#worldcup_2019 - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत क्रिकेटपटूंची वेगळी रुपे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट आणि क्रिकेटपटूंची वेगळी रुपे समोर येत आहेत. यातील ताजे उदाहरण म्हणजे विराट कोहली आणि केन विल्यम्सन या कर्णधारांचे.

बर्मिंगहॅम - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट आणि क्रिकेटपटूंची वेगळी रुपे समोर येत आहेत. यातील ताजे उदाहरण म्हणजे विराट कोहली आणि केन विल्यम्सन या कर्णधारांचे.

एक बॅटला चेंडू लागल्याचे समजून क्रीज सोडून निघून जातो, तर दुसरा कड घेतल्याचे समजूनही क्रीजवर उभा राहतो.  पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज महंमद अमीरच्या उसळत्या चेंडूवर चकला आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती गेला. चेंडूने बॅटची कड घेतल्याचे समजून कोहलीने अपील पूर्ण होण्याची आणि पंचांच्या निर्णयाची देखील वाट पाहिली नाही. लगोलग क्रिज सोडले. त्यानंतर रिप्लेत चेंडू बॅटपासून खूर दूर असल्याचे निष्पन्न झाले होते. अर्थात, या विकेटचा फारसा फरक पडला नाही. भारत अगोदरच मजबूत स्थितीत पोचला होता.

न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यातील परिस्थिती वेगळी होती. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड धावांशी झगडत होते. तेव्हा इम्रान ताहिरने टाकलेले 38वे षटक नाट्यपूर्ण ठरले होते. त्या षटकांत दुसऱ्या आणि चौथ्या चेंडूंवर ग्रॅंडहोमला डेव्हिड मिलरने जीवदान दिले होते. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर चेंडूने विल्यम्सनच्या बॅटची ओझरती कड घेतली होती. गोलंदाज इम्रान ताहिरने अपील केले. पण, झेल घेणाऱ्या यष्टिरक्षक क्वींटन डी-कॉकला त्याची खात्री नव्हती. त्यामुळे त्याने फलंदाज थोडक्‍यात बचावल्याने निराशा व्यक्त केली होती.

त्या वेळी रिप्लेमध्ये चेंडूने बॅटची कड घेतल्याचे स्पष्टपणे कळून आले. तेव्हा विल्यम्सन 79 धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने नाबाद शतक झळकावून न्यूझीलंडला विजयी केले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसीने यष्टिरक्षक डी-कॉकची प्रतिक्रिया आम्हाला महत्त्वाची वाटली. त्यामुळे आम्ही रिव्ह्यू घेतला नाही, असे सांगितले. आम्ही खूप लांब होतो, डी-कॉक सर्वात जवळ होता. त्यामुळे आम्ही त्याच्या म्हणण्याला पसंती दिली, असेही तो म्हणाला. 

चेंडूने बॅटची कड घेतल्याचे केनला नक्कीच समजले असणार. त्याने खिलाडूवृत्तीने मैदान सोडायला हवे होते. - पॉल ऍडम्स, द. आफ्रिकेचा माजी फिरकी गोलंदाज 

चेंडूने बॅटची कड घेतल्याची खात्री नव्हती. बाद दिले असते, तर मी देखील 'रिव्ह्यू' घेतला असता.  - केन विल्यम्सन, न्यूझीलंडचा कर्णधार

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News