"युद्धजन्य परिस्थिती उद्धभवली तर अणुबाँम्बचा वापर कधी करायचा ते आम्ही ठरवू", राजनाथ सिंहांचे पाकला सडेतोड उत्तर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

 

  • संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचे सूतोवाच
  • सरकारची नवी आण्विक भूमिका

पोखरण : जम्मू-काश्‍मीरच्या मुद्यावरून भारत- पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांमध्ये अभूतपूर्व असा तणाव निर्माण झाला असताना देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज नवी आण्विक भूमिका मांडली. ‘अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही’ या स्वेच्छेने स्वीकारलेल्या आणि आतापर्यंत काटेकोरपणे पाळलेल्या धोरणाशी भारताने फारकत घेत अण्वस्त्रांच्या भविष्यातील वापराचा निर्णय हा तेव्हा उद्‌भवलेल्या परिस्थितीवर अवलंबून असेल, अशी नवी भूमिका घेतली आहे.

देशाचे आण्विक चाचणी स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोखरणला आज राजनाथ यांनी भेट दिली, यानंतर केलेल्या ट्‌विटमध्ये त्यांनी हे महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय तणावाच्या पार्श्‍वभूमीवर राजनाथ यांनी हे वक्तव्य केल्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला आहे.

‘‘देशाला आण्विक शक्ती बनविण्याचा निर्धार अटलबिहारी वाजपेयी यांनी केला होता, त्या निर्धाराचेच हे स्थळ साक्ष देते. भारताने आतापर्यंत ‘अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही’ या धोरणाचे काटेकोरपणे पालन केले आहे; पण भविष्यामध्ये काय होईल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल,’’ असे राजनाथ यांनी त्यांच्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. राजस्थानमध्ये एका लष्करी कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर राजनाथ हे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पोखरण येथे गेले होते, वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारताने १९९८ मध्ये याच ठिकाणी अणुचाचणी घेतली होती.

असाही योगायोग
‘‘आज योगायोगाने मी जैसलमेर येथे आंतरराष्ट्रीय लष्करी स्काउट मास्टर्सच्या स्पर्धेसाठी आलो असताना अटलबिहारी वाजपेयी यांची पहिली पुण्यतिथीदेखील आहे, त्यामुळेच त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण पोखरणला जावे असे मला वाटले. भारताने आतापर्यंत एक जबाबदार अणुशक्तीची भूमिका पार पाडली असून, ही आमच्या देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. हा देश नेहमीच अटलजींच्या महानतेच्या ऋणात राहील,’’ असा विश्‍वासही त्यांनी ट्‌विटच्या माध्यमातून व्यक्त केला.

भारताकडून थार रेल्वे बंद
भारत सरकारने आज अधिकृतरीत्या पाकिस्तानसोबतची थार रेल्वेसेवा थांबविण्याचा निर्णय घेतला. राजस्थानातील जोधपूर आणि पाकिस्तानातील कराची ही दोन शहरे या सेवेच्या माध्यमातून जोडली गेली होती. ही रेल्वे शुक्रवारी पाकिस्तानला जाणार होती, पण तिला थांबविण्यात आले असल्याचे वायव्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अभय शर्मा यांनी सांगितले.

टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल
जम्मू आणि काश्‍मीरमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी येथे संवाद आणि मानवी व्यवहारांवर घालण्यात आलेले निर्बंध पुढील काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने मागे घेतले जातील, अशी माहिती आज सरकारकडून देण्यात आली. श्रीनगरमधील दूरध्वनी सेवा आज रात्रीपासूनच सुरू होणार असून, येथील शाळा सोमवारी सुरू होतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News