‘तरुणांनो, आकाशाला गवसणी घाला’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

भीती आपल्याला मागे खेचत असते. भीतीला घाबरू नका. तुम्ही काहीही करू शकता. प्रयत्न करा म्हणजे आत्मविश्‍वास वाढेल.

नागपूर - भीती आपल्याला मागे खेचत असते. भीतीला घाबरू नका. तुम्ही काहीही करू शकता. प्रयत्न करा म्हणजे आत्मविश्‍वास वाढेल. पैसा, प्रसिद्धीच्या मागे लागू नका, तर तुमच्या मागे ती येईल असे स्वतःला तयार करा. तरुणांनो, आपल्या आवडीचे करिअर, व्यवसाय निवडा आणि झोकून देऊन कष्ट करा. तुमचे वय आकाशाला गवसणी घालायचे आहे. ही संधी सकाळ माध्यम समूहाने तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी  केले. 

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सहाव्या वर्गापासून ते पदवी, पदव्युत्तर झालेल्या युवकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सकाळी साडेअकराला महापौर नंदा जिचकार यांनी दीपप्रज्वलन करून दोनदिवसीय यूथ समर समिटचे उद्‌घाटन केले. या वेळी नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवने, माजी आमदार तसेच माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन मते, स्पेक्‍ट्रम ॲकेडमीचे संचालक सुनील पाटील, सकाळचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, ‘यिन’चे तेजस गुजराथी व्यासपीठावर उपस्थित होते. 

महापौर जिचकार म्हणाल्या, ‘तरुणांनो, जे कठीण वाटते ते आधी करा म्हणजे भीती जाऊन आत्मविश्‍वास वाढेल. पालकांनी उद्योजकतेचे स्वप्न बघितले, तर त्यांची मुले निश्‍चितच व्यावसायिक होऊ शकतात.’ सुनील पाटील यांनी तरुणांनी वर्तमानाचे भान ठेवून करिअर, व्यवसायांची निवड करावी. यातून संभाव्य अडचणींवर मात करता येणे शक्‍य असल्याचे सांगितले. मोहन मते यांनी तरुणांना एकत्र येऊन समाज व देशविकासासाठी लढण्याचे आवाहन केले. रामनाथ सोनवने म्हणाले की, जी तरुणाई नैराश्‍याने, उपेक्षेने त्रस्त आहे, काय करावे काही समजत नाही, अशा विमनस्क अवस्थेतील युवकांना मार्ग दाखवण्याचे कार्य डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कद्वारे होत आहे.
गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक शैलेश पांडे यांनी केले. संचालन नासिर यांनी केले. आभार तेजस गुजराथी यांनी मानले.

नवीन करिअरचा वेध घ्या - सुनील पाटील
उन्हाळी शिखर परिषदेत सहभागी होऊन उन्हाळी सुट्ट्यांचा योग्य विनियोग केल्याबद्दल सर्वप्रथम युवकांचे आभार. भारत हा महाशक्ती होत चालला असून सर्वांत जास्त युवकांची संख्या हा आपला प्लस पॉइंट आहे. परंतु, यासोबतच रोजगार आणि करिअरच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. सध्या अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जात आहे, कोणत्या संधी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे याचा विचार केला पाहिजे. कारण आज असलेल्या संधी उद्या असतीलच असे नाही. आपल्याला नवीन करिअरचा वेध घेता आला पाहिजे. सकाळ माध्यम समूहाच्या या परिषदेतून ही दृष्टी तुम्हाला मिळेल, असे सुनील पाटील म्हणाले.

खूप काही शिकायला मिळेल - मोहन मते
शहरी तरुणांसह चंद्रपूर, गडचिरोली आदी आदिवासीबहुल भागातील युवक आज यूथ समर समिटला उपस्थित आहेत. तरुणच देशाचे आणि समाजाचे भविष्य आहे. या सर्वांना एकत्र आणल्याबद्दल सकाळ माध्यम समूहाचे आभार. परिषदेतून युवकांना खूप काही शिकायला मिळेल, ही अपेक्षा आहे असे मोहन मते यांनी सांगितले.

आपले ध्येय स्वतः निवडा - रामनाथ सोनवने
अगर प्यास लगे तो हिंमत रख
बादल को तेरे साथ रख

कुवाँ किसी को विरासत में नहीं मिलता!!
खरं म्हणजे आपले चुकते केव्हा तर ज्यावेळी आपण प्रयत्न करायला पाहिजे होते त्यावेळी ते करत नाही. म्हणून नंतर आपल्याला पश्‍चात्ताप होतो. शेतकऱ्यांप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीतही कष्ट केले, तर अपेक्षित यश निश्‍चितच मिळते. निराशावादी लोकांना संधीत अडचणी दिसतात, तर आशावादी संधीचे सोने करतात. ज्या मार्गाने कोणी जाण्याचा प्रयत्न करत नाही तो निवडावा म्हणजे यशाची खात्री असते. आपल्या अवतीभवती असलेल्या वाईट, समाज व देशाला हानिकारक अशा बाबी टाळून आपले आदर्श, ध्येय व साधने स्वतः निवडा, असा सल्ला रामनाथ सोनवने यांनी दिला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News