#worldcup_2019 - आता होणार एका गुणाचा खेळ; तीन सामने वाया 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • तीन सामने पावसामुळे वाया गेले. १० पैकी सात संघांना (श्रीलंकेचे दोन सामने) एका गुणावर समाधान मानावे लागल्यामुळे गुणतक्‍त्यातील चुरस अधिक तीव्र झाली आहे.

लंडन - विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू होऊन १५ दिवस झाले आणि १८ वा सामना आज होता, परंतु तीन सामने पावसामुळे वाया गेले. १० पैकी सात संघांना (श्रीलंकेचे दोन सामने) एका गुणावर समाधान मानावे लागल्यामुळे गुणतक्‍त्यातील चुरस अधिक तीव्र झाली आहे. उपांत्य फेरीसाठी विभागून मिळालेला गुण पथ्यावर पडू शकतो, तसेच नुकसानही करणारा ठरू शकतो.

आतापर्यंत पाकिस्तान-श्रीलंका, दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडीज, बांगला देश-श्रीलंका आणि आजचा भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे वाया गेला. यात श्रीलंकेचे दोन सामने असल्यामुळे त्यांना एक-एक असे दोन गुण मिळाले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांचे सामने वाया गेलेले नाहीत.
या एका गुणाचा फायदा घेत न्यूझीलंडने चार सामन्यांतून सात गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. सहा गुणांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहेत, त्यांचेही चार सामने झाले आहेत; तर भारत तीन सामन्यांत पाच गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचे तीन लढतीतून चार गुण झाले आहेत.

पाकला झाला होता एका गुणाचा फायदा

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने १९९२ मध्ये विजेतेपद मिळवले होते, त्या वेळी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांचा संघ पराभवाच्या खाईत असताना पावसामुळे रद्द झाला होता. त्या एका गुणासह त्यांनी उपांत्य फेरीत मजल मारली आणि अंतिम सामन्यात इंग्लंडलाच पराभूत करून विजेतेपद मिळवले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News