एसटी प्रवासातील हुल्लडबाजी युवकांच्या अंगलट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
  • एसटी प्रवासातील हुल्लडबाजी महाविद्यालयीन युवकांच्या चांगलीच अंगलट आली. सातारा शहर पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाने साध्या वेशात प्रवास करत या युवकांना थेट पोलिस ठाण्याचा रस्ता दाखविला.
  • सातार्यातील निर्भया पथकाने साध्या वेशात प्रवास करत केली कारवाई 

सातारा: तुकाईवाडी एसटीत आज (सोमवारी) सकाळी हा प्रकार घडला. गेले काही दिवसांपासून ही एसटी चर्चेचा विषय बनली होती. सातारा, नागठाणे येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या युवतींची या एसटीत लक्षणीय संख्या असते. काही विशिष्ट युवकांकडून त्यांना सातत्याने त्रास देणे सुरु होते. एसटीतील प्रवाशांनाही त्याची झळ सहन करावी लागत होती.

वाहकांशीही युवक उद्धट पद्धतीने वर्तन करत असत. त्यातून अनेकदा बोरगाव पोलिस ठाण्यापर्यंत एसटी आणण्याचा प्रकारही झाला. मात्र पालकांचे दुर्लक्ष, राजकीय फोनाफोनी यामुळे कारवाई होत नव्हती. त्यामुळे संबंधित युवकांचे चांगलेच फावले होते.

या पार्श्वभूमीवर, आज सकाळी अचानकपणे सातारा येथील निर्भया पथक साध्या वेशात या एसटीत बसली. जावळवाडी फाट्यापर्यंत प्रवास करत त्यांनी संबंधित युवकांवर बारकाईने लक्ष ठेवले. त्यात पाच अल्पवयीन युवक पथकाच्या हाती सापडले. त्यांना पथकाने ताब्यात घेऊन बोरगाव पोलिस ठाण्याचा रस्ता दाखविला.

तिथे संबधितांच्या पालकांना बोलावून बाँम्बे पोलिस ऍक्टप्रमाणे कारवाई करून समज देण्यात आली. या कारवाईत सातारा शहर निर्भया पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, महिला पोलिस रेश्मा सोनावणे, पोलिस कर्मचारी आकाश दळवी, अमित साळुंखे व वैभव डांगरे यांनी भाग घेतला.

निर्भया पथकाने केलेल्या या कारवाईचे परिसरातून स्वागत होत आहे. नागठाण्यातील महाविद्यालयात शिकण्यासाठी येणाऱ्या युवतींची संख्या मोठी आहे. कित्येक समस्यांशी मुकाबला करत त्यांचे शिकणे सुरु असते. अशा स्थितीत या कारवाईमुळे योग्य संदेश जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News