मुलींच्या संसारातील खलनायिका?

अर्चना अनंत धवड
Tuesday, 13 August 2019

सासू कधी आई होऊच शकत नाही ही मानसिकता घेऊनच मुलगी सासरी पाउल ठेवते...

सासु... खरच इतकी वाईट असते का? सासुबाई म्हंटल की डोळ्यासमोर एखादी खलनायिकाच येते... सासू सुने बद्द्लचे सगळे लेख वाचले अणि त्यावरील कमेंट वाचले की धडकीच भरते... 95 टक्के कमेंट हे नकारात्मक असतात...

एक आई जी प्रेमाची मूर्ती, वात्सल्याचा झरा, आपल्या लेकरा साठी वेळप्रसंगी जीव देणारी आई सासूच्या भूमिकेत शिरल्यावर इतकी खलनायिका कशी बनते... रस्त्यावर एखाद अनवाणी मुल दिसले, एखादी भिकारी बाई दिसली की तिच्या हृदयाला पाझर फुटतो... ती नवऱ्याला म्हणते... काही द्या की हो... पण तीच सासू आपल्या सुनेशी दृष्टपणे वागते... फक्त भूमिका बदलली की स्त्रीचा स्वभाव इतका बदलतो... एक प्रेमळ आई खाष्ट सासू होते... असे का? खरच यात केवळ सासुबाई च दोषी आहे का?

एक तर या सगळ्या मध्ये पूर्वापार चालत आलेला पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन कारणीभूत आहे... सासू म्हणजे आपल्या संसारातील खलनायिका असाच काहीसा समज झालेला असतो... सासू कधी आई होऊच शकत नाही ही मानसिकता घेऊनच मुलगी सासरी पाउल ठेवते...

बरोबरच आहे... आई कशी होईल ती... पूर्वीच्या काळी तरी लवकरच लग्न व्हायचे... आई वडील पण दिल्या घरी तू सुखी रहा म्हणायचे... डोली मे जायेगी तो अर्थिमे आओगी असं म्हणायचे... [चुकीचंच होत] त्यामुळे सासू कशीही वागली तरी कोवळे वय असल्याने ती तिला आई म्हणुन स्विकारायची किंवा तीला स्वीकारावं लागायचं...

आता लग्नाचे वय वाढलेत... त्याचबरोबर मुली स्वावलंबी झाल्यात... पंचवीस, तीस वर्षाच्या मुलीला जर तुम्ही म्हंटल की ही तुझी आई आहे, तर कस स्वीकारेल ती ते... जितक लहान रोप असेल, तितके ते पटकन रुजत... मोठ रोपटे दुसरीकडे लावायचे म्हणजे त्याला अनुकूल वातावरण पाहिजे... हे जरी खरे असले तरी झाडाची पण तडजोड करण्याची इच्छाशक्ती हवी... मोठ मोठी झाडे सुद्धा ऋतु नुसार स्वतःला सामावून घेतात... तुम्ही फक्त अनुकूल वातावरणाचीच अपेक्षा कराल अणि स्वतः सामावून घेण्याचे काहीच प्रयत्न नाही करणार तर ते रोपटे कोमेजून जाणारच...

एक स्त्री अनेक भूमिका पार पाडते... पण पत्नी अणि आई, ही तिच्या दृष्टीने एक खूप महत्त्वाची भुमिका असते... पत्नी च्या भूमिकेमुळे तिला अधिकार मिळाले असते... निदान ती आपल्या घराची राणी असते... अणि मातृत्व तर तकी सुखद भावना असते की बस!! अणि मुलाचे लग्न म्हणजे या तिच्या दोन गोष्टीवर घाला असतो जणू...

बर्‍याचशा स्त्रियांच विश्व ती, अणि मुले इतकेच असत... नवरा नोकरी करतो... आपल घर बर अणि आपली मुले... तिचा दिवसच मुलासाठी सुरू होतो... अगदी त्याच्या आवडीचे खायला घालणे... गरम करून वाढणे वगैरे... मुलगा मोठा होतो पण आई ही आईच असते... अणि अचानक लग्न झाले की मुलगा बदलतो. तो बदल स्वाभाविक असतो... पण वेडी आई ते समजून घ्यायला तयार नसते... अणि सुनेला ती आपल्या मुलाच्या प्रेमातील वाटेकरी समजते... काही आया समजदार असतात अणि पटकन परिस्थितीशी जुळवून घेतात... पण काही ना परिस्थितीशी जुळवून घेणे फार अवघड जाते... अणि मग त्या एकतर मुलाला बोलतात की तू मला विसरलास, बायकोचा गुलाम वगैरे... किंवा emotionally ब्लॅकमेल करतात...

इकडे बायको ला वाटते, तो माझा नवरा म्हणजे पहिला अधिकार माझा... ती पण समजून घेत नाही की, तीस वर्ष ज्या आई सोबत राहिला... तिला एकदम सोडून आपल्याकडे पूर्णपणे यावे ही अपेक्षाच का करावी. प्रेमाने वागून नवऱ्याचा विश्वास संपादन करावा म्हणजे नवरा आपलाच असतो पण काही मुलींना हे कळत नाही आणि आपला नवरा मातृभक्त अशी उपाधी त्या लावतात. अशा परिस्थितीत कित्येकदा मुलाचे सँडविचेस होते... तुझा नवरा आहे... तुलाच मिळणार आहे. थोडा बोलला, हसला आई, बहिणीशी तर काय हरकत आहे... पण नाही, तो माझा नवरा अणि आई म्हणते माझा मुलगा, मग या माझा, माझा या भावनेतून कुरबुरी ला सुरवात होते. अणि मतभेद निर्माण होतात

घरात आईच एकछत्री राज्य असते... कित्येक स्त्रियांना इकडची वस्तू तिकडे केलेली चालत नाही... मग तो नवरा असो मुलगा असो की मुलगी... एखादी वस्तु जर मुलीने इकडे तिकडे केली तर आई तिच्यावर ओरडते... मग मुलगी पण उत्तर देते... मला घाई होती... मग ठेवलीय तर काय बिघडले... अणि मायलेकींची चकमक होते... पण सुनेला म्हंटल... तर ती म्हणते की, यांना आवडत नाही बाई इकडची काडी तिकडे केलेली... मी तर हातच नाही लावत... असा फरक असतो... अणि असा गैरसमज करून घेते की यांच्या संसारात आपल्याला काहीच स्थान नाही... एक तर ती अलिप्त राहते नाहीतर भांडाभांडी करते... पण दोघीही एकमेकींना समजून घेत नाही...

तिच्या एकछत्री राज्यात जेव्हा सुन प्रवेश करते तेव्हा ते तिला ते आपल्या संसारातील अतिक्रमण वाटते. आपणही असच लग्न होऊन आलो हे सासू पूर्णपणे विसरते... काही स्त्रिया हा सृष्टीचा नियम म्हणुन स्विकारतात... पण काहीना स्विकारने फार अवघड जाते... एक तर मुलगा सुनेच्या ताब्यात गेला अणि आता घर ही सुनेच्या ताब्यात जाणार ही कल्पनाच त्यांना करवत नाही... मग त्या सर्व सूत्र आपल्या हाती ठेवून सुनेचा मदतनीस म्हणून उपयोग करतात... अणि ते कोणत्याही सुनेला आवडत नाही... काही स्त्रियांना आधी सासुरवास झालेला असतो. सुनेला सगळे सहजपणे मिळते याची असूया वाटते म्हणुन उगीचच सुनेचा द्वेष करते अणि इथेच चुकते...

सासूनी जर आलेल्या सुनेचं प्रेमाने स्वागत केलं... आपण आपल्या मुलीशी जसं वागतो तस वागण्याचा प्रयत्न केला आणि आपला मुलगा आहे म्हणुन दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात आली... तेव्हा मुलांच्या सुखात आपलं सुख आहे असा विचार केला आणि मुलगा आनंदी राहायला हवा असेल तर त्याची बायको आनंदी राहायलाच हवी... या दृष्टीने सुनेशी व्यवहार केला तर पुष्कळशे गैरसमज दूर होतील पण बऱ्याचशा सासूंना ते समजत नाही किंवा समजते पण उमजत नाही असच काहीस...

सासू ही आई होऊ शकत नाही... अणि व्हावी ही अपेक्षाच चुकीची... ती एक प्रेमळ, समजणार सासू जरी असली तर भरपूर आहे... सासू ही आई होऊ शकत नाही... अगदी बरोबर आहे... पण सुन तरी कुठे मुलगी होते... आपल्या आईसाठी ज्या भावना असतात, त्या सासुबाई साठी असतात का... आई साठी आपल्याला जे प्रेम, जिव्हाळा वाटतो तोच सासुबाई साठी असतो का?आपल्याला सासुबाई विषयी आई सारखेच प्रेम वाटवे ते शक्यच नाही कारण ती एक नैसर्गिक भावना आहे... पण आपल्या नवर्‍याची आई म्हणुन एक आदर, प्रेम, आपुलकी असायलाच हवी... आपल्या नवर्‍याने आपल्या आई वडीलाविषयी काही बोलले तर आपल्या किती मनाला लागते... परंतु कित्येक मुली सतत नवर्‍याला सासू चे गाऱ्हाणे सांगतात... (सर्वच नाही)त्याची पण ती आई असते... त्याला पण वाईट वाटत असणार ना?

सुनेला सासू बद्द्ल प्रेम वाटो अगर न वाटो पण सासू ला सुने बद्दल प्रेम वाटतेच, ती तुमच्या दृष्टीने कितीही दृष्ट असली तरी... कारण तिचे तिच्या मुलावर प्रेम असते... अणि मुलाची प्रतेक गोष्ट तिला प्रिय असते मग ती बायको असो किंवा नातवंडे... मुलाची बायको म्हणजे मुलाचे जीवन आहे ही जाणीव सासूला असते... कितीही मतभेद असले तरी सासूला सुने विषयी प्रेम असतेच... (अपवाद वगळता )

तसेच मुलीच्या संसारातील दुसरी खलनायिका म्हणजे नणंद... खरच नणंद इतकी वाईट असते... लहानपणापासून बहीण भाऊ एकत्र वाढतात... साहाजिकच लग्न झाले की भाऊ थोडा दुरावतो... काही बहिणी स्वतःहून संबध कमी करतात कारण बायकोला आवडत नाही... परंतु कधी कधी बहीण भावाचे प्रेम इतके असते... भाऊ बहिणीशी बोलल्या शिवाय राहू शकत नाही... अगदी लहानपणापासून बहिणीचा सल्ला घेत आलेला असतो... त्यामुळे लग्न झाल्यावर जर त्यानी ताई ताई केले तर मुलीला वाटते नणंद आमच्या संसारात हस्तक्षेप करते... अरे पण जन्मापासून चे नाते... दोन दिवसात तुटावे अशी अपेक्षाच का करावी...

नणंदेने पण आपली वाहिनी ही आपली मौत्रिण म्हणुन स्वागत कराव... आईच काही चुकत असल्यास तीला समजवावं... आणि भावाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी प्रयत्न करावा पण काही नणंदा स्वतःच्या संसारात सुखी नसतात, त्यांना सासुरवास असतो म्हणुन त्या वाहिनीचे सुख बघू शकत नाही आणि ती आईचे कान भरते आणि त्यामुळेच त्या दोघी खलनायिका ठरतात...

एक गोष्ट लक्षात घ्या आपली वहिनी आपला कितीही द्वेष करीत असली तरी आपल्याला आपल्या वहिनी बद्दल नणंदे पेक्षा जास्त प्रेम असते... ती कितीही वाईट वागली तरीही ... कारण ती आपल्या लाडक्या भावाची बायको असते... तसच आपल्या नणंदेला पण आपल्या बद्दल नक्कीच प्रेम वाटत असणार... अणि ही जगाची रीतच आहे अस मला वाटते...

मला वाटते प्रतेक नात्याचे आपले एक महत्व आहे... ते तसच ठेवून, कोणतेही नाते न तोडता, आपण आपले नवरा बायकोचे नाते अधिक मजबूत नाही करू शकत का??

तेव्हा सासू ही वाईट वागते त्यामागे तिचा दुष्टपणा नसून ती आपले आईपण सोडायला तयार नसते...तेव्हा सासू अणि नणंद या आपल्या संसारातील खलनायका नसून आपल्यावर प्रेम करणार्‍या दोन स्त्रिया आहेत...

प्रतेक गोष्टीला अपवाद असतो... जस कधी वडील पण वाईट असतात,, आई, बहीण, भाऊ पण भयंकर वाईट असतात त्याचप्रमाणे काही सासू अणि नणंदा वाईट असू शकते... म्हणुन सगळ्याच सासू अणि नणंदा खलनायिका असतात अस नव्हे...

यात मी सासू च्या कुठलीही वागण्याचे समर्थन करीत नाही... ती अशी का वागते याचे माझ्या दृष्टीने केलेले विश्लेषण आहे... तेव्हा कृपा करून सुनांनी पर्सनली घेऊ नये...मला माहिती आहे, तुम्हाला माझे पटणार नाही पण विचार करा... काही अंशी तरी खर असेल, नाही का? तुम्हाला काय वाटते?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News