'हा' होता भारताचा पहिला पराभव; तोही इतका धक्कादायक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : भारत विरुद्ध इंग्लंड संघ 100व्या एक दिवसीय सामन्यात एजबास्टन मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकले. महंमद शमीने 5 फलंदाजांना बाद करूनही इंग्लंडला 7 बाद 337  धावफलक उभारला आला तो बेन स्टोकस् 79 धावा आणि  जॉनी बेअरस्टोने 6 षटकारांसह झळकावलेल्या तोडफोड शतकामुळेच. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायच्या प्रयत्नात रोहित शर्माने शतक झळकावले. साथ देताना विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने अर्धशतके करूनही भारतीय फलंदाजांचे प्रयत्न कमी पडले.

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : भारत विरुद्ध इंग्लंड संघ 100व्या एक दिवसीय सामन्यात एजबास्टन मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकले. महंमद शमीने 5 फलंदाजांना बाद करूनही इंग्लंडला 7 बाद 337  धावफलक उभारला आला तो बेन स्टोकस् 79 धावा आणि  जॉनी बेअरस्टोने 6 षटकारांसह झळकावलेल्या तोडफोड शतकामुळेच. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायच्या प्रयत्नात रोहित शर्माने शतक झळकावले. साथ देताना विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने अर्धशतके करूनही भारतीय फलंदाजांचे प्रयत्न कमी पडले. इंग्लंडने भारताचा डाव 5 बाद 306 वर रोखला आणि 31 धावांचा विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम राखले तर भारताला पहिल्या पराभवाची कडू चव चाखायला लागली. जॉनी बेअरस्टोला सामन्याचा मानकर्‍याचा मान मिळाला. 

विजयाकरता 338 धावांचे आव्हान पेलायला चांगली सुरुवात होणे गरजेचे असते. झाले उलटे कारण लोकेश राहुल शून्यावर बाद झाला आणि रोहित शर्माला सूर गवसत नव्हता. त्याचा सोपा झेल ज्यो रुटने सोडला. बाकीचे फलंदाज कसेही खेळोत विराट कोहली नेहमीच्या झोकात टकाटक फलंदाजी करून लागला. ख्रिस वोकस्ने सुरुवातीच्या स्पेलमधे इतकी चांगली गोलंदाजी केली की पहिल्या 10 षटकात फक्त 28 धावा काढता आल्या.  मग कोहलीने खास ठेवणीतले फटके सादर केले. प्रत्येक फटक्याला प्रेक्षक टाळ्यांसोबत आवाजाने वाहवा करत होते.

खेळपट्टीच्या वेगाचा अंदाज आल्यावर रोहितने फटके चालू केले. कोहलीचे अर्धशतक प्रथम फलकावर लागले. रोहितने थोडा वेळ घेतला पण अर्धशतकानंतर त्याने बेन स्टोकस्ला एकामागोमाग एक तीन चौकार मारून विराटला गाठले. मोठ्या मैदानावरही दोघा फलंदाजांच्या फटक्याला रोखणे क्षेत्ररक्षकांना झेपत नव्हते. 136 धावांची भागीदारी प्लंकेटने मोडली जेव्हा कोहली 66 धावांवर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रिषभ पंत आपल्या कारकिर्दीतला पहिला विश्वचषक सामना खेळताना दोन वेळा धावबाद होताना वाचला. 

रोहितने कमालीचे सातत्य दाखवत स्पर्धेतले 3रे शतक पूर्ण केले. 8 विकेटस् हाती असल्या तरी शेवटच्या 15 षटकात 10च्या सरासरीने 150 धावा करायच्या बाकी असल्याने आता फक्त आक्रमणाची भाषा बोलावी लागणार होती. त्याच प्रयत्नात रोहित बाद झाला आणि हार्दिक पंड्या मैदानात आला. आक्रमक 45 धावा काढून पंड्या तंबूत परतला तेव्हाच भारतीय संघ विजयापासून दूर गेला होता. चांगल्या गोलंदाजी समोर मोठ्या फटक्यांची डाळ शिजली नाही. अखेर भारताला 50 षटकांमधे 5 बाद 306 ची मजल गाठता आली.   

त्या अगोदर सकाळी एजबास्टन मैदानावर नाणेफेकीचा कौल इयॉन मॉर्गनच्या बाजूने लागला तेव्हा नशिबाची साथ इंग्लंड संघाला मिळू लागली. सुरुवातीच्या काही षटकात जेसन रॉय आणि बेअरस्टोला महंमद शमीने खूप वेळा चकवले आणि फलंदाज बाद होताना वाचले. चार चेंडू तटवून खेळल्यावर दोन चेंडूंवर चौकार किंवा षटकार मारले जायला लागले. जम बसल्यावर रॉय- बेअरस्टो जोडीने जबरदस्त ताकदीने फटके मारले. एजबास्टन मैदानाच्या सीमारेषा त्यांच्याकरता छोट्या पडू लागल्या. हवेतून मारलेले फटके झेल म्हणून खेळाडूंनी नव्हे तर प्रेक्षकांनी पकडले.  

बेअरस्टो- रॉयचे अर्धशतक झपाट्याने पूर्ण झाले. दोघा फलंदाजांचे आक्रमण इतके तगडे होते की 10 ते 20 षटकांच्या काळात षटकामागे 10 धावांची सरासरी सहजी राखली गेली. कुलदीप यादवच्या गुगलीने जेसन रॉयला चकवले. त्याने हवात मारलेला फटका रवींद्र जडेजाने सूर मारत जमिनीपासून काही इंचावर पकडला आणि जेसन रॉय 66 धावा करून बाद झाला.

जॉनी बेअरस्टोने टीकाकारांना सडेतोड उत्तर देताना उभारलेली शतकी खेळी लक्षणीय ठरली. अवघ्या 90 चेंडूत बेअरस्टोने 8 चौकार आणि 6 षटकारांसह शतक झळकावले. आता धावसंख्येचा स्फोट होणार वाटत असताना महंमद शमीने फलंदाजांना बाद करायचा सपाटा लावला. वर्चस्व गाजवायच्या षटकात इंग्लंडच्या धावगतीला ब्रेक्स लागले. गरज जाणून बेन स्टोकस झकास फटकेबाजी करत 53 चेंडूत 79 धावा काढल्या. कुलदीप - चहलच्या 20 षटकात 160 धावा काढल्या गेल्याने इंग्लंडला 7 बाद 337 धावांचे आव्हान उभारता आले.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News