आदिवासी भागातला हा तरुण एमपीएससी परीक्षेत राज्यात अव्वल

शिवचरण वावळे
Tuesday, 25 June 2019
  • सात वर्षांची मेहनत फळाला; राज्यसेवा परीक्षेने तीन वेळेस दिली हुलकावणी 

नांदेड: स्पर्धा परीक्षेची तयारी करून यशस्वी होण्यासाठी युवकांची वाढती स्पर्धा पाहाता किनवटसारख्या अतिदुर्गम भागातील अमोल चव्हाण या शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द आणि चिकाटी बाळगत बँकेची नोकरी सांभाळून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महिला व बालविकास अधिकारी या पदाला केवळ गवसणीच घातली नाही; तर राज्यात अव्वल येण्याचा बहुमानही त्याने मिळविला आहे. 

किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील खेड्यात जन्मलेले अमोल चव्हाण यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना दोन एकर शेती कसून मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या अमोलने शाळा करत जमेल तेंव्हा वडिलांना शेतीत मदत करत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बारावीनंतर त्याने शिक्षक होण्याच्या हेतूने डी.एड.ला प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाले; परंतु, शासकीय शाळेवर शिक्षक म्हणून नोकरी काही मिळत नव्हती. खासगी संस्थेच्या नोकरीला लाखो रुपये आनायचे कुठून, हा प्रश्न कायम त्याच्यासह घरातील सर्वांनाच सतावत होता. 

खासगी शाळेत पैसे भरणे नको म्हणत अमोलने शिक्षक होण्याचा विचार सोडून दिला व पदभर्ती निघेल त्या ठिकाणी फॉर्म भरून जिद्दीने परीक्षा देण्याचा धडाका सुरू केला. दरम्यान, २००८- ०९ साली त्याला नांदेड येथील शिवाजीनगरच्या एसबीआय शाखेत सिनिअर असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली. परंतु, अमोलचे समाधान होत नव्हते. अधिकारी होण्याचे स्वप्न काही केल्या त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. 

२०१२-१३ पासून पुन्हा नव्या जोमाने त्याने नोकरी सांभाळून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरू केली. दरम्यान, तीन वेळेस राज्यसेवा परीक्षेत आणि दोन वेळेस महिला व बालकल्याण विभागाच्या परीक्षेने केवळ दोन- चार मार्कांनी हुलकावणी दिली. सहा ते सात वर्षांपासून अभ्यासात सातत्य असताना अगदी थोडक्यात यशाने हुलकावणी दिली तरी अमोलनी हार मानली नाही आणि कुठलेही रडगाणे किंवा हार न मानता अगदी जिद्दीने पुन्हा नव्या दमाने रात्र-रात्र जागून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. डिसेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने घेण्यात आलेली परीक्षा दिली. आणि तब्बल सात वर्षांनी का होईना जिद्दी आणि मेहनतीच्या जोरावर महिला व बालविकास अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. इतकेच नव्हे तर या परीक्षेत महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. 

नोकरी सांभाळून जमेल त्या वेळेला अभ्यास करण्यावर भर दिला. नाेकरी करतो म्हणून अभ्यासात कधीच खंड पडू दिला नाही, ना कधी निराश झालो. दोन मार्कांनी राज्यसेवा परीक्षेने हुलकावणी दिली म्हणून रडत बसलो नाही. त्यामुळेच उशिरा का होईना यशाला गवसणी घालू शकलो. अभ्यासक्रम डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने वेळेचे नियोजन केल्यास निश्चित फायदा होतो. मला इथेच थांबायचे नाही. प्रशासकीय अधिकारी होण्याचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे. 
-अमोल चव्हाण, महिला व बालविकास अधिकारी.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News