राष्ट्रवादी नकोच, वंचित चालेल! ; कॉंग्रेसचा विधानसभा एकटी लढण्याच्या तयारीत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • ‘वंचित’ला सोबत घ्या!
  • काँग्रेसच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर

मुंबई: लोकसभेच्या रणांगणात पानिपत झाल्यानंतर राज्यामध्ये काँग्रेस पक्षाने नवा भिडू शोधायला सुरवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्या, असा सूर आज काँग्रेसच्या बैठकीमध्ये बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आळवला. 

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली तरीसुद्धा याचा पक्षाला काहीच फायदा होत नाही, अशी तक्रारही या वेळी करण्यात आली. राज्यामध्ये ‘वंचित बहुजन’सोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने प्रयत्न करावेत, यासाठी पक्ष नेतृत्वाने बोलणी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे अनेक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज टिळक भवन येथे झालेल्या आढावा बैठकीला राज्यभरातील नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या बैठकीत काँग्रेस पदाधिकारी आणि नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाराजीचा सूर आळवला. ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला तिथे जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिल्याची माहितीही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. 
राष्ट्रवादीची अपेक्षित मदत नाही

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक मतदारसंघांत अपेक्षित मदत मिळाली नसल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. ‘राष्ट्रवादी’ऐवजी ‘वंचित आघाडी’शी हातमिळवणी केल्यास काँग्रेसला जास्त फायदा होईल, असे अनेक नेत्यांचे म्हणणे होते. 

महाराष्ट्रात काँग्रेसची पुरती वाताहात झाली आहे. राज्यात काँग्रेसचा फक्त एकच खासदार निवडून आला. अशा परिस्थितीत काँग्रेसला भरवशाच्या आणि मतांची बिदागी मिळवून देणाऱ्या साथीदाराची साथ हवी आहे. असे मत अनेक पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्‍त केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News