बाळा सिगरेट ओढल्याने तुझं असं होईल...

विक्रम इंगळे
Thursday, 1 August 2019
  • मी परदेशातून तुझ्यासाठी सिगरेट आणल्या आहेत. ह्या घे! पण एक सांगतो. तू गाण्यात करिअर करायचे म्हणतोस. त्यासाठी सिगरेट ही घातक आहे.

रात्रीचे साडे आठ वाजलेले. बारावीत असलेला सोहम सगळे क्लासेस संपवून घरी आला. घरातले वातावरण जरा तंग दिसत होते. आई बाबा फारसे त्याच्याशी बोलत नव्हते. फ्रेश होऊन आलेल्या सोहमला बाबांनी जरा चिडूनच विचारले, कुठे गेला होतास. 
बाबा, क्लास ला! का?
पुढचे काही बोलायच्या आधीच, बाबांनी सोहमला दोन मुस्काटात ठेवून दिल्या. 'मूर्खा! खोटं बोलतोस माझ्याशी?' 
सोहमला कळलं की आपण काय करत होतो हे बाबांना कळलं. तो गप्प राहिला. आवाज ऐकून आई धावत आली. 'काय झालं?' 
'विचार त्यालाच', चिडलेले बाबा म्हणाले. 'हा मूर्ख मुलगा क्लास नंतर मित्रांबरोबर सिगरेट ओढत बसला होता' 
हे ऐकून आई पण चिडली. दोघांनी सोहमला न भूतो न भविष्यतीः असा धारेवर धरला. मग त्यावेळी तू कुठल्या घरातून आलाय अणि काय वागतोस, आमचे संस्कार हेच आहेत का, आपल्या अख्ख्या खानदानात आजपर्यंत कुणी सिगरेटला शिवलं पण नाही, लोक काय म्हणतील हा विचार केला का, तू घराण्याला कलंक आहेस वगैरे बोलून त्याला भरपूर झाडला.

अथर्व जेंव्हा सिगरेट ओढतो असं त्याच्या बाबांना कळलं तेंव्हा ते त्याला काहीच म्हणाले नाहीत. काही आरडा ओरडा नाही, मारझोड नाही. काही नाही. सर्व शांत होते. 
एके दिवशी बाबा अथर्वला म्हणाले, 'चल! जरा बाहेर जावुन येऊ' "कुठे?" 'तू चल तर! माझ्या एका ओळखीच्यांकडे जायचयं'. 
दोघेही जाताना बाबा त्याच्या छंदाची, कॉलेजची, मित्र मैत्रिणींची विचारपूस करत होते. एके ठिकाणी गाडी थांबली. अथर्वने उतरून समोर पाहिले तर 'डॉ पाटणकर कॅन्सर हॉस्पिटल' अशी पाटी त्याला दिसली. डॉक्टर, बाबा आणि अथर्व बोलत एका वॉर्ड मधे आले.' हा कुठला वॉर्ड आहे' "इथे सगळे तंबाखू अणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणार्‍या कॅन्सर पीडित व्यक्तींना ठेवलं जातं" 
"ह्याला तोंडाचा कॅन्सर कॅन्सर आहे. हा माणसाला गुटका अणि सिगरेटच व्यसन होतं" "ह्याला लंग कॅन्सर आहे, ह्याला सिगरेटच व्यसन होतं" 
वॉर्डची राऊंड संपवून, डॉक्टर आणि बाबा त्यांच्या रूम मध्ये काही बोलत बसले होते. अथर्व बाहेर बसला होता. 
परत घरी जायच्या मार्गावर बाबा म्हणाले, 'हे बघ अथर्व! मी तुला दोन दिवसांपूर्वी सिगरेट ओढत असताना पहिलं. तुला आज मुद्दामच इथे मी घेवुन आलो होतो. तू जर असाच सिगरेट ओढत राहिलास तर वयाच्या एका टप्प्यावर तुला पण इथेच आणावं लागेल. चॉईस तुझा आहे. आयुष्यात तुला कुठे जायचंय हे तू ठरव'.

गोल्डन एरा विथ अन्नू कपूर ह्या कार्यक्रमात ऐकलेला एक किस्सा सांगतो. स्वर्गीय पार्श्वगायक मुकेश ह्यांना ज्यावेळी कळलं की आपला मुलगा नितीन मुकेश हा सिगरेट ओढत आहे तेंव्हा त्यांनी परदेशातून येताना त्याच्यासाठी काही सिगरेट आणल्या. "नितीन तू सिगरेट ओढतो हे मला कळलंय. मला वाईट ह्याच वाटते की ही गोष्ट मला बाहेरून समजली. माझा मुलगा माझ्याशी हे बोलू शकला नाही हे एक वडील म्हणुन मी माझं अपयश मानतो. तुला सिगरेट बाहेरून विकत घ्यायची गरज नाही. मी परदेशातून तुझ्यासाठी सिगरेट आणल्या आहेत. ह्या घे! पण एक सांगतो. तू गाण्यात करिअर करायचे म्हणतोस. त्यासाठी सिगरेट ही घातक आहे. त्याने तुझे करियर होणार नाही'

सोहम, अथर्व अणि नितीन मुकेश ह्यांनी पुढे काय केलं, मी बोलणार नाही. कुणाचे बाबा बरोबर अणि कुणाचे चुकीचे हे देखील मला बोलायचे नाही. 
तुम्ही ठरवा काय व्हायचे ते! सोहमचे बाबा का अथर्वचे बाबा का मुकेश व्हायचे ते! चॉईस तुमचा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News