हे होणार पुण्याचे पालकमंत्री; हालचाली सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

पुणे: पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट खासदार म्हणून दिल्लीत गेल्यानंतर आता पुण्याचे पालकमंत्री कोण होणार या चर्चेला जोरदार सुरवात झाली आहे. यासाठी भाजपमधील चार तगडी नावे चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचं असेल तर भाजपला पुणे जिल्ह्यातलं राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने पालकमंत्री म्हणून तगड्या नावांची चाचपणी सुरू केली असल्याचे समजते. पालकमंत्री जरी सत्ताधारी भाजप ठरवणार असले, तरी ते नाव राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व मोडून काढणारे असावे असे सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सोबतच, दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांच्या नावाचीही चर्चा आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात राहुल कुल यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पत्नी कांचन कुल यांना रिंगणात उतरवून जोरदार टक्कर दिली होती, त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे.

तसेच, भाजपच्या वाटेवर असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप काटशह देण्यासाठी वापर करू शकतो. पालकमंत्रिपदी विखे पाटलांचं नाव पुढे करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. भाजपमध्ये आल्यावर विखेंना कृषी खातं दिलं जाणार असल्याच्या चर्चा आहेत. सोबतच त्यांचा राष्ट्रवादीला असलेला विरोध पाहता राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी विखेंना पुण्याचे पालकमंत्री बनविण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत नगरच्या जागा वाटपावरून नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधीपक्ष नेतेपदासोबत आमदारकीचाही राजीनामा दिला आहे.

पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजपचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बाळा भेगडे यांचेही नाव चर्चेत आहे. भाजपचे ते जुने सहकारी असून मावळ लोकसभा मतदारसंघात युतीची जागा निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच, ते राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्याही जवळचे मानले जात असल्याने पालकमंत्रिपदासाठी त्यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News