'नवरा' सांगेल तो उमेदवार का निवडायचा?

वर्षा कुलकर्णी
Monday, 14 October 2019

आमच्या सोसायटीतल्या एक दबंग काकू म्हणाल्या, "का हो तुम्हाला तुमचं स्वत:चं मत आहे का नाही? आता बस्स झालं, जो काम करेल त्यालाच मत द्यायचं."

नवरात्रीचे नवरंग कसे वाऱ्याच्या झुळकीसरशी सरले. अंगावर ल्यायलेल्या साड्या-ड्रेसचे रंग मनातही उतरत होते. आता पुन्हा मानेवर पट्टी ठेवून सोसायटी कामाला लागली. संसाराचा गाडा उचलता उचलता ही स्त्री शक्ती खरेतर स्वतःच्याच ओझ्याखाली दबलीय की काय असेच वाटू लागले. परवाचीच गोष्ट, संध्याकाळची वेळ होती. दिवसभराच्या गिरणीतून पीठ झाल्यावर महिलांसाठी सोसायटीच्या तळावरचा कट्टा आता विश्रांतीकट्टा बनला आहे.

बहुतेक गृहिणी असलेल्या आमच्या सोसायटीतील गप्पांचे विषयही दिवसभरातील कामाच्या रहाटगाडग्यासारखे तेच ते तेच ते... साड्या, वाढलेली महागाई आणि अनुपस्थित असलेल्या बायकांविषयीच्या गॉसीप. आजही तसेच सुरू झाले. नवरात्रीतील साड्यांवरून सुरू झालेली गप्पांची रेल्वेगाडी थेट महाग झालेल्या कांद्यापर्यंत पोहचली. कांदा महाग झाला, आता त्या पाठोपाठ टोमॅटो महाग झाले. सकाळ-संध्याकाळ कोणती भाजी करायची? हा कॉमन प्रश्न या साऱ्याच गृहिणींना पडला होता. या गप्पांतूनच बोलता बोलता पुढे विषय निघाला राजकारणाचा. निवडणुका जवळ आल्या आहेत. मतदान कोणाला करणार वगैरे चर्चा सुरू झाली. आमचे ‘हे’ सांगतील त्यांनाच मी मत देते. एक काकू अगदी सहज बोलून गेल्या.

आमच्या सोसायटीतल्या एक दबंग काकू म्हणाल्या, का हो तुम्हाला तुमचं स्वत:चं मत आहे का नाही? आता बस्स झालं, जो काम करेल त्यालाच मत द्यायचं. काय ही आता नेतेगिरी करायला लागली की काय, अशाच भावना सगळ्यांच्या चेहऱ्यांवर; पण कोणीच काही बोलले नाही. खरे तर बहुतेकांची मते अशीच तयार झालेली असतात. आमचे ‘हे’ सांगतील तो उमेदवार, आमचा दादा (खरे तर हा दादा म्हणजे हिचाच मोठा मुलगा बरं!) सांगेल तो उमेदवार किंवा आबांनी सांगितलंय की यावेळी हाच उमेदवार निवडून द्यायचा. नाती वेगळी असतील; पण भाव सगळे असेच... गृहिणी असो वा कमावती बाई, राजकारणावर सहसा गप्पा मारताना फारशा दिसत नाहीत. 

राजकारण हा पुरुषांचा आवडीचा विषय, असेच जणू चित्र आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच महिला राजकारणांवर बोलताना दिसतात. खरं तर मतदारांमध्ये पन्नास टक्के स्त्रियाच असतात. मग त्यांच्या प्रश्नांनाही तेवढेच महत्त्व आहे, जेवढे इतर प्रश्नांना आहे. सार्वजनिक ठिकाणी गैरसोय असणाऱ्या महिलांच्या स्वच्छतागृहापासून ते महिलांच्या सुरक्षेपर्यंत अनेक प्रश्नांना महिलांना तोंड द्यावे लागते. ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न आणखीन वेगळे असतात. पायाभूत सोयीमध्ये आरोग्य सेवा, पाणी, स्वच्छता, रस्त्यावरील दिव्यांची सोय, अशा मूलभूत सोयीसुविधांचा अनेकदा अभाव दिसून येतो.

दरवर्षी निवडणुका जवळ आल्या की, ताई माई, आक्का असे म्हणत दादा, भाऊ, साहेब दाराशी येत असतात; पण यातले कितीजण या ‘ताई-माई’चे प्रश्न समजून घेतो हे पाहाणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून महिला जेव्हा विचार करू लागतील, तेव्हा खऱ्या अर्थाने महिलांना त्यांच्या मताचे महत्त्व समजू लागेल. महिला आता मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांचा वापर करत आहेत. तेव्हा व्हॉटस्‌ ॲप, फेसबुक, ट्विटर, वृत्तपत्रे यांचा उपयोग करून, आपला आमदार, खासदार कसा असला पाहिजे, याबद्दल चर्चा करायला हवी. त्यांनी आधी केलेल्या कामाची शहानिशा करायला हवी, त्यांच्या बद्दलच्या सर्व माहितीचा अभ्यास करून मगच आपले मत कोणाला द्यायचे.

हे ठरवायला हवे. वेळोवेळी महिलांनी पुढाकार घेऊन आपल्या मागण्या या उमेदवारांपर्यंत पोहचवायला हव्यात. शासनाने महिलांसाठी कोणत्या योजना सुरू केल्या आहेत, त्यांचा मागोवा घेऊन त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. घराच्या वाढणाऱ्या किमतीपासून किराणामालाच्या वाढत्या किंमतीपर्यंत, मुलांच्या वाढत्या शालेय खर्चापासून ते महाग झालेल्या भाजीपाल्यापर्यंत सर्वांचा परिणाम महिला वर्गावर होत असतो. गृहिणींना हातात मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशात अनेक खर्च भागवायचे असतात.

अशा वेळी पैशाचे गणित आणि त्याच्याभोवती असणारे राजकारण तिला समजले पाहिजे. आपण निवडून दिलेल्या उमेदवाराचा तो ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतो त्या पक्षाचा आणि आपल्याला मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा समन्वय समजून घेता यायला हवा. यासाठी आपले मत अमूल्य आहे, हे लक्षात घ्यायला हवे. बाकी ‘आमचे हे’ जे काही सांगतात ते त्यांना सांगू देत. मतदान गुप्त असते, तिथे तुमचे ‘हे’ थोडीच बघायला येणार आहेत!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News