यवतमाळ जिल्हा ’उन्नत भारत’चे मॉडेल तर पद्मभूषण डॉ. विजय भटकर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019

अंतराळातील प्रयोगशाळेचा आपण अनेक प्रकारे उपयोग करतो. स्पेस स्टेशनचा देशाची सुरक्षा, नैसर्गिक संकटांची पूर्वसूचना आदींसाठी केला जाणार आहे. मंगळयान ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे.’

यवतमाळ -  केंद्र सरकार ग्रामीण भारताच्या समृद्धीसाठी ’उन्नत भारत’ अभियान राबवीत आहे. कृषीवर आधारित लघू उद्योगांची निर्मिती करून रोजगार निर्मिती करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यवतमाळ येथील दीनदयाळ बहूद्देशीय प्रसारक मंडळ हे या अभियानाचे विदर्भातील प्रमुख केंद्र राहणार असून यवतमाळ जिल्हा हा ’मॉडेल’ असेल, असे मत उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले. ते येथील दीनदयाळ प्रबोधिनीत सोमवारी (ता. 24) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

यावेळी पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ. ए. एम. पातुरकर, उन्नत भारत अभियानाच्या विभागीय संयोजक डॉ. अर्चना बारब्दे व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे डॉ. डी. टी. इंगोले आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. भटकर म्हणाले की, ’केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे ग्रामीण भारताच्या समृद्धीसाठी ’उन्नत भारत अभियान’ ही योजना तयार करण्यात आली आहे. देशभरातील विद्यापीठे, आयआयटी संस्थांसह तांत्रिक व गैरतांत्रिक संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारचे तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचा यामागील उद्देश आहे. या योजनेचे दुसरे सत्र 2 एप्रिल 2018 पासून सुरू झाले असून ते पुढे तीन वर्षे चालणार आहे. विदर्भातील अकरा जिल्ह्यांसह मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचाही यात समावेश करण्यात आला आहे. आय आय टी, आयश्‍चर, व्हीएनआयटी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत दीनदयाळ बहूद्देशीय प्रसारक मंडळाच्या पुढाकारात ही योजना राबविली जात आहे.

देशात डिजिटल क्रांती होत आहे. त्यामाध्यमातून शेतकर्‍यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जैविक शेतीचे प्रयोग केले जाणार आहे. गावे दत्तक घेऊन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तंत्रज्ञान व कृषिविषयक ज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. नवीन रोजगारांच्या संधी व शेतीवर आधारित उद्योगांना चालना देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवून ते सुखी कसे होतील, याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे डॉ. भटकर म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News