समतेचे वारकरी : गाडगेबाबा आणि तुकडोजी

डॉ.अशोक राणा,यवतमाळ
Friday, 12 July 2019

पंढरीचा विठूराया लेकुरवाळा आहे. तो एकटाच विटेवर उभा असला तरी त्याच्या अवती-भवती त्याच्या लेकरांचा मेळा सतत वावरत असतो. संत जनाबाईने या लेकुरवाळ्या विठुमाऊलीचे केलेले वर्णन समकालीन व प्रातिनिधिक स्वरूपाचे असले तरी त्यामधून आईच्या वात्सल्याचे दर्शन आपणास घडते. या वात्सल्याची जाणीव सर्वप्रथम संत शिरोमणी नामदेवांना झाली व त्यामुळेच त्यांनी विठोबाला विठाई म्हणून संबोधले.  आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांमध्ये कोणताही भेदभाव करीत नाही, त्याप्रमाणेच विठोबाच्या चरणी लीन होणाऱ्या प्रत्येकाला विठाई माऊलीचे प्रेम सारखेच मिळते अशी भावना यामागे आहे.

ashokrana.2811@gmail.com                                                                9325514277

पंढरीचा विठूराया लेकुरवाळा आहे. तो एकटाच विटेवर उभा असला तरी त्याच्या अवती-भवती त्याच्या लेकरांचा मेळा सतत वावरत असतो. संत जनाबाईने या लेकुरवाळ्या विठुमाऊलीचे केलेले वर्णन समकालीन व प्रातिनिधिक स्वरूपाचे असले तरी त्यामधून आईच्या वात्सल्याचे दर्शन आपणास घडते. या वात्सल्याची जाणीव सर्वप्रथम संत शिरोमणी नामदेवांना झाली व त्यामुळेच त्यांनी विठोबाला विठाई म्हणून संबोधले.  आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांमध्ये कोणताही भेदभाव करीत नाही, त्याप्रमाणेच विठोबाच्या चरणी लीन होणाऱ्या प्रत्येकाला विठाई माऊलीचे प्रेम सारखेच मिळते अशी भावना यामागे आहे.

समतेचा हा अत्युच्च आदर्श पुढे ठेऊन नामदेवांनी वारकरी संप्रदायाची उभारणी केली. त्यामुळे त्यांच्या प्रभावळीत चोखामेळा किंवा जनाबाई यांना सहज प्रवेश मिळाला.  बडव्यांचा जाच सहन न होणाऱ्या चोखामेळ्याने आपला सारा राग विठोबासमोर काढला.  त्याचप्रमाणे अस्पृश्यतेचे चटके सहन करणाऱ्या चोखामेळा यांच्या कुटुंबातील साऱ्याच सदस्यांनी आपापला संताप व्यक्त करताना विठोबाचे उट्टे काढले.  संत जनाबाई तसेच कान्होपात्रेनेही आपल्यावरील अन्यायाकरिता विठोबालाच जबाबदार धरले होते.  इतका हक्क ते त्याच्यावर का दाखवीत असत हा एक प्रश्नच आहे. अर्थात, त्यामागे महाराष्ट्रातील समतेची परंपरा कारणीभूत असावी.  ही परंपरा शैव की वैष्णव संप्रदायातून आली हेही पाहिले पाहिजे. 

वैष्णव परंपरा वैदिक म्हणजेच चातुर्वर्ण्यावर आधारित ब्राह्मणी धर्माला जवळची तर शैव परंपरा उघडपणे भेदभावाला प्राधान्य देणाऱ्या वैदिकांना विरोध करणारी होती. या दोन्ही संप्रदायांमधील संघर्ष संपवून तसेच त्यांच्यामध्ये समन्वय साधून सामाजिक समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय अस्तित्वात आला. त्याचप्रमाणे शिव आणि विष्णू यांच्या मूर्तिविधानामध्ये कुठेही न आढळणारी लक्षणे लेऊन विठ्ठल मूर्ती साकारली गेली. अशा लोकविलक्षण मूर्तीला पूजणारा वारकरी संप्रदाय अठरापगड जातींना आपल्या कवेत घेणारा आहे.  त्यामुळेच दरवर्षी आषाढी एकादशीला वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी आतुरतेने पंढरीची वारी करतात.  अशाच वारकरी वर्गामधील कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विदर्भातील संत होते.

 कर्मयोगी संत गाडगेबाबा 
अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यात असलेल्या शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी जन्मलेल्या गाडगेबाबांचे बालपणीचे नाव डेबू असे होते. बाळसेदार व गोऱ्या डेबूला हे नाव मिळण्यामागे त्यांच्या पोटाचा गरगरीत आकार होता. त्यांची आई सखुबाई आणि वडील झिंगराजी जानोरकर .  झिंगराजी व्यसनी व कर्जबाजारी होते व त्यात त्यांना पुढे कुष्ठरोग जडला. त्यामुळे गावातील लोक त्यांना टाळू लागले,म्हणून त्यांनी गाव सोडले.   डेबू आठ वर्षाचा असतानाच झिंगराजी मरण पावले. अशा स्थितीत सखुबाईने आपले माहेर गाठले. डेबूचे यापुढील आयुष्य मामांच्या छायाछत्राखाली आजच्या भातकुली तालुक्यातील दापुरा येथे गेले. तेथून जवळ असलेल्या ऋणमोचन या गावी त्याने शिवमंदिरात गोपाळकाला म्हणजे सहभोजनाचा कार्यक्रम घडवून आणला.     जातीपातीचा भेद नसणाऱ्या या सहभोजनात गावातील इतर मुलांसह महार-मांगांच्या मुलांनीही भाग घेतला. त्यामुळे गावातील सनातनी लोकांच्या मनात संताप निर्माण झाला.  आपला धर्म डेबूने बुडविला असे ते म्हणू लागले, परंतु त्याची डेबूने पर्वा केली नाही.

 वयाच्या बारा-तेरा वर्षाच्या काळातच डेबूला मामाच्या शेतात कष्टाची कामे करावी लागलीत. त्याच्या कर्तबगारीचा दिंडीम दापुराच्या पंचक्रोशीत पसरला होता. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचा विवाह कमालपूर येथील धनाजी खल्लारकर यांची कन्या कुंताबाईशी झाला. एक कुशल शेतकरी म्हणून नावारूपाला आलेल्या डेबूला एक वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागले. कर्जबाजारी झालेल्या मामाची शेती चंद्रभान सावकाराने आपल्या घशात घातली होती. चौसष्ट एकर जमीन गहाण ठेवून सावकाराने तिच्यावर आपला हक्क सांगितला होता. त्यामुळे डेबूच्या मामाने या धक्क्यानेच आपला प्राण सोडला. डेबूला त्यामुळे संताप येऊन सावकाराशी दोन हात करावे लागले. शेवटी सावकाराने त्यातील पंधरा एकर जमीन त्याला परत केली. या जमिनीवर त्याच्या कुटुंबाची गुजराण होऊ लागली. परंतु डेबू केवळ आपल्या कुटुंबापुरता मर्यादित नव्हता. बालपणीच त्याला आपल्या अवती-भवतीच्या लोकांविषयी आस्था होती. समाजातील आळस, व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा,जातिभेद, अंधश्रद्धा या समस्यांशी दोन हात करावेत असे त्याला नेहमीच वाटत असे. अध्यात्माविषयी ओढ असलेल्या डेबूने गुरूमंत्र घ्यायचे ठरविले. त्यांच्या गावाजवळच दौलात्गिरी गोसावी नावाचा बुवा प्रसिद्धीस आला होता. त्याचे दर्शन घ्यायला गेल्यावर डेबूला कळले की,दारू प्यायला दिल्याशिवाय तो गुरुमंत्र देत नाही. बुवाची अशी कीर्ती ऐकल्यावर डेबू आल्या पावली परत गेला. 

 पंढरपुरात डेबूजी
आपल्या मनाच्या शान्तीकरिता त्याने तीर्थयात्रा करायचे ठरविले व तो पंढरपूरला आला. आषाढी एकादशीच्या वारीसाठी सारे पंढरपूर फुलून गेले होते. वारकऱ्यांचा उत्साह एकीकडे शिगेला पोचला असताना काही भुरटे चोर मात्र त्यांचे खिसे रिकामे करण्याच्या उद्योगात मग्न होते. व्यापारी व पुजारी भाविकांची लूट करताना त्याने पाहिले.  धनिकांसाठी विठूमाउलीची सहज भेट तर भाविक मात्र रांगेत उभे असलेले पाहून त्याला या भेदभावाची अतिशय चीड आली. विठुरायाच्या चरणावर डोके ठेवणाऱ्या भक्तांना गचांडी देणारे बडवे पाहून तर त्याला उद्वेग आला. विठोबाच्या दर्शनापेक्षा तेथे येणाऱ्या गोर-गरीब भाविकांची सेवा करण्याचे त्याने ठरविले. नंतर त्याने कधीही विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. परंतु भाविकांच्या सेवेसाठी तेथे धर्मशाळा बांधली.

डेबूजीचा गाडगेबाबा झाला
भातकुली जवळील ऋणमोचन येथे दरवर्षी पौष महिन्यात यात्रा भरते. १९०५ च्या यात्रेला डेबूजी आपल्या कुटुंबासह आला होता. तेथे भाविकांची होणारी गैरसोय पाहून त्याने त्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. आपले बिऱ्हाड सोडून त्याने अंगावर फटके कपडे घातले व एका हातात गाडगे तर दुसऱ्या हाती काठी घेऊन तो निघाला. लोकांच्या सेवेत मग्न झालेला डेबूजी आता गाडगेबाबा या नावाने ओळखला जाऊ लागला. त्याच्या लोकसेवेच्या कार्यात लोकांचाही सहभाग वाढू लागला. गावोगावी फिरून गाडगेबाबांनी कीर्तने सुरू केलीत.  अंगावर फाटक्या कपड्यांची ठिगळे लावलेले कपडे आणि चिंध्या पाहून कुणी त्यांना चिंधेबाबा,गोधडे महाराज या नावांनीही  संबोधू लागले. गावात गेल्यावर प्रथम ते सारा गाव आपल्या खराट्याने झाडून काढीत आणि नंतर त्याच गावात कीर्तन करीत असत. त्यांचे कीर्तनही प्रचलित कीर्तनकारांपेक्षा वेगळे होते, तसाच त्यांचा पेहेरावही वेगळाच होता. फाटक्या चिंध्याचे वस्त्र,कानात फुटलेल्या बांगड्यांची कर्णभूषणे तर डोईवर फुटलेल्या गाडग्याचे शिरोभूषण. तर पायातील मोजेही वेगवेगळ्याप्रकारचे असत. प्रस्थापित कीर्तनकारांसारखी वाद्यांची साथ-संगतही त्यांच्याजवळ नव्हती. गावातीलच कुणी त्यांना वेळेवर साथ करीत असे.

महाराष्ट्रात वारकरी,पुणेरी व रामदासी अशा कीर्तनाच्या तीन परंपरा आहेत,त्यात कुठेही गाडगेबाबांचे कीर्तन बसत नव्हते. कारण की,ते या प्रकारच्या कोणत्याही परंपरेतून आलेले नव्हते,तर विपरित परिस्थितीतून त्यांनी आपली वेगळी कीर्तनशैली शोधली होती. त्याचप्रमाणे त्यांची निवेदन पद्धतीही वेगळीच होती. परंतु,या पद्धतीला एक प्राचीन परंपरा होती. जगातील सर्वच प्राचीन प्रबोधनकार आपल्या श्रोत्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून त्यांची उत्तरे मिळवीत असत. असे प्रश्नोत्तर पद्धतीने त्यांचे कीर्तन रंगत असे. आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीत प्रश्नोत्तर पद्धतीला महत्त्व आले आहे. गाडगेबाबांनी तिचा स्वीकार कितीतरी आधीच केला होता. म्हणून त्यांना लोकशिक्षक म्हटले जाते. 

वारकरी संप्रदायाचा प्रभाव, पण...
आपल्या कीर्तनातून गाडगेबाबा निरर्थक कर्मकांडे आणि अनिष्ट प्रथा-परंपरांवर कठोर प्रहार करीत असत. त्यासाठी ते नेहमी संत तुकोबाराय व संत कबीर यांच्या वचनांचा आधार घेत असत. ईश्वर केवळ मंदिरात नाही,तर सर्वत्र आहे,त्याची भक्ती मंदिरात नाही तर दीन-दुबळ्या लोकांची सेवा करून करा ; असा उपदेश ते आपल्या कीर्तनातून करीत असत. प्रचलित वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांच्या मांडणीपेक्षा त्यांची मांडणीही वेगळी होती. वारकरी संप्रदायातील समतेचे तत्व खऱ्या अर्थाने आत्मसात करून त्याला विवेकवादी विचाराची जोड देवून त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तने केलीत. त्यांचे मुंबई येथील बांद्रा पोलीस स्टेशनच्या आवारात ८ नोव्हेंबर १९५६ रोजी झाले व तेवढेच ध्वनिमुद्रित स्वरुपात उपलब्ध आहे. त्यातील त्यांच्या मांडणीवरून त्यांच्या विचारांचा परिचय आपणास होतो.

त्यांच्या कीर्तनातून बुद्धाची करुणा,तुकारामांचा परखडपणा आणि कबीराचा बिनतोड युक्तिवाद यांचे दर्शन आपणास होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतर विभागांपेक्षा विदर्भातील वारकरी संप्रदायाचे स्वरूप वेगळे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा प्रारंभही त्यामुळेच विदर्भात झाला. भुकेलेल्यांना अन्न,तहानलेल्यांना पाणी,उघड्या-नागड्या लोकांना वस्त्र,निरक्षरांना शिक्षण,बेघरांना घर,रोग्यांना औषध,बेरोजगारांना रोजगार,मुक्या प्राण्यांना अभय,गरीब व दुर्बलांना लग्नासाठी मदत आणि दुःखी-कष्टी लोकांना आधार द्यावा असे गाडगेबाबा नेहमी सांगत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊसाहेब पाटील आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. या तिघांच्याही कार्यात त्यांनी मोलाचे योगदान केलेले आहे. आपल्या पंढरपूर येथील धर्मशाळेचे विश्वस्त म्हणून त्यांनी डॉ.आंबेडकरांना नेमले होते. १४ नोव्हेंबर १९५६ रोजी त्यांचे शेवटले कीर्तन पंढरपूर येथे झाले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. ६ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाल्याची बातमी त्यांनी ऐकली आणि त्यांचे सारे अवसान गळाले. शेवटी २० डिसेंबर १९५६ रोजी गाडगेबाबा आपल्यातून गेलेत. त्यांच्या विचारांचा वसा घेतलेले अनेक विचारवंत आणि अनुयायी आजही महाराष्ट्रात आझेत. त्यापैकी एक आहेत,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.   विदर्भातील हे दुसरे संत होत. त्यांनी गाडगेबाबांचा अंत्यसंस्कार केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार तालुक्यातील यावली हे तुकडोजींचे जन्मगाव. त्यांचे आजोबा गणेशपंत हे विठ्ठलाचे निस्सीम उपासक होते. आषाढी एकादशीची पंढरीची वारी त्यांनी कधीही चुकविली नाही. संपूर्ण ज्ञानेश्वरी त्यांना मुखोद्गत होती. त्यांना सात मुली आणि एक मुलगा झाला. त्या मुलाचे नाव होते,बंडोपंत. हेच तुकडोजींचे पिता होत. त्यांच्या वागण्यातील बंडखोरीमुळे त्यांना बंडोपंत हे नाव मिळाले होते. त्यांचा पंढरीच्या वारीवर मुळीच विश्वास नव्हता. कारण की, ही वारी करणाऱ्या त्यांच्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीत कोणतीही प्रगती झाली नव्हती. त्यांची पत्नी म्हणजे अमरावती जिल्ह्यातील वरखेड येथील तुकारामबुवा वानखेडे यांची मुलगी मंजुळा . तिच्या पोटी ३० एप्रिल १९०९ रोजी तुकडोजीचा जन्म झाला. वरखेड येथील संत आडकोजी महाराज यांनी बाळाला भाकरीचा तुकडा भरविला व त्याचे नाव ठेवले तुकड्या. बंडोजींचा स्वभाव धरसोडपणाचा होता. त्यामुळे माता मंजुळा आणि तुकड्या यांची नेहमीच फरफट होत असे. अशा ताण-तणावात तुकड्याचे बालपण गेले. वडिलांच्या व्यसनी वृत्तीमुळे तुकड्या संसारापासून विरक्त झाला.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि चंद्रपूर जिल्ह्यातील रामदिघी तसेच चिमूर येथील अरण्यात त्याने साधना केली. या दरम्यान अनेक साधू-संतांचा सहवास त्याला लाभला. त्यातून तुकड्याचे व्यक्तिमत्त्व आकाराला आले व तुकडोजी महाराज या नावाने त्यांना ओळखले जाऊ लागले.  आदिवासींच्या व्यथा-वेदना जाणून त्यांनी त्यांची मनोभावे सेवा केली. समाजातील कुरीतीविरुद्ध जन-जागरण करण्याकरिता त्यांनी कवने रचलीत. खंजिरी वाजवून ते भजने करीत असत. त्यांच्या भजनांची पुस्तकेही प्रकाशित झालीत. त्यांच्या समाजहितकारक कार्यामुळे त्यांचा महात्मा गांधीजींशी परिचय झाला व ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामील झालेत. भारत छोडो आंदोलनात त्यांना अटक झाली आणि तुरुंगवासही  भोगावा लागला होता. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी दहा दिवसात ११४१० एकर जमीन मिळवून देवून अतिशय मोलाचे योगदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी देशाच्या उभारणीत सहभाग घेतला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत या उपाधीने संबोधले. त्यामुळे सारेच त्यांना राष्ट्रसंत म्हणून संबोधू लागले. 

पंढरीची वारी आणि अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेश आंदोलन
आपल्या आजोबा आणि आजीप्रमाणेच तुकडोजी महाराजही नियमितपणे आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीला न चुकता जात असत. २१ जुलै १९४५ रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला तुकडोजी गेले असता त्यांनी अस्पृश्यांना मंदिराबाहेर दर्शनासाठी ताटकळत असताना पाहिले.  आपल्या दुःखाला वाट करून देण्याकरिता ते विठ्ठल मंदिरासमोर असलेल्या संत चोखामेळा यांच्या पायरीवर बसले. नेहमी मंदिरात सहज प्रवेश करणारे महाराज असे बाहेर का बसले आहेत असा प्रश्न बडव्यांना पडला. तेथे उपस्थित वारकऱ्यांमध्येही पंढरपूरला येऊनही विठ्ठलाचे दर्शन न करणाऱ्या महाराजांबद्दल प्रश्न पडला. खरे कारण कळल्यावर त्यांच्यामध्येही गोंधळ उडाला.  त्यामुळे धर्ममार्तंड अस्वस्थ झाले. त्यांच्यापैकी काहींनी त्याविषयी विचारल्यावर महाराज म्हणाले:

“समाजात काही विशिष्ट जातीत जन्मास आलेल्या लोकांना इतर अनेक बाबतीत मागे पडावे लागते,अनेक न्याय्य लाभांपासून दूर राहावे लागते,ही वस्तुस्थिती अत्यंत खेदजनक आहे,यात शंका नाही. परंतु या सर्वांवर कळस चढविणारी गोष्ट म्हणजे कित्येकांना ‘ पतितपावन’ भगवंताच्या मंदिरात जाऊन त्याचे दर्शन घेण्यासही बंदी केली जाते. देवाच्या दर्शनाने ते पावन होण्याऐवजी त्यांच्या सावलीने देवच बाटतो,असे अत्यंत विसंगत व विकृत विचार मांडून लोक त्यांना कुत्र्या-मांजरापेक्षाही नीच लेखतात. मानवतेला व भक्तिभावाला कलंक लावणारी गोष्ट याहून दुसरी कोणती ?”
महाराजांनी आपले याविषयीचे मत काही कार्यकर्त्यांकडे लेखी स्वरुपात दिले. ते कळताच काही सनातन्यांनी महाराजांना शास्त्रार्थ करण्याचे आव्हान दिले. त्याला योग्य शब्दात महाराजांनी पत्र दिले. परंतु त्या पत्राचे उत्तर मात्र मिळाले नाही. एका कीर्तनकाराने मिश्किलपणे प्रश्न केला की,वरखेडच्या आपल्या गुरुमहाराजांच्या समाधी मंदिराचं काय ?” त्यावर महाराज म्हणाले की,” याच कारणाने मी स्वतः उभारलेल्या समाधी मंदिरात जाण्याचे सोडले आहे.  पंढरपूरहून महाराज वरखेडला आल्यावर तेथील लोकांनी आपण पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश का केला नाही,हा प्रश्न केला.  त्यावर महाराजांनी तेथील वृत्तांत त्यांना सागितला आणि जोपर्यंत याही ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश नसेल तर मीही या मंदिरात जाणार नाही असे ठामपणे सांगितले. महाराजांचा हा दृढ निश्चय पाहून गावकरी मंडळींनी ७ ऑगष्ट १९४६ रोजी सर्वांसाठी आडकोजी महाराजांचे समाधी मंदिर खुले केले. तेथील कार्यकर्त्यांनी महाराजांच्या विनंतीनुसार गावातील अस्पृश्यांना आपल्या हातात हात धरून मंदिरात नेले. सार्वजनिक विहिरी आणि मंदिरे सर्वांसाठी खुल्या कराव्यात असे मत आपल्या भजनामध्ये महाराजांनी मांडले होते, त्यानुसार ते आग्रही होते. त्यानुसार गावोगावच्या गुरुदेव सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील मंदिरे आणि विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या केल्यात. त्यामुळेच अस्पृश्यांसाठी पंढरपूरचे मंदिर खुले व्हावे यासाठी आमरण उपोषण आंदोलन करणाऱ्या पू.साने गुरुजी यांच्यासोबत तुकडोजी होते. साने गुरुजींनी ४ नोव्हेंबर १९४६ रोजी आमरण उपोषण सुरू केले,तेव्हा तुकडोजींनी त्यांना पाठिंबा दिला. १० मे १९४७ रोजी साने गुरुजींचे उपोषण संपले, तेव्हाही तुकडोजी त्यांच्यासोबत होते. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले.

ग्रामगीतेची प्रेरणा पंढरपुरात
२३ जुलै १९५३ या दिवशी आषाढी एकादशी होती. या दिवशी पंढरपूरला महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून आलेले पांडुरंगाचे भक्त पाहून त्यांच्याकरिता आपण काय करू शकतो हा विचार त्यांच्या मनात आला. त्यांच्या संवेदना तीव्र झाल्यात आणि त्यांनी सर्व सामान्य माणसाकरिता ‘ ग्रामगीता ‘ हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला. महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्याची संकल्पना या ग्रंथामधून त्यांनी विस्ताराने सांगितली आणि आपल्या चिंतनाचे सारही त्याद्वारे व्यक्त केले.    आपल्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून राष्ट्रसंतांनी चार-पाच महिन्यांमध्ये ग्रामगीतेची रचना केली.  त्यांनी ४१ अध्यायांमधून ४६७५ ओव्या रचल्यात. प्रवासातही ते ग्रामगीतेचे लेखन करीत असत. गावाचा पोशिंदा शेतकरी हा या ग्रंथाचा केंद्रबिंदू आहे. त्यालाच ग्रामनाथ असे संबोधून त्याला त्यांनी हा ग्रंथ अर्पण केला आहे.   १९५४ मध्ये ग्रामगीतेचे हस्तलिखित प्रवासात चोरी गेले होते.  परंतु काही दिवसांनी ते परत मिळाल्यामुळे तिचे प्रकाशन करण्यात आले.

एक हजार ठिकाणी ग्रामगीतेचे प्रकाशन
विदर्भ साहित्य संघाचे १८ वे अधिवेशन भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे भरले होते.   या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रसंतांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात २५ डिसेंबर १९५५ रोजी ग्रामगीतेच्या रचनेबद्दल राष्ट्रसंतांचे अभिनंदन करण्याचा ठराव सर्वानुमते संमत झाला. यावेळी राष्ट्रसंतांचा सत्कारही केला गेला. याच अधिवेशनात ग्रामगीतेचे प्रकाशन करण्यात आले.

२५ डिसेंबर रोजी गीता जयंती होती. त्यानिमित्त राष्ट्रसंतांच्या आदेशावरून एक हजार गावांमध्ये थोरा-मोठ्यांच्या हस्ते ग्रामगीतेचे प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त अनेक विधायक कार्यक्रम त्या त्या गावांमध्ये झाल्यामुळे सारी गावे चैतन्याने भारून गेली होती. नागपूरच्या टाऊन हॉलमध्ये झालेल्या ग्रामगीता प्रकाशन समारंभात समाज कल्याण विभागाच्या अध्यक्ष सौ.रमाबाई तांबे,डॉ.वि.भि.कोलते,माजी न्यायमूर्ती भवानीशंकर नियोगी इत्यादींनी भाषणे दिलीत. अशारितीने इतर गावांमध्येही मान्यवरांनी ग्रामगीतेचे प्रकाशन केले.

धर्मकार्य व राष्ट्रकार्य 
राष्ट्राच्या उभारणीकरिता धर्माचा वापर करणारे तुकडोजी महाराज हे एकमेव संत होत. त्यांनी जपानमध्ये २३ जुलै १९५५ रोजी भरलेल्या विश्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. बुद्धाच्या पंचशील तत्वाच्या आधारे विश्वधर्माची संकल्पना त्यांनी तेथे मांडली. या परिषदेचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते झाले. त्यांच्या खंजिरीवादनाने विदेशातील प्रतिनिधींना मंत्रमुग्ध केले होते. जगाला शांततेच्या मार्गाकडे वळविण्याकरिता धर्मसुधार,धर्मसंघटन आणि धर्मप्रसार कसा उपकारक आहे,हे त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. या दृष्टीने त्यांनी उचललेले पहिले पाऊल म्हणजे ९ एप्रिल १९५६ रोजी हृषीकेश येथे भरविलेला संत-महात्म्यांचा मेळावा होय. या ठिकाणी त्यांनी भारत साधू समाजाची स्थापना केली. संत गाडगेबाबा,सितारामदासबाबा,लहानुजी महाराज,सत्यदेवबाबा,दामोदर महाराज इ.संत त्यांच्या सोबत असत.

भारतावर १९६२ मध्ये चीनच्या आणि १९६५मध्ये झालेल्या पाकिस्तानच्या आक्रमणाच्या वेळी त्यांनी सैनिकांचे मनोबळ वाढविण्याकरिता जन-प्रबोधन करून आर्थिक मदत केली. त्याचप्रमाणे स्वतः सीमेवर जावून सैन्याला दिलासा दिला.

पंढरपूरला शेवटले भाषण व भजन
देश-विदेशात समाजप्रबोधनासाठी प्रवास करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शेवटले भाषण व भजन आषाढी एकादशीच्या दिवशी १९६७मध्ये पंढरपूर येथे झाले. १९६५च्या डिसेंबर रोजी त्यांना कर्करोगाची बाधा झाल्याचे निदान झाले होते. तरीही त्यांनी आपल्या दैनंदिन कार्यात खंड पडू दिला नाही. त्यांनी स्थापन केलेले गुरुदेव सेवा मंडळ त्यांनी संचालक मंडळाच्या स्वाधीन केले. पंढरपुरात विशाल जनसमुदायासमोर त्यांनी दिलेले भाषण व भजन अखेरचे ठरले. यावेळी ते म्हणाले की विठ्ठलाच्या दरबारची माझी ही अखेरची भेट आहे. कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे शेवटचे कीर्तनही पंढरपुरातच झाले होते. या दोन्ही संतांची पंढरपुराविषयीची ओढ अनन्यसाधारण होती. ११ ऑक्टोबर १९६८ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची खंजिरी कायमची मूक झाली. परंतु त्यांची भजने आणि ग्रामगीता त्यांच्या विचाराचे आणि गुरुदेव सेवा मंडळ हे कार्याचे स्मारक म्हणून आपणाला सतत प्रेरणा देत राहील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News