#worldcup_2019 - विराटसेनेचा विजयीरथ पावसाने रोखला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • एक गुणही असे मोलाचा - विराट कोहली
  • सततच्या पावसामुळे मैदान पूर्णतः व्यवस्थित नव्हते, अशा वेळी न खेळणेच योग्य आहे. या सामन्यातून एक गुण मिळवून आम्ही आता पुढचा विचार करणार आहोत

नॉटिंगहॅम -  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना अखेर पावसामुळे होऊ शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून येथे पाऊस पडत होता. हा सामनाही वाया जाणार याचे संकेत अगोदरपासूनच मिळाले होेते. भारत, न्यूझीलंड हे दोन्ही संघ अजूनपर्यंत अपराजित असल्याने या सामन्याबाबत मोठी उत्सुकता होती, पण खेळाडूंसह प्रेक्षकांच्याही आनंदावर पावसाने विरजण घातले.तिन्ही सामने जिंकलेल्या संघाविरूद्ध एक गुण मिळणे हे नसे थोडे, असे मत भारतीय कर्णधार विराट कोहलीने भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर सांगितले. या सामन्यातून दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाले आणि दोघेही अपराजित राहिले.

सततच्या पावसामुळे मैदान पूर्णतः व्यवस्थित नव्हते, अशा वेळी न खेळणेच योग्य आहे. या सामन्यातून एक गुण मिळवून आम्ही आता पुढचा विचार करणार आहोत. रविवारच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी आम्ही नव्या जोमाने तेथे असू. तेथे गेल्यानंतर रणनिती तयार करू आणि त्याच्या अंमलबजावणीवर भर देऊ. जेव्हा मैदानात जाऊ तेव्हा शांत आणि संयमी रहाण्यावर भर असेल, असे विराटने सांगितले.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानाबाहेरचे वातावरण कमालीचे वेगळे असेल, पण संयम राखून डावपेचानुसार खेळ करावा लागेल. क्रिकेट विश्‍वासाठी ही लढत सर्वात महत्वाची असेल. या सामन्यात खेळायला मिळणे हे आमचे भाग्य आहे. असे सांगून विराट कोहली शिखर धवनच्या दुखापतीबाबत म्हणाला, काही आठवडे त्याचे बोट प्लॅस्टरमध्ये राहणार आहे. स्पर्धेच्या उत्तरार्धात आणि उपांत्य सामन्यासाठी तो उपलबद्ध असेल अशी आशा आहे.

आश्‍चर्य नाही - विलियमसन

आम्ही येथे चार दिवसांपासून आहोत, पण सूर्यदर्शन झालेले नाही. त्यामुळे आजच्या दिवसाच्या हवामानाचे आम्हाला आश्‍चर्य वाटले नाही. खेळण्यासाठी सज्ज होत असताना काहीच खेळ करता न येणे चांगले नसते, पण कधी कधी अशी विश्रांती मोलाची ठरते. आता आम्हाला काही दिवसांची आणखी विश्रांती मिळणार आहे; त्यामुळे ताजेतवाने होण्यास चांगला वेळ मिळणार आहे, असे न्यूझीलंड कर्णधार केन विलियमसनने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News