चोक्‍सी हवाई रुग्णवाहिकेतून येईल का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019
  • उच्च न्यायालयाची विचारणा; वैद्यकीय अहवाल देण्याचे निर्देश

मुंबई : पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी हवाई रुग्णवाहिकेतून (एअर ॲम्ब्युलन्स) भारतात येऊ शकतो का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. त्याच्या वैद्यकीय अहवालाची स्कॅन केलेली कागदपत्रे सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) द्यावीत आणि जे. जे. रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी सीलबंद अहवाल दाखल करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

सध्या ॲटिंग्वा येथे वास्तव्य असलेल्या चोक्‍सी याच्यावर मागील वर्षी बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. आपल्यावर अन्य उपचार सुरू असल्याने डॉक्‍टरांनी प्रवास करण्यास मनाई केली आहे, असे प्रतिज्ञापत्र त्याच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. याबाबत त्याने उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर सोमवारी (ता. २४)  न्या. इंद्रजित महंती आणि न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

चोक्‍सीने १ जुलैपर्यंत वैद्यकीय अहवालाची सर्व कागदपत्रे स्कॅन करून दाखल करावीत आणि ईडीने जेजे रुग्णालयातील तज्ज्ञांचे मत घ्यावे. चोक्‍सीची प्रकृती आणि त्याला एअर ॲम्ब्युलन्सने प्रवास करणे शक्‍य आहे का, याबाबत माहिती देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

‘ईडीने अँटिग्वाला यावे’
प्रकृतिअस्वास्थ्यामुळे आपण भारतात येऊ शकत नाही; ईडीच्या अधिकाऱ्यांनीच ॲटिंग्वाला यावे किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चौकशी करावी, असेही मेहुल चोक्‍सी याने सुचवले आहे. ईडीने रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यामुळे आपल्याला ॲटिंग्वाहून मायामीला जाता येत नाही. त्यामुळे चांगले उपचार मिळणे कठीण झाले आहे, असेही त्याच्या वतीने उच्च न्यायालयाला सांगण्यात आले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News