बलाढ्य कांगारूंना हरवलं पाकिस्तानच काय... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019
  • नॉटिंहॅमच्या़ कोंदट पावसाळी हवामानातून सुटका करून घेऊन भारतीय संघ मँचेस्टरला पोहोचला तेव्हा त्यांचे स्वागत कोवळ्या सूर्यप्रकाशाने झाले.
  • खेळाडूंना ऊन अंगावर पडल्याने एकदम उत्साह आला.

मँचेस्टर - नॉटिंहॅमच्या़ कोंदट पावसाळी हवामानातून सुटका करून घेऊन भारतीय संघ मँचेस्टरला पोहोचला तेव्हा त्यांचे स्वागत कोवळ्या सूर्यप्रकाशाने झाले. खेळाडूंना ऊन अंगावर पडल्याने एकदम उत्साह आला. रविवारी 16 जून रोजी भारत वि पाकिस्तान सामना ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणार आहे. मैदानावर चक्कर मारली असता खूप मोठ्या लग्नाकरता कार्यालय सजवताना जी लगबग चालू असते तशी दिसली. कोणी प्रेक्षकांची आसने पुसून स्वच्छ करत होता. कोणी जाहिरातीचे फलक लावत होता. काही लोक मन लावून खेळपट्टी तयार करत होते. 

16 जूनला होणार्‍या सामन्याकरता पाकिस्तानी संघ 18 जून 2017 चा आधार घेत आहेत. हा तोच दिवस होता ज्यावेळी पाकिस्तानी संघाने भारतीय संघाला आयसीसी चँम्पीयन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत केले होते. फकर झमानला जसप्रीत बुमराने बाद केले तो चेंडू नोबॉल ठरला. त्या क्षणापासून सगळे फासे उलटे पडत गेले. फकर झमानने शतक ठोकले. पाकिस्तानने 300 धावांचा टप्पा पार केला. 

गोलंदाजी करायला आल्यावर महंमद आमेरने विराट कोहलीसह तीन प्रमुख खेळाडूंना बाद करून भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. हार्दिक पंड्याने तोडफोड फलंदाजी करून पाऊण शतक केले. पाकिस्तानने तो सामना मोठ्या फरकाने जिंकून भारताविरुद्ध आयसीसी स्पर्धेतील पराभवांची मालिका खंडीत केली. हाच एकमेव सकारात्मक मुद्दा मनात साठवून पाकिस्तानी संघ सरावाला लागला आहे.

भारतीय संघाची ताकद शिखर धवन नसल्याने कमी झाली नसल्याचे पाकिस्तानी गोटातील म्हणणे आहे. भारतीय संघ समतोल आहे आणि तो कोणा एका खेळाडूंवर विसंबून नाही हे पाकिस्तान संघ व्यवस्थापन जाणून आहे. हवामान गार असेल आणि खेळपट्टी थोडी जरी ताजी असेल तर त्याचा फायदा महंमद आमेर आणि वाहब रियाज घेतील. काट्याने काटा काढण्याकरता  विराट कोहली महंमद शमीला खेळवायच्या तयारीत असल्याचे समजले.

नेहमी भारतीय खेळाडू सामन्याअगोदर दोन दिवस सरावावर जोर देतात. नॉटिंहॅमहून शुक्रवारी दुपार नंतर भारतीय संघ नॉटिंगहॅमला पोहोचल्याने सरावाकरता कोणी मैदानावर आले नाही. सामन्याच्या आदल्या दिवशी संघ सरावाकरता ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हजर होणार आहे. 

सामन्याला दोन दिवस बाकी असताना तिकिटांचा काळा बाजार जोरात चालू झाला आहे. एका तिकिटाकरता एक लाख रुपये मोजलेले काही क्रिकेट रसिक भेटले. जर मँचेस्टरला सूर्यप्रकाश असाच चांगला राहिला तर शनिवारी हाच तिकिटांचा बाजार शिगेला जाईल असे वाटते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News