विधानसभेचे वारे घुमू लागले; नेत्यांच्या फोडाफोडीला वेग

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Sunday, 18 August 2019

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेने मोठा धक्‍का दिला आहे. खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हा सरचिटणीस रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई : राज्यातील पूरपरिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली असताना आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही काँग्रेसमध्ये पुन्हा गळती सुरू झाली असून, रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यादरम्यान, माजी मंत्री राजेश टोपे यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेतली असताना काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. 

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेने मोठा धक्‍का दिला आहे. खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हा सरचिटणीस रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. विकास हवा असेल तर शिवसेना- भाजप युतीशिवाय पर्याय नसल्याचे पक्षप्रवेशानंतर देशमुख म्हणाले.

दरम्यान, काल नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महाले यांनी 'मातोश्री'वर शिवबंधन बांधले. महाले हे राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे होते. तत्पूर्वी महाले हे शिवसेनेत होते. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील माढा राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि त्यांचे बंधू माढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार संजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पूरग्रस्तांसाठीचा निधी त्यांच्याकडे सुपूर्द केला. आगामी विधानसभा निवडणुकीत माढा आणि करमाळा मतदारसंघातून शिंदे बंधू भाजपच्या जवळ असल्याची चर्चा सुरू आहे. 

मोहिते पाटील-टोपे यांच्या भेटीने खळबळ 
राष्ट्रवादीपासून दुरावत भाजपशी जवळीक साधलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते, माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी बंद खोलीत चर्चा केली. विजयसिंह मोहिते-पाटील हे आज अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी आले होते. योगायोगाने याचवेळी राजेश टोपे हे देखील सपत्नीक दर्शनासाठी आले होते. कॉंग्रेसच्या आमदार निर्मला गावितदेखील शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News