अर्थसंकल्पात मुंबईला काय मिळणार ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019
  • ७५ लाख रेल्वे प्रवाशांचे लक्ष 
  • भरघोस निधीची अपेक्षा

मुंबई : संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मुंबईच्या रेल्वेला काय मिळणार, याकडे ७५ लाख प्रवाशांचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई रेल्वे विकास महामंडळातील एमयूटीपी प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद, जोगेश्‍वरी टर्मिनसची घोषणा व पादचारी पुलांसाठी १८० कोटी रुपये दिल्यानंतर आता सुरू असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांसाठी भरघोस निधीची गरज आहे.

एमयूटीपी-२, ३ आणि ३ ए या प्रकल्पांसाठी सुमारे ५७८ कोटी रुपयांची तरतूद फेब्रुवारीतील अर्थसंकल्पात झाली होती. दहा वर्षांपासून सुरू असलेल्या एमयूटीपी-२ प्रकल्पासाठी २२४ कोटी ९२ लाख रुपये मिळाले होते.

ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावा मार्ग हे रखडलेले प्रकल्प अद्याप मार्गी लागलेले नाहीत. एमयूटीपी-३ प्रकल्पासाठी २८३ कोटी ७८ लाख रुपये आणि एमयूटीपी-३ ए प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 

एमयूटीपी-३ या १० हजार ९४७ कोटी रुपयांच्या प्रकल्पात ऐरोली ते कळवा लिंक रोड, विरार ते डहाणू रेल्वे चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत नवीन मार्ग आणि अन्य काही कामांचा समावेश आहे. 

१५ डबा लोकल सेवेसाठी तरतूद?
पश्‍चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावर १५ डब्यांची लोकल चालवण्यासाठी अंधेरी-विरार स्थानकांदरम्यान फलाटांचे काम केले जात आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद होईल, अशी अपेक्षा रेल्वेतील सूत्रांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेने बदलापूर, अंबरनाथसाठीही १५ डब्यांची लोकल चालवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून त्याला मंजुरी आणि निधी मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News