येडियुरप्पा चौथ्यांदा बनले कर्नाटकाचे मुख्यमंत्री !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019
  • चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ;
  • बहुमताचे आव्हान

बेंगळूरु : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि कर्नाटकातील सत्तानाट्यावर पडदा पडला. ते कर्नाटकचे २२ वे मुख्यमंत्री आहेत. राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना अधिकार व गोपनीयतेची शपथ दिली. 

येडियुरप्पा सोमवारी बहुमत सिद्ध करणार असल्याचे समजते. मात्र, त्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. एका अपक्षासह भाजपकडे १०६ सदस्य असून, सध्या असलेल्या २२१ सदस्यांच्या सभागृहात (तिघे अपात्र वगळून) बहुमतासाठी १११ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे.

सायंकाळी साडेसहा वाजता राज्यपालांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर येडियुरप्पा यांना राज्यपालांनी शपथ दिली. पाच मिनिटांतच कार्यक्रम आटोपला. शपथग्रहण समारंभानंतर राज्यपाल वजूभाई वाला यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. 

येडियुरप्पांसोबत अन्य कोणत्याच मंत्र्यांना शपथ देण्यात आली नाही. बहुमत सिद्ध केल्यानंतर ते आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे समजते. कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा, खासदार शोभा करंदलांजे, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

कर्नाटक भाजपकडे सध्या १०५ आमदारांचे संख्याबळ असून, ते बहुमतापासून बरेच दूर आहे, राज्यघटनेचे पालन केल्यास भाजप सरकार स्थापन करू शकत नाही. 

- सिद्धरामय्या, नेते काँग्रेस
 

अंतर्गत वादांच्या ओझ्यामुळे कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचे सरकार कोसळले. भाजप आणि स्थैर्य हे दोन समानार्थी शब्द आहेत. आम्ही जेथे जातो, तिथे स्थैर्य आणतो.

- जे. पी. नड्डा, कार्यकारी अध्यक्ष, भाजप

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News