मुलांचे चित्र समजावून घेताना...

अँड. छाया गोलटगावकर
Saturday, 29 June 2019

एक दिवस आभा भेटली, तिच्याशी मी बोलले, तिने ओले रंग द्यायला सुचवलं. दुसऱ्या दिवशी अंगणात मी त्यांना ओले रंग, ब्रश असं साहित्य दिलं.

मुलांची चित्रं समृद्ध होण्यात शिक्षक, पालकांची महत्त्वाची भूमिका असते, याची कित्येकदा आपल्याला जाणीव नसते. पालक व शिक्षक मुलांच्या चित्रांवर काय व कशी प्रतिक्रिया, प्रतिसाद देतात यानुसार मुलांचं चित्रं बहरतं किंवा कोमेजतं. आनंदघरी आलेलं 3 वर्षाचा मूल, नील, वर्षभरापासून शाळेत जात होतं. शाळेत ज्याप्रकारे चित्र घेतली गेली त्यातून या लहानग्याची चित्र काढणं बंद झाली. मी त्याला कागद आणि क्रेयॉन्स दिले की नील म्हणायचा," चित्र काढण्यासाठी तुम्ही माझा हात पकडा." खरंतर मुक्तपणे  रेघोट्या मारण्याचं त्याचं वय पण मोठ्यांच्या सूचनांमध्ये त्याचे चित्र हरवलं होतं. चार दिवस मी रोज त्याच्याजवळ रंग सामग्री देत होते, चित्र काढण्यासाठी. चारही दिवस मुल माझा हात पकड असं म्हणत होतं. काय करावं कळेना.

एक दिवस आभा भेटली, तिच्याशी मी बोलले, तिने ओले रंग द्यायला सुचवलं. दुसऱ्या दिवशी अंगणात मी त्यांना ओले रंग, ब्रश असं साहित्य दिलं. ही कल्पना मात्र काम करून गेली. नील ने एवढी चित्र काढली, ब्रशने, हाताच्या बोटांनी, अगदी पायाने सुद्धा, पायांचे तळवे रंगवले आणि पूर्ण अंगणभर फरशीवर उमटवणं चाललं होतं. त्यादिवशी तासभर ते मूल रंगांमध्ये खेळत होतं. कमालीचा आनंद होता त्याच्या चेहऱ्यावर.  या यशस्वी प्रयोगानंतर मात्र त्यांनं कधीही चित्र काढण्यासाठी माझा हात पकडा असं म्हटलं नाही. स्वतःहून विविध माध्यमं वापरून अत्यंत उत्तम चित्र ते मूल काढतं. म्हणून सूचना कशा दिल्या जातात हे महत्त्वाचं आहे. चुकीच्या सूचना व चुकीच्या पद्धतीने दिलेल्या सूचना यामुळे मुलं demotivate  होतात. काही वेळा चित्र काढणं थांबतं. म्हणूनच पालक- शिक्षक यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या सूचनांचा थेट परिणाम मुलांच्या चित्र बहरण्यावर किंवा कोमेजण्यावर, थांबण्यावर होतो. खरंतर सूचना देऊच नये. मग, काय करावं? तर पालकांनी व शिक्षकांनी, मुलांसोबत काम करणाऱ्या प्रत्येकानं मुलांचे चित्र म्हणजे काय? हे समजून घेणं आवश्यक आहे. 

मुलांच्या चित्रकलेचे काही टप्पे आहेत, ते आपल्याला एखादी तज्ञ व्यक्तीच सांगू शकते.

आभा भागवत, चित्रकर्ती, आर्टिस्ट अँड  चाइल्ड आर्ट फॅसिलिटेटर, यांचं मुलांच्या चित्रकला वाढीचे टप्पे असं शिबिर आयोजित केलं. आतापर्यंत आनंदघरमध्ये अशी तीन शिबिरं झाली. आभाताईचे या विषयावर एकूण 25 शिबिरं झाली.

शिबिराची सुरुवात पालकांच्या व मुलांच्या एकत्रित चित्र काढण्याने झाली. चित्र काढण्यासाठी काही सूचना दिल्या गेल्या,
१) चौकोनात आकाराबाहेर रंग न जाऊ देता चित्र काढा.
२) कुठलंही झाड काढा.
३) आपल्या मनातलं चित्र काढा.

ते काढताना जितके नियम मोडता येईल तितके नियम मोडून चित्र काढा. 
या सूचनेनुसार पालक -शिक्षकांनी चित्र काढण्याचा प्रयत्न केला. मग त्यांना विचारण्यात आलं, या सूचनांसहित चित्र काढताना मनात काय विचार आले? वेगवेगळ्या आणि सुंदर प्रतिक्रिया, प्रतिसाद आले. कोणी म्हणालं, ठरलेल्या चौकोनात चित्र काढणं अवघड गेलं. कोणी म्हणालं, चौकोनाबाहेर रंग जाऊ न देता रंगवणं, एक प्रकारचा ताण जाणवत होता. कुठलंही झाड काढा म्हटलं तर चटकन कुठलं झाडही आठवत नव्हतं. शिवाय झाड म्हटलं की हिरवा रंग(पान), वेगळे विचार येत नव्हते. मनातलं चित्र काढताना नियम मोडणं किती कठीण आहे हे कळलं. एका साचेबद्ध विचारातून आपली सुटका नाही, त्यामुळे कल्पकतेला वाव मिळत नाही, असं लक्षात येतं. चित्र म्हणजे केवळ कागदावर काहीतरी उमटवणं नाही, तर तो एक विचारांचा प्रवासआहे, मेंदूच्या उलथापालथीचा तो एक प्रवास आहे. म्हणूनच तो समजावून घेणं आवश्यक आहे.

आभाताई म्हणाली, "आता मुलांचं चित्र बघूया, मुलं अशा कुठल्याही विचारांमध्ये अडकलेली नसतात. खूप मोकळा विचार करतात. आकारात रंगवणं  हा  मुलांसाठी अगदी निर्बुद्ध (stupid activity) उपक्रम आहे. मुलांचं चित्र नियम मोडणार असतं आणि ते त्यांना सहज जमतं. आपण आपलं कंडिशनिंग त्यांच्यावर थोपवू बघतो, आणि चूक -बरोबरच्या नादात मुलांचं चित्र हरवतं."
 
मुलांच्या चित्रकलेचे टप्पे सांगताना सोयीसाठी वेगवेगळे वयोगट सांगितले आहेत. 

साधारणपणे 9 महिन्याचं  मूल  जे वस्तू पकडू लागतं, ते चित्र काढायला लागतं. या टप्प्यावर चित्र काढण म्हणजे एकावर एक घासलं की, (कागदावर खडू, भिंतीवर खडू) काहीतरी उमटतं हे कळायला लागतं आणि इथूनच  चित्रकला  सुरू होते. परंतु मूल  तोंडा रंग घालेल म्हणू त्यांना  त्यापासून दूर ठेवलं जातं. साधारणपणे २ ते ४ वयोगटाची मुलं रेघोट्या काढणं यात मग्न असतात. आपल्यासाठी त्या रेघोट्या असतात, त्यांच्यासाठी ते चित्र असतं. आपण त्यांना विचारलं, 'हे काय काढलं आहेस?' तर ते व्यवस्थित सांगू शकतात. उदा. आई, बाबा, ताई, दादा म्हणजे ते काढताना त्यांचा विचार चालू असतो. मनात काही कल्पना असते. त्यांच्या कल्पनेतून कागदावर उतरत असतं. त्यामुळे रेघोट्या हे एक सुंदर चित्रचं असतं. 

4 ते 6 वयोगटात थोडा आकार जमायला लागतो. हल्ली मुलं स्क्रीनवर चित्र काढतात. परंतु स्क्रीनवर चित्र काढणं वाईट आहे. मुलं कागद सर्व देशांनी फिरवून संपूर्ण कागदावर चित्र काढतात, तसं स्क्रीनवर घडत नाही. ओरिइंटेशन बदलत नाही. स्क्रीन फिक्स होते. 

चित्र काढणं ही स्वतःची एक प्रक्रिया आहे. त्यामुळे मुलांना चित्र काढण्यासाठी सूचना देऊ नका. स्वतःला व्यक्त होण्याचं हे  एक सुंदर माध्यम आहे, ते मुलांना भरपूर वापरु दया.

एका पालकांनी सुंदर अनुभव सांगितला. आजी-नातीचं घट्ट नातं. आजी वारली तर नात सतत आजी आजोबा हातात हात घालून बसले आहेत असं चित्र काढत होती. कित्येक दिवस हे चित्र काढणं चालू होतं. यावर आभाताई म्हणाली, "इट्स अ थेरपी, इट्स अ हीलींग प्रोसेस." 

मूल असं व्यक्त होतं. विविध माध्यमातून व्यक्त होत. सजगतेने बघितलं तर आपल्याला ते लक्षात येऊ शकेल. आनंदघरी एकदा एक पालक मला सांगू लागले की सध्या त्यांचा मुलगा, 4 वर्षांचा, एका बाळाचे चित्र काढतो आणि त्या बाळाच्या डोळ्यात पाणी, अश्रू असतात. मी त्याला विचारलं पण त्याला काही सांगता येईना. मी म्हटलं, "वाह, छानच आहे. आनंदघरमध्ये छोटी मुलगी येते. तिला तिच्या आईची आठवण येते. त्यावेळी तिला रडू येतं. तो तिच्याजवळ बसून आई येणारच आहे असं सांगतो. त्या दोघांचं छान बोलणं चालू असतं." 

मलाही छान वाटलं की त्याचं संवेदनशील मन चित्रातून सुंदर व्यक्त झालं.

आभाताईने सांगितल्यानुसार ६ ते १० वर्षे या वयात योजनाबद्ध चित्र काढली जातात. 3-3 वर्षे तीच ती चित्र काढली जातात. पण तो एक उपचाराचा, थेरपीचाही भाग आहे. मुलांवरचे  ताण, भीती यातून बाहेर पडण्याचा त्यांचा तो एक मार्ग आहे. चित्राची  रचना मांडणी

याविषयी प्रयोग सुरू होतात. चित्र असं असावं असे आदर्शही या वयात तयार होतात. १० ते १२ वर्षे या वयोगटातली मुलांचा जास्तीत जास्त वास्तव चित्र काढण्याकडे कल असतो. कित्येकदा मुलांना चित्र दाखवायचं नसतं ते त्यांचं एक्स्प्रेशन असतं. 

एका पालकांनी असा प्रश्न विचारला की माझा मुलगा सतत काळा रंग वापरतो. यावर आभाताईचं म्हणणं होतं, 'मूल कुठलाही रंग वापरू शकतं व हवं तितकं. कित्येकदा काळा रंग नकारार्थी, आपल्या मनात असतो. काहीवेळा काहीतरी वाईट चाललं आहे, याच्याशीही तो जोडला जातो, परंतु असं करायला नको. कारण आपण त्यातले अभ्यासक आहोत, तज्ञ नाही, थेरपिस्ट नाही. आर्ट थेरपी जाणणारे व विश्लेषण करणारे लोक वेगळे असतात, त्यांचा त्या विषयीचा अभ्यास असतो त्यामुळे आपण judge करू नये." 

एका पालकाने याविषयी फार सुंदर अनुभव सांगितला. मोठयांच्या दृष्टीने काळा रंग उगाच नकारार्थी समजला जातो. मुलं मात्र काळा रंग आवडीने वापरतात. 5-6 वर्षाच्या मुलीने काळा ढग आनंदी व पांढरा ढग दुःखी असं चित्र काढलं. कारण विचारल्यावर तिनं सांगितलं की काळ्या ढगाकडे पाणी आहे, पांढऱ्या ढगाकडे पाणी नाही. यावर चर्चा झाली. मुलांचं रंग वापरणं, चित्र काढणं, त्यामागचा विचार, तो विचार सांगता येणं. ही सर्व एक प्रक्रिया आहे, चित्राचा प्रवास आहे. या प्रक्रियेला (process) जास्त महत्व आहे. 
 
किती महत्वाची गोष्ट आहे ही! मुलांच्या  चित्रावरून, रंग वापरण्यावरून, त्यांच्या- वर्तनावरून, त्या विषयाचा अभ्यास नसताना त्यांना judge केलं जातं व शिक्के मारले जातात. असं व्हायला नको. यामुळे मुलांचे चित्र हरवतं, बंद होतं हे आपल्या लक्षात येत नाही.

मुलांच्या फेजेस असतात त्यानुसार चित्र -रंग बदलत जातं. बारा वर्षापर्यंत शक्यतो कोणाची कॉपी करून चित्र काढणं नको, टाळायला हवं. कार्टून्स तर अजिबात नको. मुलांनी स्वतः मुक्तपणे अभिव्यक्त होणं ही  या वयाची गरज आहे. आणखी एका पालकांनी विचारलं, 'मुलांना चित्रकलेच्या क्लासला घालावं का?' आभाताई,'शक्यतो घालू नये, त्यांना आपली आपलीच भरपूर चित्र काढून द्यावीत. त्यांना भरपूर माध्यम द्यावीत. नवनवीन प्रयोग करू द्यावेत. चित्रकलेच्या परीक्षेसही बसवू नये. नववी-दहावीच्या आधी तर नाहीच.' 

१३ ते १६ वर्षे या वयोगटात चित्रकलेचे शिक्षण घ्यायला सुरुवात करावी. त्याआधी रंगांशी भरपूर मस्ती करावी. या टप्प्यावर मुलांच्या चित्रात काही ठळक परिणाम दिसतात.
१) मुलांची नैसर्गिक वाढ कशी आहे? २) सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे? ३) शिक्षण-प्रशिक्षण काही घेतलय का? 
मात्र १३ च्या आत तर तंत्र (टेक्निक) शिकणं नको. त्यामुळे क्लास नको'. 

या शिबिरात शिक्षक- पालकांच्या मनात किती समज-गैरसमज, कितीतरी प्रश्न होते आणि या प्रश्नांना उत्तर देणारे त्यांना सहजासहजी कुणी सापडत नाही. म्हणून या शिबिराचं महत्व खूप आहे.  तज्ञ व्यक्ती या प्रश्नांची योग्य पद्धतीने उत्तरं देऊ /शकतात. शिबिरामध्ये थेअरी आणि प्रत्यक्षकाम हातात हात घालून जात असत. शिवाय प्रत्येक टप्प्यावर चर्चा प्रश्न, काही नवीन अनुभव सांगणं, संवादही चालू असतो. मुलांची चित्र, प्रसिद्ध चित्रकारांची चित्रं, फिल्म हाही या शिबीराचा भाग असतो. त्यामुळे पालक शिक्षक शिबिर म्हणजे तज्ञ व्यक्ती येणार व काहीतरी व्याख्यान देणार असं ते स्वरूप राहत नाही. त्याचा खूप जास्त फायदा पालक शिक्षकांना होतो.

शिबिरात चित्र व चित्रामागचा विचार असा सुंदर प्रवास घडतो, शिवाय शिबिरात घडणाऱ्या प्रक्रियेमुळे पालक-शिक्षकांना रिअलायझेशन होण्याची शक्यता, नवीन दृष्टिकोन मिळण्याची शक्यता, वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता मिळू शकते. या एकाच शिबिरात सगळं समजतं असं नाही म्हणता येणार, परंतु किमान या अभ्यासाची योग्य दिशेने सुरुवात झाली असं नक्की म्हणता येईल.

प्रशिक्षित पालक- शिक्षक मुलांच्या बहरण्याला वाव व न्याय देऊ शकतील अशी आशा वाटते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News