वो जो हममें तुममें ‘करार’ था...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019

मला तिची दया आली.
वनाला उपयुक्‍त व्हावे, सुरक्षितता लाभावी, सर्वांनी सुखी व्हावे, यासाठी धर्म, रूढी, परंपरा निर्माण झाल्या असाव्यात.

वनाला उपयुक्‍त व्हावे, सुरक्षितता लाभावी, सर्वांनी सुखी व्हावे, यासाठी धर्म, रूढी, परंपरा निर्माण झाल्या असाव्यात. भारतीय संस्कृतीत म्हणूनच घराचा उंबरठा पूज्य मानला जात असावा. या उंबरठ्याचा मान राखावा, त्याचे उल्लघंन करू नये, ही घरंदाज स्त्रीची मर्यादा मानली गेली. अर्थात काही प्रथा कालबाह्य होतात गरजेनुसार. आजकाल ‘मॉडर्न’ घरांना उंबरेच नसतात. १९७५ चा काळ. घराचे काही दुरुस्तीचे काम चालले होते. गवंड्याच्या हाताखाली एक अपंग स्त्री या कामात होती. अशक्‍त, दुबळी, आजारी. जेवणाचा डबा घेऊन यायची. तिच्याप्रती कणव म्हणून मी तिची चौकशी करायची. माझ्याबरोबर तिला जेवायला बसवायची. 

ती स्वत:विषयी बोलत होती. ‘नवरा दारूडा आहे. मारहाण करून भांडून मला घराबाहेर काढलंय. पोटासाठी मी हे काम करतेय; पण अधू पायाने मला हे पाट्या उचलणे जमत नाही. जवळच्याच नांदणी गावात एका बॅंकेत माझे दागिने आहेत ते सोडवून दिलेत तर ते विकून मी भाजीचा व्यापार करीन म्हणते. नांदणीला भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकतो. माझे हे काम केलेत तर उपकार होतील माझ्यावर. दागिने लगेचच विकून तुमचे पैसे परत करीन.’ 

मला तिची दया आली. माझे पती इचलकरंजीहून रोज सांगलीला नोकरीला जायचे. परतायला रात्र व्हायची. त्यांना सांगण्यात काही मतलब नव्हता. म्हणून मी वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली. कारण स्वत:चे निर्णय घेऊन असले आर्थिक व्यवहार करण्याइतकी मी सक्षम नव्हते. मुले लहान होती. माहेरचा गोतावळा शेजारीच. घराबाहेर स्वतंत्र्यरित्या पडण्याचे काही कारणच नव्हते. ड्रायव्हिंग येत होते; पण एकटी गाडी घेऊन परगावी जाण्याची हिंमत नव्हती; पण सतत मदतीचा हात गरजूंना देण्याचा आई-वडिलांचा वारसा गप्प बसू देत नव्हता. बरे त्यात पेट्रोल खर्चाशिवाय काही तोशिष नव्हती. 

अब्बाजींना गळ घातली. ते म्हणाले, ‘त्या बाईकडून आधी लिहून घे. तुम्ही माझे बॅंकेतील सोन्याचे दागिने सोडवण्यासाठी जे पैसे दिले ते मी दागिने विकून त्वरित परत करेन.’ 
मला अब्बाजींचा राग आला. कारण ते प्रत्येक बाबतीत असा कायदेशीर बाबींचा आग्रह धरत. माणसाने माणसावर विश्‍वास ठेवावा. कायद्यावरचा हट्ट धरून माणसाचा अपमान करू नये, असे मला वाटे; पण अब्बाजींच्या जिदखातर मी तसे लिहून घेतले. धाडस करून त्या बाईला घेऊन मी नांदणीला गेले. सासरी गावातील परिचित माणसे पाहतील या भीतीने लपत छपत जाऊन तिने दागिने सोडवून आणले व इचलकरंजीला परतलो. गल्लीतल्या नेहमीच्या सोनाराकडे भावाला त्या बाईसह पाठवले. तो पैसे कमी सांगतो म्हणून ती परत आली.

पुन: भाऊ तिला गुजरी पेठेत घेऊन गेला. सर्व दुकाने फिरूनही ती बाई दागिने विकायला तयार होईना. शेवटी अब्बाजींनी दमदाटी करून दागिने विकायला लावले. 
घरच्या सर्व लोकांनी माझ्यावर राग काढला. सर्वांचे ऐकून घ्यावे लागले. लिहून घेतले नसतं तर. अब्बाजींना जबाब देण्याची काय बिशाद होती. शब्द, वचन, मर्यादा, प्रतिज्ञा, करार मनात सट्टेपणाचा जागर असेल तरच पाळले जातील. लिखित स्वरूपाची गरजही नाही. लिखितालाही अनेक चोरवाटा, पळवाटा सापडतात. राजा हरिश्‍चंद्र, राम, भीष्म, कर्ण यांनी कोणते करार केले होते. मिशीचा केसही मौल्यवान होता.

जगाच्या इतिहासात, मानवी कल्याणासाठी शांतता, सुरक्षितता नांदावी, म्हणून केलेले अनेक करार मोडले गेले. सर्वच धर्माच्या आदर्श मनावतावदी तत्त्वांच्या मर्यादांना हरताळ फासला गेला. परिणाम समस्त मानवजात, चराचर सृष्टी, सुख ज्वालामुखीच्या क्रेटरवर लोटली गेलीय. तांबडा समुद्र काय, काळा समुद्र काय आणि निळा काय सगळेच समुद्र रक्‍तरंजित होण्याचे आसार आहेत. जेव्हा जेव्हा करार शब्द उमटतो तेव्हा तेव्हा अनेक विचारांची वावटळ उठते. बेचैनी येते. करार मग तो अण्वस्त्र बंदीचा असो की, पॅरिस करार असो की, पंचशील असो. जीनिव्हा असो की, अणुकरार-सामान्य माणसाच्या आकलनाला जडशील या बाबी भोवळ आणतात. 
कराराची कदर असती तर कोर्टाचे अस्तित्व कशाला लागते. बॅंका बुडाल्या नसत्या. वचने किम्‌ दरिद्रता म्हणून वचनाला जागण्याचे भान हरपलेल्या आश्‍वासनाचे महामूर पीक ना येते. 
करार हे मोडण्यासाठीच असतात काय या प्रश्‍नाचे उत्तर द्यायला जुना, नवा करारही हतप्रभ आहे. विचारांची वावटळं कुठे कुठे घेऊन गेली. मला मूळ कथा सांगायचीच राहून गेली. माणसावर विश्‍वास ठेवण्याच्या आदर्शाच्या कल्पनेपायी मी अनेक मानसिक, आर्थिक फटके खाल्लेत. त्यातील हा एक फटका. 
सोने व्यवहाराच्या घटनेनंतर ८/१० दिवसांनंतर अचानकपणे पोलिस गाडी दारात आली. गल्ली जमा झाली. आणीबाणीचा काळ. सावकारी करणे गुन्हा होता. माझ्यावर सावकारीचा गुन्हा दाखल झाला होता. लिहून घेतलेला करारच पुरावा होऊ शकला असता. आणीबाणीत साक्षी पुराव्याचीही गरज नव्हती. पोलिस स्टेशनप्रती सहज सवंगपणे संबंधित वावराचा तो जमाना नव्हता. इज्जतीच्या, बदनामीच्या कल्पनांचा प्रभाव होता. कल्पना करून पाहा, काय अवस्था झाली असेल. सोपे नव्हते. भोग म्हणायचे ते! भोगले. 

अनंत फंदींचा फटका अब्बाजीने ऐकवला. 
बिकट वाट वहिवाट नसावी ।
धोपट मार्गी सोडू नको ।

काही वेळ एक मन विषण्ण, विचलित होते. आदर्शाची वाट डायव्हर्ट होते; पण क्षमा, प्रेम, करुणा, विश्‍वास यांचा परिपोत असणाऱ्या ऊर्जेवर पोसलेले एक मन कठोर मनाला संगीत साद घालते.

बेकरार करके हमे यूँ न जाईये
आपको हमारी कसम लौट आईये

वादा, कसम, अहदसारख्या शब्दांनी प्रेरित गीतांची गर्दी होते. अशावादी मन स्मशान वैराग्य हद्दपार करते. गात राहते. हम होंगे कामयाब... एक दिन...
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News