#worldcup_2019 - हारलो की धोनीची चूक...मग राहुलनं असे काय झेंडे रोवले होते?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019
  • कॉफी विथ करण कार्यक्रमात हार्दिक पंड्याच्या जोडीला रंग उधळलेला क्रिकेटपटू के. एल. राहुल याचे बॅटींग ऑर्डरमधील नंबर जसे बदलतात तसेच त्याच्याशी नाव जोडले जाते त्या अभिनेत्री आणि मॉडेल्स यांच्या बाबतीत सुद्धा घडते.

कॉफी विथ करण कार्यक्रमात हार्दिक पंड्याच्या जोडीला रंग उधळलेला क्रिकेटपटू के. एल. राहुल याचे बॅटींग ऑर्डरमधील नंबर जसे बदलतात तसेच त्याच्याशी नाव जोडले जाते त्या अभिनेत्री आणि मॉडेल्स यांच्या बाबतीत सुद्धा घडते. सोनल चौहन, निधी अगरवाल आणि अथिया शेट्टी यांच्याशी त्याचे नाव जोडले गेले आहे. यातील बहुतेकींबरोबर त्याचे फोटो सुद्धा सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले आहेत. हा राहुल म्हणून रंगीला आहे असे अजिबात नाही. याचे कारण सोनलने तो नाईस गाय (फार छान व्यक्ती) असे म्हणत त्याच्याशी अफेअर नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्य म्हणजे मैत्रीणींबरोबर डिनरला जाणे किंवा दुसऱ्या एखाद्या मित्र-मैत्रीणीने आयोजित केलेल्या फंक्शनमध्ये कुणाची तरी भेट होणे आणि तेव्हाचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट होणे यांतही काहीच गैर नाही.

यानंतरही राहुलला रंगीला म्हणण्याचे एकमेव कारण म्हणजे करण जोहर यांच्याशी संवाद साधताना त्याने केलेली मन की बात. त्याने याची कबुली देत नंतर माफी सुद्धा मागितली आणि बीसीसीआयने केलेला दंड सुद्धा भरला. त्यामुळेच आपण राहुलला रंगीला म्हणण्यास काही हरकत नाही. तर हा राहुल खरे तर कर्नाटकमधील देशबांधव राहुल द्रविड याचा वारसदार म्हणून उदयास आला आहे.

मुळ राहुलने म्हणजे राहुल द्रविडने संघासाठी अक्षरशः पडेल ती जबाबदारी पेलली. तो विकेटकीपर सुद्धा बनला. यानंतरही या बिचाऱ्या मुळ राहुलवर म्हणजे राहुल द्रविडवर वेगवेगळे शिक्के बसले. आपला अलिकडचा राहुल मात्र लै लकी दिसतो. काही केले तरी त्याच्या अपयशाची कुणीच चिरफाड करीत नाही.

आता रविवारचेच बघा. इंग्लंडविरुद्ध आपली वर्ल्ड कपची मॅच होती. त्यांना हटवून आपण नंबर बन झालो होतो. त्यामुळे सर्वांचे लक्ष होते. शिखर धवन जायबंदी झाल्यामुळे राहुलवर सलामीची जबाबदारी येऊन पडली. दरवेळी त्याने सुरवात चांगली केली, पण जम बसल्यानंतर तो बाद झाला. चांगल्या सुरवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर न करणे ही क्रिकेटमधील सर्वांत मोठी चूक मानली जाते.

या पराभवाचा 11 खेळाडू भारताचे आणि 11 खेळाडू इंग्लंडचे अशी मॅन-टू-मॅन तुलना केली तर राहुलमुळेच विजयाने हुल कशी दिली आणि पराभवाची चाहुल कशी लागली हे स्पष्ट होईल. इंग्लंडच्या जॉन बेअरस्टॉ याने शतक काढले. भारताच्या रोहित शर्मा यानेही शतक ठोकले. बेअरस्टॉ याचा जोडीदार जेसन रॉय याच्या खात्यात 66 धावा जमा आहेत. राहुल मात्र भोपळा सुद्धा फोडू शकला नाही. जेव्हा तुम्हाला 338 धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो तेव्हा भक्कम सलामी मिळाली तर निम्मे नाही तरी किमान पाव काम तरी सोपे होते. इथेच राहुल फलंदाजीत रंग भरू शकला नाही. त्याचा भोपळा रंगाचा बेरंग करणारा ठरला.

भुवनेश्वर कुमार जायबंदी झाला तरी महंमद शमीने त्याची उणीव भासू दिली नाही. इथे धवनची उणीव भरून काढणे राहुलला अद्याप तरी शक्य झालेले नाही. राहुल लवकर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हीच जणू काही ओपनिंगची जोडी बनली. अशावेळी इंग्लंडने आणखी टिच्चून मारा केला. त्यावेळी काऊंटर अॅटॅक केला असता आणि तो फसला असता तर परिस्थिती आणखी बिकट झाली असती. रोहित-विराटला पॉवरप्लेचा फायदा उठविता आला नाही, याचा सारा दोष राहुलला दिला गेला पाहिजे.

प्रत्यक्षात जो अखेरीस खेळला त्या महेंद्रसिंह धोनीला धारेवर धरले जात आहे. क्रिकेटमध्ये पहिल्या 10 षटकांत आणि शेवटच्या 10 षटकांत हाणामारी होते. पहिल्या 10 षटकांत क्षेत्ररक्षणाला मर्यादा असते, हेच शेवटच्या दहा षटकांत फलंदाजाची शैली, तंत्र, अलिकडचे रेकॉर्ड, प्रत्यक्ष सामन्यातील स्थिती, आधीच्या 40 षटकांत क्लिक झालेले, टप्पा गवसलेले गोलंदाज मारा करीत असतात. तेव्हा दडपण सुद्धा जास्त असते. राहुलने भोपळा फोडला नसता आणि त्याने किमान 10 षटके म्हणजे पॉवरप्लेपर्यंत तग धरली असती तर भारताच्या खात्यात 28 पेक्षा नक्कीच जास्त धावा जमा झाल्या असत्या. मुख्य म्हणजे पराभवाचे 31 धावांचे अंतर हे 338 आव्हानासमोरचे आहे हे लक्षात घेतले तर राहुल हा आरोपी नंबर 1 धरायला हरकत नाही. धोनीने पुरेशी इच्छाशक्ती दाखविली की नाही हा मुद्दा वेगळा आहे, पण राहुलचा भोपळा कसा काय दुर्लक्षित राहू शकतो....

क्रिकेटमध्ये जर-तरला स्थान नसते, पण शेवटच्या 10 षटकांत 72 धावा होतात, पण पहिल्या 10 षटकांत 28 धावा झालेल्या असतात. यातील फरकच अखेरीस निर्णायक ठरतो. इंग्रजीमध्ये एक उक्ती आहे Well Begun Half Done याचा अर्थ चांगली सुरवात झाली तर निम्मी मोहिम फत्ते होते. क्रिकेटमध्ये ती लागू करायची असेल तर सलामी महत्त्वाची ठरते. तुमचा एक सलामीवीर शून्यावर बाद होतो तेथेच मोहिम फसते. मग हाताबाहेर गेलेला विजय आवाक्यात आणण्यासाठी धोनीने किती प्रयत्न केले आणि किती केले नाहीत ही चर्चा किती ताणायची हे ज्याचे त्याने ठरवावे.

विराटने फैलावर घेतल्याची कबुली

राहुलला सलामीवीर म्हणून आधीच्या सामन्यांत जम बसविण्याची संधी होती, पण अफगाणणिस्तानविरुद्ध 30-, तर विंडीजविरुद्ध 48 धावांवर तो बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला. तेव्हा रोहित शर्मा आधी बाद झाला होता. मग विराटचा जम बसला होता. तेव्हा राहुलने रिव्हर्स स्वीप करणे म्हणजे तो फाजील आत्मविश्वासाला बळी पडला हेच दाखविते. त्यानंतर विराटने फैलावर घेतल्याची कबुली त्याने दिली होती.
राहुलने पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक काढून सलामीवीर म्हणून सुरवात चांगली केली होती. कॉफी विथ करण कार्यक्रमानंतर त्याने आयपीएलमध्ये सुद्धा शतक फटकावले होते. मुंबई इंडियन्सविरुद्ध मुंबईत त्याने ही कामगिरी केली होती. वर्ल्ड कपपूर्वी सराव सामन्यात सुद्धा त्याने चांगली फलंदाजी केली होती. मग धवनच्या दुखापतीमुळे त्याला वर्ल्ड कपमध्ये सलामीला येण्याची संधी मिळाली. राहुल त्या संधीचा फायदा उठविण्यात अपयशी ठरला आहे हेच खरे.

विंडीजविरुद्ध अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना तो बाद झाला. तेव्हा जेसन होल्डरचा चेंडू चांगला पडला होता, पण मग चांगला चेंडू खेळून काढण्यासाठीच तर टिम इंडियामध्ये 11 जणांची निवड झालेली असते. त्यातही राहुलसारखा रणजी स्पर्धेत चमकलेला फलंदाज त्याचे तंत्र वापरत नसेल तर ते धक्कादायक ठरते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News