युवा खेळाडू उत्तेजक द्रव्यांच्या विळख्यात
जिद्दीच्या जोरावर खेळाडू रात्रं-दिवस मेहनत घेऊन स्पर्धा गाजवीत असतात. परंतु, कधी-कधी ते यासाठी शॉर्टकटचाही अवलंब करतात आणि ‘डोपिंग’ला बळी पडतात. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील तरुण पिढीच उत्तेजक द्रव्यांच्या विळख्यात सापडली आहे.
सोलापूर : जिद्दीच्या जोरावर खेळाडू रात्रं-दिवस मेहनत घेऊन स्पर्धा गाजवीत असतात. परंतु, कधी-कधी ते यासाठी शॉर्टकटचाही अवलंब करतात आणि ‘डोपिंग’ला बळी पडतात. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील तरुण पिढीच उत्तेजक द्रव्यांच्या विळख्यात सापडली आहे. मध्य प्रदेशातील एका पैलवानाचा अशाच उत्तेजक द्रव्याच्या सेवनामुळे मृत्यू झाला असून, त्यामुळे संस्था, क्रीडा संघटकांनीही शालेय, तसेच राज्य स्पर्धेपासूनच ‘डोपिंग’चाचणीसाठी आग्रह धरला पाहिजे.
तरच, कष्टाळू, गरीब मुलांना न्याय मिळेल. तसेच, उत्तेजक द्रव्यांच्या विळख्यात असणारी कुस्ती मोकळा श्वास घेईल, असे मत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष अर्जुनवीर काका पवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.महाराष्ट्राला कुस्तीची परंपरा फार मोठी आहे. कुस्तीला राजाश्रय संपल्यानंतर लोकाश्रयावर कुस्ती आजही लोकप्रिय असणारा प्राचीन खेळ आहे. कुस्तीला जसे वैभवाला नेणाऱ्या गोष्टीवर चर्चा होते तसे कुस्तीला बदनाम करणाऱ्या घटकांवर, तसेच कुस्ती मारक असलेल्या विषयावर चर्चा होत नाही.
उत्तेजक द्रव्य ही बाब त्या अनेक बाबींपैकी एक महत्त्वाची आणि संवेदनशील गोष्ट आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसह अनेक राज्यस्तरीय जसे शालेय, ज्युनिअर, सब ज्युनिअर स्पर्धेमध्ये डोपिंग चाचणी सक्तीची करावी, अशी मागणी अर्जुनवीर कुस्तीपटू काकासाहेब पवार यांनी केली.मध्य प्रदेशातील सिवनी येथील एका पैलवानाचा अशाच उत्तेजक द्रव्याच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी सोशल मीडियावर वायरल झाली.
यावर्षी सराव करताना आणि कुस्ती खेळताना वर्षभरात किमान १० ते १२ पैलवान मृत्युमुखी पडल्याची घटना महाराष्ट्र व देशात घडली आहे. ही बाब कुस्तीसाठी आणि पैलवान पेशा जोपासणाऱ्या प्रत्येक घटकांसाठी अतिशय निंदनीय आहे.महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात उत्तेजक द्रव्ये घेण्याचे प्रमाण या दशकात अतिशय वाढले. अनेक खेळात उत्तेजक द्रव्ये घेतली जातात; मात्र कुस्तीमध्ये याचा वापर उत्तरेतून दक्षिणेत आला. सराव करताना, कुस्तीच्या आधी त्याचबरोबर शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी अशा कित्येक गोष्टीत वापरण्याचे प्रमाण वाढले. कोणत्याही ज्ञानाशिवाय पैलवान आज उत्तेजक द्रव्ये इंजेक्शन, गोळ्या अशा स्वरूपात घेत आहेत.