एकीकडे पाणी, दुसरीकडे मगरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019
  • नागरिक सैरभैर; कष्टाने कमावले, पुराने गमावले

निपाणी - आयुष्यभर कष्ट करून घरादारासह मालमत्ता कमवली. पण, निसर्गाच्या मनात काही वेगळेच होते. आतापर्यंत आलेल्या पूर परिस्थितीमुळे थोडेफार का होईना बचावले होते. यंदाच्या पुरामुळे मात्र सर्व काही घेऊन गेले. आता केवळ दोन वेळचे अन्न आणि जगण्याची आशाच उरली आहे, अशा प्रतिक्रिया आहेत निपाणी तालुक्‍यातील पूरग्रस्त गावातील नागरिकांच्या. अनेक गावे पाण्याखाली गेली असून, शेकडो कुटुंबे स्थलांतरित झाले आहेत. पण, गावात एकीकडे पाणी आणि दुसरीकडे साप-विंचू यांचे वास्तव्य असल्याची परिस्थिती आहे. 

तालुक्‍यातील भिवशी, जुने ममदापूर, कोडणी, बुदिहाळ, यमगर्णी, कुरली, भोज, बारवाड, जत्राट, मांगूरसह इतर वाडीवस्त्यांमध्ये पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. आपत्ती निवारण पथकाद्वारे नागरिक व जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पण, घरे गमावल्याची चिंता पूरग्रस्तांना रात्रंदिवस सतावत आहे. चार दिवसांपासून सर्वच घरे पाण्याखाली असल्याने आता घरे कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याच्या चिंतेने अनेकांना ग्रासले आहे. शासकीय अधिकारी पूरग्रस्तांपर्यंत पोचून सर्व सुविधा देत असल्याची माहिती लोकप्रतिनिधींना देत असले तरी अजूनही बऱ्याच ठिकाणी औषधोपचार व जनावरांच्या चाऱ्याची सोय झालेली नाही. त्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 

सर्वच ठिकाणी निवारा केंद्रावर नदीच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने पूरग्रस्तांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने निदान शुद्ध पाणी तरी पुरविण्याची मागणी पूरग्रस्तांकडून होत आहे.निपाणीच्या लोकप्रतिनिधी आमदार शशिकला जोल्ले या पूरग्रस्त गावांना भेटी देत असल्या तरी अनेक रस्ते बंद असल्याने मोठ्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागत आहे. निपाणी शहरासह तालुक्‍यात पूरस्थिती बिकट बनली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News