#worldcup_2019 - 'या' ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराकडून विराट कोहलीचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • प्रेक्षकांना शांत राहण्याचा सल्ला देताना त्याचे टाळ्यांनी कौतुक करा, असे हातवारे कोहलीने केले.
  • विराटची ही खिलाडू वृत्ती स्टीव वॉला फारच भावली.
  • नेतृत्व गुण अनेक रूपांतून प्रकट होत असतात.
  • प्रतिस्पर्धी खेळाडूसाठी विराटची ही खिलाडू वृत्ती दर्जेदार कृती होती

लंडन - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्टीव स्मिथला उद्देशून शेरेबाजी करणाऱ्या प्रेक्षकांना शांत राहण्यास आणि स्मिथला प्रोत्साहन देण्याची भारतीय कर्णधार विराट कोहलीने केलेल्या कृतीचे ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार स्टीव वॉने "क्‍लास ऍक्‍ट' (दर्जेदार कृती) अशा शब्दांत कौतुक केले आहे. 

स्टीव वॉ हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी आणि कणखर कर्णधार म्हणून ओळखला जातो. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात काही भारतीय प्रेक्षक स्मिथची हुर्यो उडवत होते. या प्रेक्षकांना शांत राहण्याचा सल्ला देताना त्याचे टाळ्यांनी कौतुक करा, असे हातवारे कोहलीने केले. विराटची ही खिलाडू वृत्ती स्टीव वॉला फारच भावली. नेतृत्व गुण अनेक रूपांतून प्रकट होत असतात. प्रतिस्पर्धी खेळाडूसाठी विराटची ही खिलाडू वृत्ती दर्जेदार कृती होती, असे वॉने म्हटले आहे. 1999 मध्ये वॉच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने विश्‍वविजेतेपद मिळवलेले आहे. 

भारताने 36 धावांनी मिळवलेल्या या सामन्यात विराट कोहली फलंदाजी करत असताना काही प्रेक्षकांनी स्मिथला उद्देशून चिटर चिटर अशी शेरेबाजी केली. कोहलीने या प्रेक्षकांना शांत राहण्यास सांगितले. अशा प्रकारे खेळाडूची हुर्यो उडवणे योग्य नसल्याचे तो हातवारे करून सांगत होता. स्मिथ हे सर्व पहात होता. लगेचच त्याने विराटशी हस्तांदोलन करून त्याचे आभारही मानले होते. त्याचवेळी विराटने या भारतीय प्रेक्षकांच्यावतीने मी तुझी (स्मिथ) माफी मागतो, असेही म्हटले. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने नेहमीच संघर्षपूर्ण होत आहेत. गेल्या वर्षभरात झालेल्या लढतींतून कोणा एका संघाला वर्चस्व गाजवता आलेले नाही. इतका संघर्ष या दोन संघात झालेला आहे. भारतीय फलंदाजांनी चांगली रणनिती आखली आणि त्याची अंमलबजावणीही केली. विकेट न गमावता भक्कम पायाभरणी करण्याचे त्यांचे डावपेच होते, असे वॉने म्हटले आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News