कोकणाकडेही लक्ष दिलंत तर बरं होईल...

व्हायरल
Wednesday, 14 August 2019

सातारा सांगली कराड कोल्हापूर इथली पूर परिस्थिती भयानक आहे. इथे जीवितहानी आणि वित्तहानी भरपूर झालेली आहे. लोकांचं पशुधनही वाहून गेले आहे. आणि शेतीची ही परिस्थिती अत्यंत वाईट आहे.

सातारा सांगली कराड कोल्हापूर इथली पूर परिस्थिती भयानक आहे. इथे जीवितहानी आणि वित्तहानी भरपूर झालेली आहे. लोकांचं पशुधनही वाहून गेले आहे. आणि शेतीची ही परिस्थिती अत्यंत वाईट आहे.

सातारा सांगली कराड कोल्हापूर या भागातील लोकांना अशा पूर परिस्थितीची सवय नाही. त्यामुळे इथे जीवित हानी जास्त प्रमाणात झालेली आहे. घरात आणि घराच्या आजूबाजूला ८/१० फूट पाणी भरलं तर त्यातून स्वतःचा बचाव कसा करावा हे इथल्या लोकांना न समजल्यामुळे जीवितहानीच्या दुर्घटना घडल्या आहेत.माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अजूनही इथे आपत्ती घोषित केलेली नाही. बचावकार्यासाठी लागणाऱ्या सुविधा पुरवण्यात प्रशासन अपुरं पडतंय.

इथे लोकच एकमेकांच्या मदतीला धावून येत आहेत. सरतेशेवटी सामान्य जनतेचाच एकमेकाला आधार असतो. राजकीय नेतेमंडळी आणि प्रशासन मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करून स्वतःची जबाबदारी संपवून घेण्यात धन्यता मानतात. शेवटी निसर्गाच्या बलाढ्यते पुढे माणसाची बुद्धिमत्ता आणि ताकद किती तुटपुंजी असते याची प्रचिती अशा अपघाती घटनांमधून दिसून येत असते. या भागातील लोकांचे, दूध दुभत्याचे, जनावरांचे आणि शेतीचे देव रक्षण करो.

अशीच भयानक पूर परिस्थिती रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदीकाठच्या, खाडी किनाऱ्यालगतच्या आणि समुद्रकिनाऱ्यावरील गावात आहे.

मालवणमध्ये, माझ्या गावातही गेले चार दिवस पाणी भरून आहे. नदी नाले ओढे विहिरी गढूळ पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. सर्व रस्ते पाण्याखाली आहेत. बाजारपेठांमधून पाणी शिरलं आहे. दुकानं बंद आहेत. वीज पुरवठा खंडित झाला आहे. रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तू आणि दोन वेळच्या जेवणासाठी लागणारे जिन्नस देखील मिळत नाहीयेत. कोल्हापूर मार्गे येणारा दूध पुरवठा आणि भाजीपाला पुरवठा खंडित झाला आहे. चारा आणि वैरणी अभावी गाई गुरं उपाशी आहेत. कमी उंचीच्या घरात पुराचं पाणी भरून राहिलं आहे. मिळेल त्या आडोशाने लोक जीव मुठीत घेऊन रात्र रात्र जागून काढत आहेत. 

रोजच्या जेवणाची दुर्दशा आहे. कपडे भांडीकुंडी अंथरूण-पांघरूण सर्व भिजलं आहे. पुराच्या पाण्यात लाकूड-फाटा वाहून गेला आहे. उभ्या शेतात ८/८ फुट पाणी भरून राहिलं आहे. लोकांची जुनी घरं कोसळली आहेत, मातीच्या भिंती कोसळल्यायत, जनावरांचे गोठे पावसाच्या आणि पाण्याच्या माराने नेस्तनाबूत झालेयत.

बातम्या देणाऱ्या सर्व चित्र वाहिन्यांचे लक्ष सध्या पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती कडे आहे. त्यामुळे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भयानक पूर परिस्थिती बाबत उर्वरित महाराष्ट्रातील लोकांना पुरेशी माहिती मिळत नाहीये. फक्त कोकणातील या तीन जिल्ह्यांमध्ये सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही. याला कारण असं आहे की दरवर्षी पावसाळ्यात कमी-अधिक प्रमाणात कोकणातील या तिनही जिल्ह्यात नदीकिनारी, खाडीकिनारी आणि समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या गावांमध्ये पुराचं पाणी भरतच असतं. इथल्या स्थानिक लोकांना याची सवय आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती आहे कोकणात.

महाराष्ट्रातील राजकारणावर पश्चिम महाराष्ट्राचा जितका प्रभाव आणि पगडा आहे त्याच्या पाच टक्के देखील कोकणाचा किंवा कोकणातील नेत्यांचा प्रभाव नाही. राजकीयदृष्ट्या कायम दुर्लक्षित असलेला आणि सावत्र वागणूक मिळालेल्या कोकण पट्ट्यात पुराच्या पाण्यामुळे विदारक परिस्थिती आहे. शिवाय इथल्या स्थानिक जनतेला अशा पूरपरिस्थितीत प्रशासनाकडून मदत मागायची असते किंवा मदत मिळवून घ्यायची असते याची जाणीव देखील नाही.

राजकीय नेत्यांनी, प्रशासनाने आणि बातम्या देणाऱ्या चित्र वाहिन्यांनी कोकणाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. तेव्हाच त्यांना माहित पडेल की महाराष्ट्राचाच एक अविभाज्य घटक असलेला कोकण प्रांत देखील भयानक पूरपरिस्थितीशी झुंजतोय. जरा या भागाकडेही तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News