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावांमध्ये काम करू लागले. मुंबई व नजीकच्या तब्बल १४ वस्त्यांमध्ये शाळाबाह्य मुले या तरुणांच्या माध्यमातून शोधली जात आहेत. मुंबईच्या लोकलमध्ये साहित्यविक्री करणाऱ्या वैदू समाजात आजही शिक्षणाची पायरी चढण्यासाठी प्रत्येक घरातून प्रेरणा दिली जात नाही. प्रत्येक घरात किमान चार मुले असतात. परिणामी लहान भावंडांना सांभाळण्यासाठी मोठ्या भावंडांनी शिक्षणाचा त्याग करण्याची परंपरा आजही आहे, असं दुर्गा यांनी सांगितलं. घरा-घरांतून या मुलांना शोधताना पुरेशा मनुष्यबळाची आवश्‍यकता होती. त्यामुळे दुसऱ्यांदा आम्ही वैदू समाजातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई, ठाणे, कल्याण, अशा विविध भागांत हे तरुण स्वयंसेवक फिरून सर्वेक्षण करणार आहेत. या कामासाठी प्रत्येक वस्तीतील पंचांची मदतही घेण्यात येते. 

वैदू समाजातील महिलांना सक्षम करण्याबाबत दुर्गा म्हणाल्या की, नेहमीच मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या वैदू समाजाच्या महिला आयुर्वेदिक औषधे, कपबशा विकून जगतात. शिक्षणाचा आणि त्यांचा गंधही नव्हता. मात्र त्यातून मार्ग काढत महिलांनी एकत्र येऊन मुंबईतील १८ पेक्षा अधिक हॉटेल्सना जेवण पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला. स्वयंसंघर्ष समितीच्या पुढाकाराने या महिलांना मुंबईतील विविध हॉटेल्समध्ये दररोज ४७०० चपात्या पुरविण्याचे काममिळाले. बचत गटाने बांधल्या गेलेल्या या महिलांनी टिफिन सर्विसदेखील सुरू केली. या माध्यमातून ठराविक निधीतून वैदू समाजातील मुलींच्या शिक्षणाचा खर्चही उचलला जातो. आता या समाजातील महिलांनी तब्बल १८ बचत गट स्थापन करत पुढचं पाऊल टाकलं आहे. मुंबईत वैदू समाजाच्या एकूण १४ वस्त्या आहेत. या वस्त्यांमध्ये अंदाजे २८ ते ३० हजार वैदू लोक राहतात. पूर्वी हा समाज वैद्यकीचा व्यवसाय करत होता. मात्र म्याजीक अँड ड्रग्ज कायद्यामुळे वैदू समाजावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे संसाराचा गाडा चालविण्यासाठी या स्त्रियांनी पुढाकार घेतला. या स्त्रिया दारोदारी फिरून किंवा आठवडे बाजारांमध्ये सुई, बिबे, चाप, फण्या आदी वस्तू विकण्याचे काम करत आहेत. यातून महिन्याला ६ ते ८ हजार एवढीच कमाई होते; त्यामुळे घरखर्च, मुलांचे शिक्षण आदींसाठी काहीच बदल होत नसल्याने बचत गटदेखील स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे दुर्गा यांनी सांगितले. 

या चळवळीतून झालेल्या बदलाबाबत दुर्गा म्हणाल्या की, या सर्व गोष्टींमध्ये माझ्या आई-वडिलांना खूप त्रास भोगावा लागला. ते समाजाच्या दबावाखाली होते. मात्र मी सुरुवातीपासूनच कणखर होते. आता घरच्यांसोबत संपूर्ण समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे लोक अभिमानाने बोलतात, दुर्गा आमची मुलगी आहे. नुकताच माझ्या बहिणीचा पहिला आंतरजातीय विवाह झाला. आमच्या समाजातील हा पहिला आंतरजातीय विवाह आहे. पूर्वी त्यांची जी मानसिकता होती की, जे पुरुष महिलांच्या सावलीलाही नाकारत होते, ते आज महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येत आहेत. हीच मोठी क्रांती आहे. मला असं वाटत की, ज्यांना क्रांती करायची आहे, त्यांनी स्वत:च्या घरातून क्रांती करावी. 

सध्याच्या कामाबाबत दुर्गा म्हणाल्या की, मी संपूर्ण महाराष्ट्रात वैदू समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरा करत आहे. २०१५ रोजी "महाराष्ट्र वैदू विकास समिती' म्हणून आमची एक संघटना तयार केली. प्रत्येक जिल्ह्यातील युवकांचे ग्रुप तयार केले. या माध्यमातून वेगवेगळं कार्य आम्ही करत असतो. आमची जत्रा एप्रिल-मार्चच्या दरम्यान असते. सावकाराकडून कर्ज काढूनही ठेवण्यात येते. मात्र या प्रथेला फाटा देत आता त्या पैशातून विकासकामाला हातभार लावण्यात येत आहे. सध्या शिक्षणावर काम सुरू आहे. २०१५ मध्ये ४२६ मुलांना शाळेत दाखला मिळवून दिला. मुलींसाठीही विविध शिबिरे राबविण्यात आली. या संघटनेचे काम युवक-युवतींना संघटित करणे, महिला सक्षमीकरण करणे, शिक्षण आणि मुलींना स्वत:च्या पायावर उभे करणे हे आहे. रोजगार हा मोठाच मुद्दा आहे. समाजामध्ये सध्या बालविवाहाचे मोठे प्रमाण आहे. हा प्रश्‍न या महिन्यात कोर्टाच्या मार्फत सोडवणार आहोत. वेगवेगळ्या संघटनांच्या लोकांना एकत्र येऊन हा गट तयार केला होता. या समितीमार्फत आम्ही शिक्षणावर काम करतो. तरुणांच्या रोजगारावरही काम सुरू करणार आहे. 

सध्या एका नवीन उपक्रमाबाबत दुर्गा म्हणाल्या की, जातपंचायती बंद झाल्यानंतर समाजातील लोकांपुढे पुष्कळ प्रश्न निर्माण झाले. समाजातील लोक कधी पोलिस ठाण्याची पायरी चढले नाहीत; कारण जातपंचायतच त्यांचं सर्वस्व होतं. या लोकांना कायद्याचं ज्ञान नाही. कोर्टात कसं जायचं? तुमच्यावर अन्याय झाला तर दाद कुठे आणि कशी मागायची? हेही माहीत नाही. यासाठी आम्ही कायद्याचा सल्ला आणि काऊन्सिलिंग जोगेश्वरीत सुरू केलं आहे. या संदर्भातील प्रकरणं या ठिकाणी मांडण्यात येतील. त्यावर कायद्याच्या संदर्भात सल्ला देण्यात येईल. 

तरुणांना संघटित करण्याच्या उद्देशाबाबत दुर्गा म्हणाल्या की, मार्च पासून मेपर्यंत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जत्रा भरवण्यात येते. मी नुकतेच सोलापूर येथे गेले. जत्रेत जाण्याचा उद्देश एवढाच आहे की, तेथील युवकांना संघटित करणे. त्या वेळीच आपण युवकांना भेटू शकतो. या कामात तरुणांचा सहभाग जास्त आहे. आत्ताची जी ५० पेक्षा अधिक वयोगटातील मंडळी आहेत, त्यांचे मत आपण बदलू शकत नाही; पण आत्ताची पिढी, युवकांची पिढी आपण बदलू शकतो. जत्रेतील लोक स्वतः मला या कार्यक्रमाला बोलवतात. या वेळी गावातील सगळे लोक जमतात, युवक जमतात. त्यामुळे त्यांच्याशी संवाद होतो. महाराष्ट्र दौरा करण्याचं हे माझं दुसरं वर्ष आहे. युवकांना घेऊन आपला उद्देश काय आहे, हे पटवून देणं. अशा पद्धतीने त्यांच्या विचारात बदल होत आहे. मी फक्त वैदू समाजाचंच नाही; तर पारधी समाजासारखे जेवढे भटके समाज यामध्ये येतात, त्यांच्यासाठी मी काम करते. त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या युवकांचे प्रश्न काय आहेत, हे जाणून घ्यायच्या दृष्टीने मी काम करणार आहे. काम आणि अभ्यास म्हणून हा दौरा मी करत आहे. 

एकूण अनुभवाबाबत दुर्गा म्हणाल्या, कधी विचारही नव्हता केला की, माझ्या हातून असं काही घडेल. जातपंचायतीचा मुद्दा जेव्हा घरात निर्माण झाला, त्या वेळी असं वाटलं, समाजाला काही आधार नाही, चुकीच्या रूढी आणि परंपरातून समाजाला बाहेर काढणं गरजेचं होतं. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, समाजासाठी त्यांनी काहीतरी करायला पाहिजे. सुरुवातीला मला खूप अडचणी निर्माण झाल्या. लोक घाबरत होते. महिला म्हणून हे सगळं करणं खूप आव्हानात्मक होतं. त्यामुळे खूप त्रास होत होता. मात्र आता खूप बदल झाला आहे. आर्थिक नियोजनासाठी मला चपात्यांच्या व्यवसायाची खूप मदत मिळते. त्याचबरोबर माझं स्वतःचं दुकान आहे. होलसेलचा बिझनेस आहे. आई आणि मी हे सांभाळतो. मी बारावी पास झाली आहे. या वर्षी लॉमध्ये ऍडमिशन घेणार आहे. 

आजच्या तरुणांबद्दल दुर्गा म्हणाल्या की, ज्या लोकांच्या हाती या देशाची सत्ता आहे, त्यामध्ये आजची तरुणाई बदल करू शकेल. माझे प्रेरणास्थान हे फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीबाई फुले आहेत. यांना वाचूनच मी पुढे शिकलेली आहे. तरुणांनीही या थोर व्यक्तींविषयी नक्की वाचन करावं. यातूनच आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो, याची जाणीव तरुणांमध्ये होईल. मी स्वतःसाठी नाही, पुढच्या पिढीसाठी मोकळा श्वास निर्माण करत आहे. जो समाज अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकला आहे, त्यात बदल करून आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी आजच्या तरुणांना सांगेन, की बुद्धी वापरा आणि प्रत्येक गोष्टीला तर्क लावा, आजच्या नेटच्या युगात आपण नुसतं पोस्ट वाचतो आणि व्हायरल करतो. त्या वेळी तर्क नाही लावत, बुद्धी नाही वापरत. युवकांचे तर सध्या खूप प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात शिक्षण असेल, रोजगार असेल, यामध्ये आपण खूप मागे आहोत, असं वाटतं. सध्याची महिलांची परिस्थिती पाहता दुर्गा सांगतात, महिलांनो, तुमची लढाई तुम्हालाच लढायला हवी. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. महात्मा फुले यांनी दिलेल्या महिला सक्षमीकरणासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा तुम्ही आदर केला पाहिजे. 

दुर्गा यांच्याबद्दल... 

  • दुर्गा या वैदू समाजातील असून समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली.
  • दुर्गा यांनी समाजातील विविध घटकांचे प्रश्न मांडण्यासाठी जागतिक पातळीवर नेतृत्व केलं आहे. या कामासाठी त्यांना विविध ५१ पुरस्कार मिळाले आहेत.
  • फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या कामाचा आदर्श ठेवून आजच्या पिढीने काम केलं पाहिजे, या विचारांवर त्या ठाम आहेत.
  • दुर्गा यांचा हा प्रवास उल्लेखनीय, प्रेरणादायी असून प्रत्येकानेच त्यांचा आदर्श घ्यायला हवा. दुर्गा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News