#WorldPopulationDay मुंबईत वाढतेय लोकसंख्या दिवसेंदिवस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • लोकसंख्येच्या घनतेत जगात सहाव्या क्रमांकावर असलेल्या मुंबईत पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही. घरांचा आकार, मोकळ्या जागा, रस्ते, पदपथ यातील एकही सुविधा लोकसंख्येच्या दृष्टीने पुरेशी नाही.

मुंबई - लोकसंख्येच्या घनतेत जगात सहाव्या क्रमांकावर असलेल्या मुंबईत पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही. घरांचा आकार, मोकळ्या जागा, रस्ते, पदपथ यातील एकही सुविधा लोकसंख्येच्या दृष्टीने पुरेशी नाही. मुंबईतील पाच लाख कुटुंबे झोपडपट्ट्यांत राहतात. त्यातील प्रत्येकाच्या वाट्याला घरातील फक्त एक ते दोन चौरस मीटर एवढीच जागा येते. 

मुंबईच्या लोकसंख्यावाढीचा वेग कमी झाला आहे. या महानगराची लोकसंख्या 2001 मध्ये एक कोटी 19 लाख होती; ती 2011 मध्ये एक कोटी 24 लाखांवर गेली. महापालिकेच्या अंदाजानुसार 2016 मध्ये एक कोटी 26 लाख लोकसंख्या होती. म्हणजे 2001 ते 2011 या दशकात मुंबईची लोकसंख्या फक्त सात लाखांनी वाढली. 1991 मध्ये लोकसंख्या 99 लाख 25 हजार होती. 1991 ते 2001 या दशकात लोकसंख्येत 20 लाखांची भर पडली होती. 

मुंबईतील लोकसंख्यावाढीचा वेग मंदावला असला, तरी आणखी लोकांना सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. मुंबईत प्रत्येक चौरस किलोमीटर क्षेत्रात 70 हजार नागरिकांचे वास्तव्य आहे. या महानगरातील बहुतेक घरे खुराड्यासारखी आहेत. घरातील प्रत्येकाला आठ ते 10 चौरस मीटर जागा आवश्‍यक असते; मात्र मुंबईतील 60 टक्के नागरिकांना एक ते दोन चौरस मीटर जागेतच आयुष्य घालवावे लागते. राष्ट्रीय मानकानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी 10 चौरस मीटर मोकळी जागा ठेवणे शक्‍य नसल्यामुळे महापालिकेने हे निकष बदलून विकास आराखड्यात दोन चौरस मीटर जागा निश्‍चित केली आहे. 

लोकसंख्यावाढीचे परिणाम 
भारतातील सर्वांत वर्दळीचे शहर असलेल्या मुंबईत प्रत्येक किलोमीटर रस्त्यावर 1,000 हून अधिक वाहने असतात. सार्वजनिक वाहतुकीवर ताण येत असल्याने शहरातील खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी, ध्वनी आणि वायू प्रदूषणात वाढ होत आहे. राजधानी दिल्ली हे देशातील आणि मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वांत प्रदूषित शहर आहे. परंतु, अनेकदा मुंबईच्या प्रदूषणाने दिल्लीलाही मागे टाकल्याचे आढळते. मुंबईतील हवेत तरंगत्या धूलिकणांचे प्रचंड प्रमाण असते. 

  •  देशातील सर्वांत जास्त म्हणजे दिवसाला आठ ते साडेआठ हजार मेट्रिक टन कचरा मुंबईतच जमा होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास कंपन्या तयार होत नाहीत. त्यामुळे देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प रखडला आहे. 
  • वाढलेल्या लोकसंख्येमुळे आजारही वाढले आहेत. लोकलमधील गर्दीमुळे क्षय व इतर संसर्गजन्य आजारांचा झपाट्याने प्रसार होतो. अपुरी जागा आणि दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या झोपड्या, अस्वच्छता या घटकांमुळे श्‍वसन आणि त्वचा विकारांचे प्रमाण वाढले आहे. 
  • मुंबईत दिवसाला 4,200 दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची गरज असली, तरी महापालिका 3,750 दशलक्ष लिटर एवढेच पाणी पुरवते. 
  • मुंबई हगणदारीमुक्त जाहीर करण्यात आली असून, झोपड्यांमुळे सार्वजनिक शौचालयांची गरज वाढली आहे. दिवसाला 30 जण वापर करतील, या अंदाजाने शौचकूप बनवलेले असते; प्रत्यक्षात दुप्पट ते तिप्पट व्यक्ती त्याचा वापर करतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News