टीसीएसच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पर्धेत 'जिका'चा आकाश त्रिपाठी ठरला विजेता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 13 November 2019

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद अर्थातच (जिका)ने गेल्यावर्षी अमेरिकेत झालेल्या "एसएई बाहा'त डंका वाजविल्यानंतर यशाचा सिलसिला यावर्षीही कायम ठेवला आहे.

औरंगाबाद : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद अर्थातच (जिका)ने गेल्यावर्षी अमेरिकेत झालेल्या "एसएई बाहा'त डंका वाजविल्यानंतर यशाचा सिलसिला यावर्षीही कायम ठेवला आहे. टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) तर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) स्पर्धेत जिकाच्या आकाश त्रिपाठीने विजेतेपद पटकावले आहे. सोबतच रोख तीन लाख रुपयांचे बक्षीसही मिळवले आहे. टीसीएसने पहिल्यांदाच याप्रकारच्या स्पर्धेचे आयोजन केले होते.

टीसीएस कंपनीने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी देशात पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पर्धा घेतली. स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा मंगळवारी (ता. 12) करण्यात आली. देशभरातील एक हजार महाविद्यालयांतील 30 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. ऑनलाईन प्रश्नमंजुषा झाली, तीन वेगवेगळ्या पातळ्या पार केल्या. विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग वापरून प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडविण्याचे उपाय शोधून काढले. अंतिम स्पर्धेसाठी शोधून काढलेल्या उपायांचा डेमो सादर केला. यातून अंतिम फेरीसाठी 20 स्पर्धक पात्र ठरले. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना टीसीएसकडून प्रोव्हिजनल जॉब ऑफर्स देखील देण्यात आल्या आहेत.

स्पर्धेचे विजेते अन्‌ उपविजेते,जिकाचा आकाश कमलेश त्रिपाठी विजेता ठरला. विजेत्या विद्यार्थ्याला रोख तीन लाख रुपयांचे परितोषिक आणि 'द यंग सुपर ब्रेन ऑफ एआय' हा किताब देऊन गौरविण्यात आले. उपविजेतेपद विभागून देण्यात आले. नवसारी येथील एस. एस. अगरवाल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ऍण्ड टेक्‍नॉलॉजीचा स्नेह मेहता आणि जोधपूर आयआयटीचा हर्षित शर्मा यांनी विजेतेपद मिळवले. पहिल्या आणि दुसऱ्या उपविजेत्यांना अनुक्रमे दोन लाख रुपये व एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.माहिती तंत्रज्ञान, सल्ला आणि व्यवसायासाठी आवश्‍यक सुविधा पुरविणारी आघाडीची जागतिक कंपनी म्हणून टीसीएसची ओळख आहे. विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपुर्ण विचार आणि संकल्पनांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी टीसीएसने या स्पर्धेचे आयोजित केली होती.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News