#worldcup_2019 - पाहा बांगलादेशच्या जबड्यातून वार्नरने काढून घेतला सामना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • तिनशेच्या पलिकडची धावसंख्या पार करण्याच्या बांगलादेशच्या क्षमतेला ऑस्ट्रेलियाने आव्हान दिले.

नॉटिंगहम - तिनशेच्या पलिकडची धावसंख्या पार करण्याच्या बांगलादेशच्या क्षमतेला ऑस्ट्रेलियाने आव्हान दिले. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आजच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या तडाखेबंद दीडशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 49 षटकांत 5 बाद 381 अशी भलीमोठी धावसंख्या उभी केली. 

काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडीजची 321 ही धावसंख्या 42 व्या षटकातच पार करून बांगलादेशने इतर प्रतिस्पर्ध्यांनाही धोक्‍याचा इशारा दिला, परंतु गतविजेत्या आणि ताकदवर ऑस्ट्रेलियाने विंडीजपेक्षाही मोठी मजल मारून बांगलादेशला "रियालिटी चेक' दाखवला. वॉर्नरची 147 चेंडूतील 166 धावांची खेळी कर्णधार ऍरॉन फिन्चचे अर्धशतक आणि उस्वाम ख्वाजाचा 89 धावांचा तडाखा बांगालदेशच्या गोलंदाजांच्या उणिवा स्पष्ट करणाऱ्या ठरल्या. 

त्रिशतकी धावांचा पाठलाग करण्याची हिम्मत बांगलादेशने दाखवलेली असली तरी आज ऑस्ट्रेलियाने हेच आव्हान त्यांच्या समोर ठेवताना प्रथम फलंदाजी स्वीकारली. वॉर्नर- आणि फिन्च हे दोघेही सलामीवर चांगलेच फॉर्मत असल्यामुळे फलंदाजीस उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर बांगलादेशी गोलंदाजांनी क्षमता पणास लागणार हे उघड होते. स्पर्धेत आत्तापर्यंत दोन शतके करणाऱ्या फिन्चने पहिल्या पासून आक्रमक पवित्रा घेतला तर यंदा सावध पवित्रा घेऊन नंतर आक्रमक होणाऱ्या वॉर्नरनेही आज सुरुवात वेगवान केली. त्यामुळे 21 व्या षटकांत त्यांनी 121 धावांची सलामी दिली तेथेच ऑस्ट्रेलिया मोठी मजल मारणार हे निश्‍चित झाले. 53 धावांनंतर फिन्चचा हल्ला रोखण्यात बांगलादेशला यश आले परंतु त्यानंतर वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी अधिक प्रहार केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी केली. त्यमुळे 45 व्या षटकांत ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 313 धावा झळकल्या होत्या. 

वॉर्नर द्विशतकाकडे कूच करत होता. बांगलादेशचे सर्व प्रमुख गोलंदाज अपयशी ठरत होते अशा वेळी सौम्या सरकार या बदली गोलंदाजाने हात दिला आणि त्याने प्रथम वॉर्नरची घोडदौड रोखली त्यानंतर ख्वाजालाही बाद केले या दरम्यान ग्लेन मॅक्‍सवेलने 10 चेंडूत 32 धावांचा झंझावात सादर केला. बांगलादेशचे सुदैव की तो धावचीत झाला. 

संक्षिप्त धावफलक
50 षटकांत 5 बाद 381 (डेव्हिड वॉर्नर 166 -147 चेंडू, 14 चौकार, 5 षटकांर, ऍरॉन फिन्च 53 -51 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, उस्मान ख्वाजा 89 -72 चेंडू, 10 चौकार, ग्लेन मॅक्‍सवेल 32 -10 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, मुस्तफिजूर रहिम 9-0-69-1, सौम्या सरकार 8-0-58-3) 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News