#worldcup_2019 - इंग्लंड जिंकला असता, पण श्रीलंका संघ 'याच्या'त बाप ठरला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019
  • तीन दिवसांपूर्वी सर्वाधिक षटकारांच्या विक्रमासह 397 धावांचा डोंगर उभा करणाऱ्या इंग्लंडला आज 233 धावांचे आव्हान पेलले नाही.
  • विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेने संभाव्य विजत्यांच्या शर्यतीत असलेल्या इंग्लंडला धक्का देऊन स्वतःचा दुसरा विजय मिळवला. 

लीडस्‌ - तिनशे धावा सहजतेने करण्याची क्षमता वारंवार सिद्ध करणाऱ्या आणि फलंदाजीसाठी उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर इंग्लिश फलंदाजांचा कस श्रीलंका गोलंदाजांसमोर लागला. दोन फलंदाजांनी अर्धशतके केली तरीही विजय त्यांच्यापासून दूर राहिला. बेन स्टोक्‍सने झुंझार नाबाद 82 धावांची केलेली खेळी अपयशी ठरली. 

इंग्लंडचा हा स्पर्धेतला दुसरा पराभव आहे. अगोदर पाकिस्तानने त्यांचा पराभव केला होता. श्रीलंकेला 232 धावांत रोखल्यावर इंग्लंड सहज विजय मिळवणार अशी शक्‍यता होती, परंतु लतिथ मलिंगाचा अपवाद वगळता अनुभवी गोलंदाज नसलेल्या श्रीलंकेने या धावांही निर्णायक ठरवल्या स्वतः मलिंगाने चार विकेट मिळवून विजयाचा पाया रचला. 

आपल्या दुसऱ्याच चेंडूवर बेअरस्टॉला बाद करणाऱ्या मलिंगाने दुसरा सलामीवीर जेम्स विन्स आणि फॉर्मात असलेल्या जो रूटला बाद करून इंग्लंडची फलंदाजीची खिळखिळी केली. त्यानंतर त्याने जॉस बटलचीही विकेट मिळवली. तीन दिवसांपूर्वी 17 षटकारांचा विक्रम करणारा इायॉन मॉर्गन आज 21 धावाच करू शकला. एक बाजू स्टोक्‍स लढवत होता, परंतु दुसरे प्रमुख फलंदाज बाद झाल्यावर इंग्लंड संघावर दडपण आले आणि तळाच्या फलंदाजांनी पांढरे निशाण फडकवण्यास सुरुवात केली. 

इंग्लंडचा नववा फलंदाज बाद तेव्हा त्यांना 38 चेंडूत 47 धावांची गरज होती, मलिंगा त्याचे अखेरचे षटक टाकत होता त्याच वेळी स्टोक्‍सचा झेल डिसिल्वाने सोडला. त्यानंतर स्टोक्‍सने दोन षटकार, दोन चौकार मारत विजय अवाक्‍यात आणला खरा परंतु नुवान प्रदीरने इंग्लंडचा अखेरचा फलंदाज मार्क वूडला बाद करून श्रीलंकेला शानदार विजय मिळवून दिला. 

तत्पूर्वी, श्रीलंकेच्या सर्व प्रमुख फलंदाजांनी स्वतःहून खराब फटके मारून विकेट गमावल्या. जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी तीन; तर आदील रशिदने दोन विकेट मिळवून संधीचा फायदा घेतला. 

त्रिशतकी धावांचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरणारे कर्णधार करुणारत्ने आणि कुशल परेरा हे दोन्ही सलामीवीर तिसऱ्या षटकात परतले. तो त्यांच्यासाठी मोठा धक्का होता; परंतु विश्‍वकंरडक स्पर्धेतील पहिलाच सामना खेळणाऱ्या अविष्का फर्नांडोने सर्व बंधने आणि दडपण झुगारून मारलेले काही फटके अफलातून होते. या प्रतिहल्ल्यात त्याने आर्चरचा एक चेंडू स्टेडियमच्या बाहेर मारला. एवढी चमक तो दाखवत होता; पण अशाच एका आक्रमक फटक्‍यात तो बाद झाला आणि अर्धशतक एका धावेने हुकले. 

3 बाद 62 या अवस्थेनंतर कुशल मेंडिस आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजकडे डाव सावरण्याशिवाय पर्याय नव्हता. मॅथ्यूजने तर अखेरपर्यंत मैदानात रहाण्यावर भर दिला. या दोघांनी 71 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मेंडिस आणि धनंजय डिसिल्वा यांनी सहाव्या विकेटसाठी 57 धावा जोडल्यावर श्रीलंकेची 6 बाद 190 वरून 232 अशी घसरगुंडी उडाली. 

संक्षिप्त धावफलक
 श्रीलंका - 50 षटकांत 9 बाद 232 (अविष्का फर्नांडो 49 -39 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, कुशल मेंडिस 46 -68 चेंडू, 2 चौकार, अँजेलो मॅथ्यूज नाबाद 85 -115 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, धनंजय डिसिल्वा 29 -47 चेंडू, 1 चौकार, जोफ्रा आर्चर 10-2-52-3, मार्क वूड 8-0-40-3, आदील रशिद 10-0-45-2) वि. 

इंग्लंड - 47 षटकांत सर्वबाद 212 (ज्यो रूट 57 -89 चेंडू, 3 चौकार, इयॉन मॉर्गन 21 -35 चेंडू, 2 चौकार, बेन स्टोक्‍स नाबाद 82 -89 चेंडू, 7 चौकार, 4 षटकार, लसिथ मलिंगा 10-1-43-4, धनंजय डिसिल्वा 8-0-32-2, इसुरू उदाना 8-0-41-2)  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News