मुलांना कोणत्या वयात जबाबदारी द्यावी?

लक्ष्मण जगताप
Tuesday, 18 June 2019

'अजून तो लहान आहे. इतक्यात कशाला त्याला जबाबदारीचं ओझं. मोठा झाल्यावर त्याला जमेल सगळं. आताच नको त्याच्या मागे कामाचा बोजा' साधारणपणे असा सूर आपल्याला ऐकायला मिळतो. मुलांवर लहान वयातच छोटी मोठी जबाबदारी सोपविली तर निश्चितच त्यांना अनुभवातून शिकायला मिळते. कधीकधी मोठी माणसेही भीतीपोटी अथवा अपयशी होऊ या विचाराने जबाबदारी घेण्याचे टाळतात.

'अजून तो लहान आहे. इतक्यात कशाला त्याला जबाबदारीचं ओझं. मोठा झाल्यावर त्याला जमेल सगळं. आताच नको त्याच्या मागे कामाचा बोजा' साधारणपणे असा सूर आपल्याला ऐकायला मिळतो. मुलांवर लहान वयातच छोटी मोठी जबाबदारी सोपविली तर निश्चितच त्यांना अनुभवातून शिकायला मिळते.

कधीकधी मोठी माणसेही भीतीपोटी अथवा अपयशी होऊ या विचाराने जबाबदारी घेण्याचे टाळतात. खरं तर जबाबदारीकडे एक आव्हान म्हणून पाहिले पाहिजे. दिलेली जबाबदारी पार पाडताना एक तर यशस्वी होऊ किंवा अपयशी होऊ. पण जबाबदारी न स्वीकारणे म्हणजे आपल्यातील आंतरिक शक्तीला व्यक्त न करणे होय.

विठ्ठलपंत आणि रुक्मिणीमातेने देहांत प्रायश्चित घेतले. त्यावेळी निवृती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई यांचे वय काय होते? त्या वयात निर्माण झालेली जबाबदारी विश्वाचे कल्याण करणारी ठरली. पुरंदर तहाची पूर्तता होईपर्यंत जयसिंगाकडे  ओलीस रहावे लागलेल्या आणि स्वराज्य रक्षणासाठी राजकारण प्रवेश करणाऱ्या संभाजीराजांचे वय होते अवघे आठ वर्षे.

छञपती शिवरायांच्या हातात तर वयाच्या बाराव्या वर्षीच पुणे जहागीर सोपविली गेली  होती. म्हणजे आपण इतिहासात  डोकावून पाहिले तर अनेक जणांना अगदी लहान वयात जबाबदारी मिळाली. जबाबदारी जर लहान वयात मिळाली तर कर्तृत्व महान होते.म्हणूनच लहान मुलांवर छोट्या मोठ्या कामाची जबाबदारी सोपविली पाहिजे.

त्यातून त्यांचे सामर्थ्य वाढेल. आत्मविश्वासाला बळकटी मिळेल. स्वयंनिर्णयाची क्षमता वृद्धींगत होईल. जबाबदारी पार पाडल्याचे मानसिक समाधान मिळून मनाची कणखरता वाढेल. कोणतेही काम करताना आणि अंतिम उदिष्टापर्यंत पोहचण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न याचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.

दिलेली जबाबदारी मुलांनी  यशस्वी पणे पार पाडल्यास कौतुकाच्या  चार शब्दांनी त्यांची पाठ थोपटावी आणि काही चुका झाल्या तर योग्य शब्दांत समजून सांगावे. चुका करतो म्हणून एखाद्या कामाची जबाबदारी न देणे म्हणजे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची  संधी दवडणे. चुका झाल्या तरी पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी त्यांना बळ द्यावे. लहान वयात मुलांना जबाबदारी नको असे वाटेल, परंतु छोटया छोटया जबाबदारीने मुले परिपक्व आणि सक्षम  बनण्यास  निश्चितच मदत होईल. पण जबाबदारी दिली तरच.... 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News