युवकाने मारली पुरात उडी, पण आली अंगलट पाहा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 3 August 2019
  • मर्ढे येथील युवक बेपत्ता, दिवसभराच्या शोध मोहिमेनंतरही अपयश 

सातारा : मर्ढे (ता. सातारा) येथील धीरज तुकाराम शिंगटे (वय 19) हा युवक आज (शनिवारी) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीच्या पुरात पोहताना बेपत्ता झाला. तो गावातील मित्रांबरोबर आनेवाडी- मर्ढेला जोडणाऱ्या पुलावर गेला होता. तेथून काही युवकांनी नदीच्या पुरात उड्या घेतल्या. त्या वेळी सर्व जण पोहत मर्ढे गावच्या घाटावर पोचले. मात्र धीरज शिंगटेची दमछाक झाली आणि तो पाण्यात वाहायला लागल्यावर काही युवकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यामध्ये यश आले नाही.
 
धीरज पुराच्या प्रवाहाबरोबर वाहून बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच, त्याला शोधण्यासाठी मर्ढे गावातील शेकडो ग्रामस्थ, युवक लगेच घाटावर एकत्र झाले. त्यांनी नदी काठावर शोधाशोध सुरू केली, तसेच लिंब, गोवे, आरळे, वडूथ, वनगळ, बोरखळ, पाटखळ या नदीकाठी असणाऱ्या गावांतील अनेकांना घटनेची माहिती देऊन शोधकार्यास सुरवात केली, तरीही तो ग्रामस्थ व युवकांना मिळून न आल्याने सातारा येथील अजिंक्‍य ट्रेकर्सच्या टीमला बोलावण्यात आले; पण दिवसभराच्या शोध मोहिमेनंतरही त्यात अपयश आले. 

धीरज शिंगटे हा सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तो तुकाराम शिंगटे यांचा एकुलता एक मुलगा असून, घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलिस दलानेही मदत कार्यास सुरवात केली. मंडलाधिकारी कुलकर्णी, तलाठी सावंत यांच्याबरोबर मर्ढे, वनगळ, गोवे, लिंब या ठिकाणचे पोलिस पाटील, ग्रामस्थ व युवकांनीही मोठ्या संख्येने शोध मोहिमेत सहभाग घेतला. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News