परिघाबाहेरचे बालपण जगलेल्या न-नायकांच्या विजयकथा

डॉ. सुजाता शेणई
Saturday, 17 August 2019
  • दहापर्यंतचे पाढे न येणारी `सुनीता` शालान्त परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होते, पदवीधर होते.
  • नृत्यात प्रावीण्य मिळवून त्यातून श्रीलंका दौरा जेव्हा करून येते तेव्हा चिंचोळ्या खोलीतल्या त्या मुलीचे ते `हनुमान उड्डाण` आहे, असे रेणूताई नोंदवतात.

डॉ.अब्दुल कलाम यांनी मुलांना स्वप्न पाहण्यामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले होते की, ` स्वप्न विचारांमध्ये रूपांतरित होतात आणि विचार कृतीमध्ये..! जर स्वप्नंच नसतील तर आमूलाग्र किंवा क्रांतिकारी विचार निर्माणच होणार नाहीत मग कार्य कसे होणार ?` या शिकवणीची पुसटशीही कल्पना नसणारे, परिघातील सुंदर बालपणापासून वंचित असणारे आणि तरीही ही शिकवण प्रत्यक्षात आणून स्वतःची विजयकथा साकारणारे रेणू गावस्कर यांनी रंगवलेले `स्वप्नांचे शिलेदार` वाचकाला अंतर्मुख करतात. जवळपास चार दशके संघर्षपूर्ण बालपण असणा-या मुलांचे विश्व जवळून पाहणा-या आणि त्यांच्या उन्नतीसाठी निरपेक्ष काम करणा-या रेणूताई यांनी एकूण एकोणतीस नायकांची व्यक्तिचित्रे वजा वास्तव कथा `स्वप्नांचे शिलेदार` या पुस्तकात रेखाटल्या आहेत. हे नायक आज यशस्वी असतील, पण रेणूताईंना जेव्हा भेटले होते, तेव्हा ते प्रतिकूल परिस्थितीशी शब्दशः झगडत होते. वय आणि वाट्याला आलेली परिस्थिती यांची जमेल तशी सांगड घालत होते. 
      दहापर्यंतचे पाढे न येणारी `सुनीता` शालान्त परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होते, पदवीधर होते. नृत्यात प्रावीण्य मिळवून त्यातून श्रीलंका दौरा जेव्हा करून येते तेव्हा चिंचोळ्या खोलीतल्या त्या मुलीचे ते `हनुमान उड्डाण` आहे, असे रेणूताई नोंदवतात. व्यसनांच्या खाईत होरपळलेले घर, `आकांक्षा` म्हणावे की  `दुर्लक्षा` अशी जिच्या घरातली परिस्थिती, ती आपल्या मोठ्या बहिणीसाठी आणि कुटुंबासाठी स्वतःच्या सगळ्या इच्छा किती सहजतेने बाजूला सारते हे वाचून थक्क व्हायला होते. मुंबईत मंदिर-मस्जीद वादावरून उसळलेल्या दंगलीमुळे भयभीत झालेला इमरान आपली मूळ ओळख लपवून संतोष यादव या नावाने वावरतो. भोपाळला निघून जातो. धार्मिक हिंसेमुळे आयुष्यभरासाठी जपलेले स्वप्न धुळीला मिळते. कुसुम पदवीधर झाली तर तिची शादी होणार नाही म्हणून पदवीधर असा टिळा लागण्याआधी तिची शादी तिच्याच आतेभावाशी लावून देणारी असहाय आई व प्राप्त परिस्थिती स्वीकारून आपल्या मुलींना शिकवण्याचा चंग बांधणारी कुसुम वाचकांचे भावविश्व ढवळून टाकते. `मोहन`, `सुहानी`, `उमा`, `विकास`, `श्रीमंत`, `सुनील` किंवा `वैभव` यांच्या कहाण्या काही फार वेगळ्या नाहीत. वंचित मुलांची ही जीवनचरित्रे आहेत, पण त्यांच्याविषयी करुणा उत्पन्न व्हावी म्हणून किंवा वास्तवातील भेदक चित्र समाजातील सुस्थित लोकांना समजावे म्हणून याचे लेखन झालेले नाही, तर वाचकांच्या मनात या मुलांच्या प्रातिनिधिक रूपाने घर करावे आणि एका बालकेंद्रित युगाची पहाट व्हावी, सर्वांनीच समविचारांचे-कृतिशीलतेचे रिंगण धरावे अशी रेणूताईंना अपेक्षा आहे. 
         `जिंदगी में कोई कम नही/  कोई बेचारा नही ` हे आयुष्याचे तत्त्वज्ञान वेद मेहतांची पुस्तक वाचून स्वतःवर कोरणारा `मुन्ना`, दुर्दम्य आशावाद आणि जबर महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर कब़ड्डीत प्राण ओतून खेळाच्या जिवावर परिस्थितीला पालटवणारी `मित्रा`, गिरणी कामगार ते गिरणी मालकापर्यंत मजल मारलेला `मोहन`, चित्रकलेची आवड जोपासणारा `नकुल` आणि दुस-या तरुण मुलींना आयुष्यात उभे करण्यासाठी धडपड करणारी `छाया`, या सा-या व्यक्तिचित्रांचा समान धागा म्हणजे शाळेतल्या मधल्या सुट्टीतला डब्बा आणि हुंद़डणे यापासून वंचित असणारी ही मुले आहेत. या मुलांच्या वाट्याला आलेल्या परिस्थितीला त्यांचे कुटुंब जेवढे जबाबदार तेवढीच बाह्य परिस्थितीही जबाबदार असते, असे रेणूताई त्यांच्या अनुभवातून मांडतात. समाजाच्या उभारणीत मुलांच्या निकोप वाढीला सर्वांधिक महत्त्व असते, हेच मोठी माणसे विसरतात. त्यांच्या विसरण्याची फार मोठी किंमत या लहानांना भोगावी लागते याचे वैषम्य या पुस्तकातून डोकावत राहते.
        रेणूताईंना भेटलेली ही मुले समाजाच्या वंचित मुलांचे प्रश्न आपल्यासमोर उभे करतात. प्रश्न आहे तो आपण या प्रश्नांचे काय करणार? रेणूताई त्या व्यक्तिरेखा त्याच्या बोलक्या चेह-यांसह, गुणस्वभांवासह आणि आंतरिक भाव-भावनांच्या वैशिष्ट्यांसह सहजतेने उभ्या करतात, म्हणून छोटेखानी असलेली ही व्यक्तिचित्रे वाचकांशीही संवाद साधतात. अकृत्रिम भाषाशैली आणि उत्कट संवेदनशीलता लाभलेल्या या पुस्तकामुळे वाचकाच्या सीमित अवकाशाला छेद तर जातोच पण सुखद भावनांचा तळही ढवळून निघतो. सामान्य माणसाला  स्वतःच्या आयुष्याचा विचार करण्यास प्रवृत्त करणा-या या नायकांचा हा यशाचा प्रवास नाही तर आत्मविश्वासाचा प्रवास आहे. आत्मविश्वास हेच या नायकांचे परजलेले अस्त्र आहे .रेणूताईंना ही मुलेच राष्ट्रपित्याचे `श्रद्धा होना` हे शब्द अधिक अर्थपूर्ण बनवतील असा विश्वास वाटतो, हेच या पुस्तकाचे यश आहे.
     `हरणा-या न-नायकांच्या विजयकथा` ही हेरंब कुलकर्णी यांची विचारपूर्ण प्रस्तावना, संदीप देशपांडे यांचे मुखपृष्ठ आणि रेणूताईंचे विचारगर्भ मनोगत यामुळे पुस्तकाची उंची वाढली आहे. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित करून समाजाप्रति असलेली बांधिलकी जपली आहे. 

स्वप्नांचे शिलेदार
रेणू गावस्कर
सकाळ प्रकाशन
पृष्ठ 143, मूल्य 180 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News