विठ्ठलभक्तीचा श्रद्धानंद!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 19 July 2019

आषाढी एकादशीला वारी पंढरपुरात पोहोचते आणि चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठलभक्तीचा महासागर पाहायला मिळतो. पांडुरंगमय झालेल्या वारकऱ्यांना ओढ असते विठ्ठलचरणी श्रद्धापूर्वक नमन करण्याची. तो श्रद्धानंद लाखो वारकरी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने साजरा करणार आहेत.

आषाढी एकादशीला वारी पंढरपुरात पोहोचते आणि चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठलभक्तीचा महासागर पाहायला मिळतो. पांडुरंगमय झालेल्या वारकऱ्यांना ओढ असते विठ्ठलचरणी श्रद्धापूर्वक नमन करण्याची. तो श्रद्धानंद लाखो वारकरी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने साजरा करणार आहेत.

मारुती महाराज चोरट
विठ्ठलाचं रूप डोळाभरून पाहण्यासाठी वाटेतल्या प्रत्येक अडचणीवर हसत हसत मात करत वारकरी आषाढी एकादशीला पंढरीत पोहोचतात. पंढरीजवळ आल्यानंतर भलमोठं अंतर पायी चालत येणाऱ्या प्रत्येकाचा शीण निघून जातो. परिसरातल्या मातीचा सुगंध आला, तिचा पदस्पर्श झाला, चंद्रभागेचं स्नान झालं की प्रत्येक जण शारीरिक श्रम विसरतो आणि पांडुरंगमय होऊन जातो. खांद्यावर नाचवत आणलेली पताका चंद्रभागेत बुडवून काढली आणि नदीत डुबकी मारून अथवा पाय धुवून विठ्ठलाच्या मंदिर कळसाचं दर्शन घेतलं, की प्रत्येकाच्या मनात श्रद्धाभाव उचंबळून येतो आणि आपल्या वृत्ती पावन झाल्याचा साक्षात्कार त्यांना घडतो. त्यावेळी त्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही.

पंढरी दृष्टिक्षेपात आल्यानंतरच वारकऱ्यांच्या आनंदाला भरतं यायला सुरुवात होते. संत तुकारामांच्या एका अभंगातील शेवटच्या चरणात म्हटल्याप्रमाणे 
तुका म्हणे धावा।
आहे पंढरी विसावा।।

या भावाला अनुसरून हजारो वारकरी पंढरीकडे धाव घेतात, त्यालाच धावा असं म्हणतात. हे एक व्रत आहे. भक्तांची भेट घेताना विठ्ठल कोणताही आडोसा ठेवत नाही, आडपडदा ठेवत नाही. अगदी सामान्यातला सामान्यही त्याच्या पायाशी जाऊन श्रद्धापूर्वक नमन करू शकतो. असा स्नेहभाव असल्यामुळेच आषाढी एकादशी हा पंढरीतला भक्तीचा महाकुंभ ठरतो.

‘नाम घेता वाट चाले, यज्ञ पावला पाऊली घडे’ ही इथपर्यंत येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची मनोभूमिका आहे. पूर्वी इच्छित कामना पूर्ण होण्यासाठी यज्ञयाग केले जायचे. परंतु आता ही यज्ञसंस्कृती शिल्लक राहिलेली नाही. अर्थात असं असलं तरी मुखी नामाचा गजर करणं हे यज्ञासमान असून तेच आपल्याला तारू शकतं, असा एक विचार मांडलेला आहे.   ही एक श्रद्धा आहे, विठ्ठलाप्रतीचं अमाप प्रेम आहे, त्याच्यावरील अपूर्व विश्‍वास आहे आणि अपार निष्ठा आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे येत राहिले तरी वारकरी वारी करण्यास कंटाळत नाहीत. गर्दीमुळे विठ्ठलाचं दर्शन झालं नाही तरी ते हिरमुसत नाहीत. अनंत वेळा ते रूप पाहिलं तरी मनीची ओढ संपत नाही. कारण विठ्ठल त्या मूर्तीत आहे तसाच सगळीकडे त्याचा संचार आहे. म्हणूनच हाडाचा वारकरी सगळ्यांठायी त्याचं दर्शन घेतो. या वेळी त्याच्या मनात एक वारी पूर्ण केल्याचं समाधान असतंच; पण त्याच वेळी पुढल्या वारीला येण्याची खूणगाठही त्याने मनाशी बांधलेली असते.

तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक।
विठ्ठलची एक देखलीया।।

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News