मतदानाचं काही माहित नाही, मात्र नेत्यांवर सट्टामात्र चालतोय तेजीत
- तब्बल ४७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनबंद झाले. आता मतदानाच्या दुसऱ्या दिवसांपासून आमदाराची परीक्षा कोण होईल उत्तीर्ण? या चर्चेला उधाण आले आहे.
गोंदिया /अर्जुनी मोरगाव - विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रांत सोमवारी (ता. २१) शांततेत मतदान झाले. तब्बल ४७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनबंद झाले. आता मतदानाच्या दुसऱ्या दिवसांपासून आमदाराची परीक्षा कोण होईल उत्तीर्ण? या चर्चेला उधाण आले आहे. तशी आकडेमोड होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवारांचे ब्लडप्रेशर सध्यातरी वाढले आहे. हे प्रेशर २४ तारखेपर्यंत कायम राहणार आहे. विधानसभा निवडणुकीकरिता सोमवारी (ता. २१) मतदान झाले. तत्पूर्वी, प्रचाराच्या पंधरा दिवसांच्या काळात सर्वच उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. आजपर्यंत केलेली विकासकामे, शिवाय निवडून दिल्यास आपण कोणकोणती विकासकामे करणार आहोत, याचा पाढा वाचत उमेदवारांनी प्रचार कालावधीत मतदारांना मतांचा जोगवा मागितला. गोंदिया विधानसभा क्षेत्रात अपक्ष विनोद अग्रवाल विरुद्ध भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्यात खरी लढत झाली. या मतदारसंघात दोन्ही अग्रवालांपैकी आमदाराच्या खुर्चीवर कोण विराजमान होईल, याची आकडेमोड केली जात आहे. या आकडेमोडीच्या गणितात अपक्ष विनोद अग्रवाल उत्तीर्ण होणार असल्याचे बोलले जाते.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मनोहर चंद्रिकापुरे व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजय लांजेवार यांच्यात लढत झाली. तिरंगी लढत असली तरी, आमदार राजकुमार बडोले की मनोहर चंद्रिकापुरे या दोन्ही नावांचीच चर्चा या विधानसभा क्षेत्रात आहे. यात मतदारांच्या आकडेमोडीवरून राजकुमार बडोले हे आमदारकीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात, असा अंदाज बांधण्यात आला आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजय रहांगडाले व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्यात खरी लढत झाली. विजय रहांगडाले गत पाच वर्षांत केलेल्या विकासकामांना घेऊन मतदारांसमोर गेले. रविकांत बोपचे यांचे वडील माजी खासदार खुशाल बोपचे हे पूर्वाश्रमीचे भाजप कार्यकर्ते आहेत. भाजपने मुलगा रविकांत यांना तिकीट नाकारल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अन् रविकांत यांना उमेदवारीदेखील मिळाली. खुशाल बोपचे यांचे भाजपमधील समर्थक त्यांच्या बाजूने उभे राहिले.
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रचारसभाही या क्षेत्रात घेतली. याचा फायदा रविकांत बोपचे यांना मिळणार असल्याचे मतदारांमधून बोलले जाते. तिकडे आमगाव विधानसभा क्षेत्रात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय पुराम आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सहसराम कोरोटे यांच्यात थेट लढत झाली. या क्षेत्रातील एका लोकप्रतिनिधीचा बारबालांसोबत नाचतानाचा आणि पैसे उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या मतदारसंघातच नव्हे, तर सबंध जिल्ह्यात चर्चा झाली होती. याचा परिणाम मताधिक्यावर होईल, असेही बोलले जात होते. मध्यंतरी मात्र या चर्चेने पूर्णविराम घेतला. त्यामुळे या मतदारसंघात आमदारकीची खुर्ची कोणाला मिळेल, हे येत्या २४ तारखेला कळेल. सध्या मतदान झाले असले तरी, चारही विधानसभा क्षेत्रांतील विजयाचा दावा करणाऱ्या उमेदवारांचे ब्लडप्रेशर हाय झाले आहे. हे प्रेशर मतमोजणीच्या दिवसांपर्यंत कायम राहणार आहे.