पुढचं साहित्य संमेलन आता चंद्रावर होणार बरं का?

मंदार कुलकर्णी
Saturday, 20 July 2019

चंद्रावर माणूस गेल्याला पन्नास वर्षं पूर्ण झाली. भविष्यात चंद्रावर अशीच खूप माणसं जात राहिली आणि चक्क चंद्रावर साहित्य संमेलनच भरवायची टूम निघाली तर? दोन लेखकांमध्ये मग अशा प्रसंगी होणारा हा गंमतीशीर संवाद...  

चंद्रावर माणूस गेल्याला पन्नास वर्षं पूर्ण झाली. भविष्यात चंद्रावर अशीच खूप माणसं जात राहिली आणि चक्क चंद्रावर साहित्य संमेलनच भरवायची टूम निघाली तर? दोन लेखकांमध्ये मग अशा प्रसंगी होणारा हा गंमतीशीर संवाद...  

प्रिय संकु,नमस्कार, चंद्रावर मानवाचं पहिलं पाऊल पडल्याला बरीच वर्षं झाल्याच्या निमित्तानं चंद्रावर साहित्य संमेलन घ्यायची कल्पना महान मंडळानं मांडलीय त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कल्पना सुंदर वाटते आहे. सहकुटुंब आमंत्रण नाही, हे जरा बरं वाटतंय. सौभाग्यवतींना तसाही थंडीचा त्रास होतोच. चंद्रावर थंडी जास्तच असणार नाही का? (सौभाग्यवतींचा तुम्हाला नंतर फोन येऊ शकतो, त्यासाठी जस्ट कल्पना देऊन ठेवली. तापमान उणे पन्नास असतं असं सांगितलं आहे.

तपशील सारखे असावेत एवढंच! तुम्ही घरी काय सांगितलंय हे नक्की कळवा.) चंद्र या विषयावर मी जवळजवळ पावणेदोनशे कविता वेगवेगळ्या दिवाळी अंकांना थोडी वाक्यं बदलून दिल्या आहेत. (त्यातल्या तीन जणांनी मानधन दिलं नाही, तेव्हा घरी `त्या कवितांना ग्रहण लागलं असेल,` असा उल्लेख झाला होता.) पण चंद्राचा एवढा अभ्यास असल्यामुळं चंद्रावर प्रत्यक्ष जाऊन ब-याच गोष्टींची खातरजमा करायला मजा येईलच. (प्रत्यक्ष भेट दिल्यामुळं आणखी दीडशे दिवाळी अंकांची सोय होईल. हल्ली डिजिटलचाही जमाना आहे.

काही जण माझ्याकडून वाचूनही घेतात. डोक्यावरचा चंद्र आणि कवितांतला चंद्र या गोष्टी मॅच होतात असंही खवटपणे म्हणतात तरुण पोरं, पण जाऊ दे) चंद्र या विषयावर माझ्या आठवणीही ब-याच आहेत. चंद्र आणून देतो असं तुम्ही कधी कुणाला म्हणाला आहात का? (पत्नीला नाही सांगितलंत तरी चालेल.) मीही चंद्रीला......बाय द वे, या चंद्रावरच्या संमेलनासाठी खर्च आणि भत्ते मिळणार आहेत ना? चंद्रावर कोणतं चलन चालतं, हे मला तरी माहीत नाही. खरं तर तुम्ही असलात, की तशी मला चिंता नसते; पण मैत्रीचा गैरफायदा तरी किती घेणार, नाही का? बाय द वे, युरोपच्या सहलीदरम्यान माझे दोन रुमालांचं पाकिट तुमच्याकडं राहिलं होतं. ते या सहलीत घेऊन याल का?आपलाच,पांकुया हटके पत्रानंतर पांकुनी पण पत्राद्वारे प्रतिक्रिया दिली...

प्रिय पांकु,नमस्कार अनेकदा तुमच्यामुळं बरीच संकटं टळतात. मी घरी चंद्रावर उणे 79 अंश सेल्सिअस तापमान असतं असं सांगितलं होतं. ते आता करेक्ट करून घेतो. वहिनी आल्या असत्या तर हरकत नव्हती, पण असो. पृथ्वीवर कोणी तरी राहायला पाहिजे नाही का? हाहा. पण तुम्ही म्हणता तशी चंद्रावर साहित्य संमेलन घेण्याची कल्पना छानच आहे.तुमच्या चंद्रावरच्या कविता मीही वाचल्या आहेत.

खरं तर तुम्ही चंद्राला धरल्यामुळं (व्याकरण बरोबर आहे का याची कृपया खात्री करून घेणे. हल्ली टायपिंगच्या चुका होतात माझ्याकडून) मी चांदण्यांना धरलंय. पण माझे सव्वाशेच दिवाळी अंकच झालेत. तुम्ही पावणेदोनशे दिवाळी अंकांची यादी पाठवून दिली तर बरं होईल.मला एक कळत नाही. चंद्रावर जायचं नुसतंच आमंत्रण पाठवलंय, पण बरोबर काय न्यायचं काही कळत नाही. चिवडा आणि चकलीचा डबा आणायचा की नाही, अंगावर स्पेस सूट असेल, तर मग कपड्यांना इस्त्री करायची गरज आहे का, चंद्रावर पाणी अजून सापडलं नसेल, तर मग आंघोळीचं काय? नंतर बसायची (म्हणजे फिजिकली बसायची हो.

अर्थात दुसरा अर्थही अभिप्रेत आहेच) सोय आहे का? तिथून थोडे दगड आणायला चालत असतील, तर त्यासाठी बरोबर काय न्यायचं (चंद्रावर प्लॅस्टिक बंदी असेलच ना?), असे बरेच प्रश्न आहेत. नातवानं फेसबुक लाइव्हचं विचारलंय, पण जिओची रेंज चंद्रापर्यंत चालेल का, पृथ्वीवरचा दीड जीबी डेटा म्हणजे चंद्रावरचा किती अशा ब-याच प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत.चंद्रावर कोणतं चलन चालतं मलाही नक्की माहीत नाही. पण मी एक प्रायोजकच मिळवले आहेत. आमच्या शेजारी एक इतिहास-भूगोल शिकवणारे शिक्षक आहेत. त्यांच्या कोचिंग क्लासचा लोगो मी शर्टावर लावणार आहे.

तुम्हीही काही मिळालं तर बघू शकता. तुमच्या दोन रुमालांचं पाकीट मी नक्की आणतो. इतर सगळा हिशेबही करून ठेवला आहे. त्याचं काय करायचं तेही सांगितलं तरी चालेल. चंद्री हे वाक्य अर्धंच उमटलंय. त्या प्रकरणात तुम्हाला `अर्धचंद्र` मिळाला होता का, हे प्रत्यक्ष भेटीत सांगालच!आपलाच,संकु

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News