आम्ही निवडणुकीला सामोरे जायला तयार : दादा भुसे

संदीप काळे
Wednesday, 18 September 2019
  • मालेगावसारख्या संवेदनशील शहराला शांत ठेवणारे अनेक चेहरे आहेत, त्यातील एक म्हणजे ग्रामविकास मंत्री दादा भुसे..! दादा भुसे हे मुरब्बी राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. नाशिकमधील मालेगावसारख्या ठिकाणी त्यांनी शांतता अबाधित ठेवण्याचा सतत प्रयत्न केला आहे. ते धुळ्याचे पालकमंत्री देखील आहे. अनेकवेळा आपल्या वेगळ्या स्टाईलने त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व दाखवलं आहे. सकाळ माध्यम समूहाच्या "महाराष्ट्र दौऱ्यात" संदीप काळे यांनी दादा भुसे यांची प्रश्न-उत्तर स्वरूपात घेतलेली ही विशेष मुलाखत
     

मालेगावचं वातावरण कसं आहे?

मालेगावचे वातावरण अतिशय संवेदनशील असं आहे. दुर्दैवाने याठिकाणी भीषण बॉम्बस्फोट झाले. यामध्ये ३०० पेक्षा अधिक जखमी झाले होते. त्या परिस्थितीला मालेगावच्या सर्व बांधवानी धैर्याने तोंड दिले. हिंदू-मुस्लिम सर्व लोकांनी रक्तदान करून अनेकांचे जीव वाचवले. मुख्य म्हणजे शिवसेना यामध्ये अग्रेसर होती. एवढे प्रसंग होऊन देखील महाराष्ट्र आणि मालेगावची संवेदनशीलता अबाधित राहिली.

या सर्व प्रकारांमध्ये शिवसेनेची भूमिका काय होती?

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे, जातीपातीचे कोणतेही राजकारण करायचे नाही. कोणत्याही समाजाच्या विरोधातील राजकारण करायचे नाही. आपण ज्या मातीत राहतो, ज्या मातीचं अन्न खातो, त्या मातीशी इमानदारी ठेवणे, अशी साधी सरळ शिकवण त्यांनी दिली. शिवसेनेने मागून खंजीर खुपसण्याचं काम कधीही केलं नाही. जी काही असेल ती स्पष्ट भूमिका शिवसेना नेहमी घेते. राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून शिवसेना नेहमी काम करते. आपण पाहिलं तर बॉम्बस्फोट झाले त्यावेळी सर्वप्रथम रक्त देऊन प्राण वाचवण्यासाठी शिवसैनिक धावून आले. पाऊण तासात तब्बल १६८ बॉटल रक्त उपलब्ध करून दिले होते.

आगामी निवडणुकांना घेऊन शिवसेनेत काय वातावरण आहे?

मालेगावच्या जनतेच्या तसेच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास राज्यमंत्रीपद मिळालं. तुम्ही पाहिलं तर यानंतर अनेक  विकासकामे याठिकाणी सुरु आहेत. विकासकामे होत असताना जनतेच्या सुख-दु:खाचा विचार देखील करण्यात येतो. मला वाटतं तळागाळातील शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी केलेली कामे, राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांनी केलेली कामे या सर्व कामांच्या जोरावर आम्ही निवडणुकीत सामोरे जाणार आहोत.

राजकारणात निवृत्ती वय किती असावं? तरुण मुलांना संधी मिळायला हवी का?

शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे माणसाचं वय महत्त्वाचं नाही. त्याचे विचार, त्याची काम करण्याची शक्ती हे जास्त महत्त्वाचे आहे. वय अगदी ४० वर्षे असेल मात्र त्यांची काम करण्याची, विचार करण्याची शक्ती नसेल तर उपयोग नाही. शिवसेनाप्रमुख हे शेवटपर्यंत काम करत होते. त्यांचे विचार अखेरपर्यंत सक्षम होते, ते अधिक महत्त्वाचे आहे, असं मला वाटतं.

पक्ष आणि अपक्ष यात काम करताना तुलना कशी करता?

२००४ च्या निवडणुकीत मी अपक्ष म्हणून कार्यरत होतो. अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना हिंदूहृदयसम्राट शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन सामोरे गेलो. तसेच माळेगावची जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीच्या विरोधात शिवसेना, भाजप, मित्रपक्ष हे सगळे मिळून त्या निवडणुकीला सामोरे गेलो.

आमदार असताना मालेगाच्यादृष्टीने घेतलेला महत्त्वाचा निर्णय कोणता?

छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, बोलण्यापेक्षा कृती करा. आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मालेगावकर बोलण्यापेक्षा कृतीतून बंधुभाव याठिकाणी निर्माण करत आहोत. त्यामुळे आमच्या कृतीतून मालेगावचे नाव सकारात्मक झालेलं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News