मोठी माणसे 'मोठी' का होतात?

लक्ष्मण जगताप
Monday, 19 August 2019

मोठ्या माणसांची वैचारिक पातळी महान असते. मोठ्या व्यक्ती मेहनती आणि कष्टाळू असतात. म्हणून त्या मोठ्या होतात. त्यांच्या मनात सतत नाविन्याचा ध्यास असतो.

मोठी माणसे मोठी का होतात?  यामागे काय रहस्य असते. किंवा त्यांच्या कडे असे काय असते जे सामान्य माणसांकडे नसते? सामान्य माणसे आणि मोठी माणसे यात कोणता फरक असतो हे शोधण्यासाठी आपण संशोधनात्मक चिंतन केले तर याची आपल्याला अनेक कारणे दिसून येतील.

मोठ्या माणसांचे ध्येय ठरलेले असते. आपल्या ध्येयावर त्यांची प्रखर निष्ठा असते. त्यांना सतत स्वकार्यमग्न आणि उद्योगी राहायला आवडते. वेळेच्या बाबतीत अतिशय दक्ष असतात. प्रत्येक मिनिट त्यांच्यासाठी महत्वाचा असतो. हाती घेतलेल्या कार्यात एकाग्रतेने आणि कुशलतेने नियोजनपूर्वक काम करतात. त्यांचे स्वप्न आणि विचार सामान्य माणसांपेक्षा खूप उच्च असतात. इतरांच्या नको त्या गोष्टीत लक्ष घालायला त्यांना वेळ नसतो.

आपले व्हिजन त्यांना सतत आतून प्रेरित करत असते. टिका, टिपण्णी, निंदा या गोष्टीकडे ते सकारात्मकतेने पाहतात. तेच सामान्य माणसाला जमत नाही. थोड्याशा अपयशाने ते विचलित न होता पुन्हा जोराने मुसंडी मारण्यात तरबेज असतात. मोठ्या माणसांची मानसिक कणखरता म्हणजेच मनाची शक्ती जबरदस्त असते.

संकटाशी दोन हात करताना मोठ्या व्यक्ती कधीही हतबल होत नाही. कोणताही निर्णय घेताना खूप दूरदृष्टीपणे आणि विचारपूर्वक घेतात. मोठ्या व्यक्ती इतरांच्या विचारांचा आदर करतात.  त्या विचारांचा सन्मान करतात. 

कोणताही शिष्टाचार न पाळता सामान्य माणसांमध्ये मिसळतात. त्यांना समजून घेतात. मोठ्या माणसांची वैचारिक पातळी महान असते. मोठ्या व्यक्ती मेहनती आणि कष्टाळू असतात. म्हणून त्या मोठ्या होतात. त्यांच्या मनात सतत नाविन्याचा ध्यास असतो.

खूप जिद्दीने आणि चिकाटीने आपले ध्येय गाठतात. मोठ्या माणसामध्ये कमालीचा आत्मविश्वास आणि धमक असते. मोठी माणसे आपल्या बरोबरील माणसांना प्रेरीत करत असतात. मोठी माणसे संकटसमयी शांत आणि संयमाने परिस्थिती हाताळतात. मोठी माणसे संधीवर स्वार होऊन कर्तृत्व गाजवितात.

अशक्याला शक्य करण्याची ताकद त्यांच्या मनगटात असते. मोठी माणसे नेहमी आनंदी आणि उत्साही असतात. सामान्य माणसे आणि मोठी माणसांचे वेगळेपण या आणि अशा अनेक गोष्टीमुळे आढळून येते. म्हणून तर ती सामान्यांपेक्षा मोठी होतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News