राज्य मंडळाचे २१ हजार विद्यार्थी प्रवेशाविना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019
  • अकरावीच्या तिसऱ्या यादीत ५० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश 

मुंबई - मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी गुरूवारी (ता.१) दुपारी ३ वाजता जाहीर झाली. त्यात ५० हजार ६३६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून अद्यापही २२ हजार ७७८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. यामध्ये सर्वाधिक म्हणजे २१ हजार २१७ विद्यार्थी राज्य मंडळाचे आहेत. या विद्यार्थ्यांना आता विशेष फेरीची वाट पाहावी लागणार आहे.

तिसऱ्या यादीसाठी १ लाख ०८ हजार ५५४ हजार जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ७३ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले होते. त्यातील ५० हजार ६३६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक वाणिज्य शाखेच्या ३४ हजार ०६५, विज्ञान शाखेच्या १२ हजार ५४२, कला शाखेच्या ३ हजार ६९० तर एमसीव्हीसीच्या ३३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. तसेच पहिल्या पसंतीचे महाविद्यालय १५ हजार ५४४ विद्यार्थ्यांना, दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय ९ हजार ८१५ विद्यार्थ्यांना मिळाले आहे. या फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २, ३ आणि ५ ऑगस्टला दुपारी ३ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेशनिश्‍चित करावा लागणार आहे. 

ज्या विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता यादीसाठी वाट पाहायची असेल, त्यांना ६ व ७ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम बदलता येतील. तसेच ज्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलायचे नसतील, त्यांचे पूर्वीचेच पसंतीक्रम ग्राह्य धरून विशेष फेरीत प्रवेश देण्यात येईल. या फेरीमध्ये प्रवेशासाठी एसएससी मंडळाच्या ६७ हजार ९९५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४६ हजार ७७८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तसेच सीबीएसई मंडळाच्या २ हजार २१ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ४४१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. आयसीएसई मंडळाच्या २ हजार ११८ पैकी १ हजार ४४९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. 

पहिल्या पसंतीचा प्रवेश नाकारणाऱ्यांना संधी 
पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यानंतरही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच नवीन विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता यादीमध्ये अर्ज करता येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News