अहिरांच्या पक्षप्रवेशामुळे वरळी, भायखळा शिवसेनेच्या मुठीत ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 July 2019

शिवसेनेच्या या खेळीमुळे युवानेते आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभेतील मार्ग सुकर झाला आहे. याशिवाय भायखळा विधानसभेतही अहिर यांच्या रूपाने तगडा उमेदवार मिळाला आहे.

मुंबई : सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेला खिंडार पाडण्यात शिवसेनेला यश आले आहे. शिवसेनेच्या या खेळीमुळे युवानेते आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभेतील मार्ग सुकर झाला आहे. याशिवाय भायखळा विधानसभेतही अहिर यांच्या रूपाने तगडा उमेदवार मिळाला आहे. मुंबईत मोठा भाऊ होण्यासाठी शिवसेनेची ही मोठी खेळी मानली जात आहे.

राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद कित्येक पटींनी वाढली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळी मतदारसंघांत सचिन अहिर यांचा मोठा दबदबा होता. या परिसरात दलित व मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने सचिन अहिरांच्या मागे नेहमीच उभा राहिला आहे. हेच मतदार आपल्या गळाला लावण्यासाठी शिवसेना गेल्या १० वर्षांपासून प्रयत्न करत होती; मात्र अहिर खुद्द शिवसेनेत दाखल झाल्यामुळे त्यांच्यासोबत सर्व मतदार सेनेला मतदान करतील.

अहिर स्वतः भायखळा विधानसभा मतदारसंघातून उभे राहून आदित्य ठाकरे यांचा वरळीतील मार्ग सुकर करू शकतात. वरळी सीफेस, वरळी कोळीवाडा, सिद्धार्थनगर, प्रेमनगर, आनंदनगर, जिजामाता नगर, भिवंडीवाला बिल्डिंग, बीडीडी चाळ, गोपाळनगर व बावन चाळ या परिसरात अहिर यांचा स्वतःचा मतदार आहे. हा टक्काही शिवसेनेच्या बाजूने वळल्यास वरळी मतदारसंघ पूर्णपणे सुरक्षित मतदारसंघ ठरू शकतो.

त्यामुळे आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून उभे राहण्याची शक्‍यता आहे. याशिवाय धोबी घाट, सात रस्ता या परिसरात अहिर यांच्या कार्यकर्त्यांची फळी अहिर शिवसेनेच्या बाजूने वळवू शकतात. त्यामुळे भायखळ्यातील मदनपुरा सोडल्यास सर्व विभागांमध्ये शिवसेनेला वर्चस्व प्रस्थापित करता येऊ शकते. त्यामुळे अहिर यांनी गवळी कुटुंबियांची मनधरणी केल्यास एमआयएमच्या वारीस पठाणांचा भायखळ्याचा बालेकिल्ला सहज भेदता येऊ शकतो.

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपमध्ये मुंबईत काँटे की टक्कर झाल्यामुळे भायखळ्यासारखा मतदार संघ वाढल्यास शिवसेना युतीतील मोठा भाऊ ठरू शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News