तरुणांनी केला उकिरड्याचा कायापालट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष आणि परिसरातील नागरिकांच्या बेशिस्तीमुळे नवाबपुरा भागात भर रस्त्यात उकिरडा तयार झाला होता.
  • वारंवार अर्जविनंत्या करूनही हा उकिरडा हटत नसल्याने अखेर या भागातील तरुणांनीच एकत्र येत स्वच्छता केली आणि त्या जागी गट्टू बसवून उकिरड्याचा कायापालट करून टाकला. 

औरंगाबाद - महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष आणि परिसरातील नागरिकांच्या बेशिस्तीमुळे नवाबपुरा भागात भर रस्त्यात उकिरडा तयार झाला होता. वारंवार अर्जविनंत्या करूनही हा उकिरडा हटत नसल्याने अखेर या भागातील तरुणांनीच एकत्र येत स्वच्छता केली आणि त्या जागी गट्टू बसवून उकिरड्याचा कायापालट करून टाकला. 

काश्‍मीरमधल्या राजौरीचा संस्थानिक मुघलांच्या छावणीबरोबर औरंगाबादला आला होता. त्याची मुलगी नवाबबाई हिच्या नावाने वसवण्यात आलेल्या नवाबपुऱ्यात आजही जुने वाडे, माड्या आणि पुराणवास्तूंची दाटी आहे. या भागातील लोकही पिढ्यान्‌पिढ्या येथेच राहतात. शहरातल्या प्रसिद्ध हिमरू विणकरांची घरे आणि कारखानेही येथे आहेत. त्यामुळे शहागंज, राजाबाजार, जिन्सी आणि जुना मोंढ्याच्या मधोमध वसलेल्या नवाबपुऱ्यात कायमच प्रचंड गर्दी असते. येथील अरुंद रस्ते आणि बारक्‍या बोळींमुळे वाहने चालवणेही नागरिकांना कठीण होऊन बसते. 

याच नबावपुऱ्यात भर रस्त्यात नागरिकांनी कचरा टाकून टाकून उकिरडा तयार केला होता. महापालिकेच्या वॉर्ड अधिकारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे इथेच कचरा टाकण्याचा पायंडा पडत गेला. त्यामुळे या भागात राहणाऱ्या काही तरुणांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही काही फरक पडला नाही. अखेर येथील अब्दुल रहिम, आमेर अहमद कुरेशी, मोहम्मद इलियास, मोहम्मद अन्वर, मोहम्मद ताहेर आणि इमरान कुरेशी यांनी पुढाकार घेत येथे स्वच्छता मोहीम राबवत कचरा साफ केला. त्यानंतर उकिरड्याच्या जागेवर स्वखर्चाने पेव्हर ब्लॉक्‍स आणून तिथे बसवले आणि उकिरड्याचा कायापालट केला.

रस्ता रुंद करण्याची मागणी
राज्य सरकारने दिलेल्या शंभर कोटींच्या निधीतून शहरभर सिमेंट-काँक्रिट रस्त्यांची कामे सुरू आहेत; मात्र येथील दोन नगरसेवकांची टोलवाटोलवी आणि इतर पुढाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे नवाबपुऱ्यात आजतागायत कुठलेही विकासकाम झाले नाही. त्यामुळे आता किमान या भर रहदारीच्या आणि गर्दीच्या भागातले रस्ते किमान रुंद तरी करावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News