जम्मू-काश्‍मीरच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्र भारताच्या पाठीशी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019
  • काश्‍मीरचा प्रश्‍न द्विपक्षीय असल्याचे प्रतिपादन
  • इम्रान यांची ट्रम्प यांच्याशी चर्चा 
  • दहशतवाद थांबविला तरच पाकशी चर्चा !

 

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांमध्ये जम्मू-काश्‍मीरच्या मुद्द्यावर बोलविलेल्या बैठकीत भारताचा जुना मित्र रशिया पुन्हा एकदा पाठिशी उभा राहिला. जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न हा द्विपक्षीय असल्याचे सांगत चीनच्या भूमिकेला रशियाने विरोध केला. 

जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने कांगावा सुरू केला होता. तसेच या मुद्द्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनच्या अध्यक्षांशीही चर्चा केली होती. त्यानंतर चीनने हा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित केला होता.

त्याअनुसार आज संयुक्तराष्ट्रांमध्ये सुरक्षा समितीची बैठक बोलावण्यात आली होती. ही चर्चा बंद दाराआड झाली. या बैठकीला अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स हे पाच कायम सदस्य आणि बेल्जियम, आयव्हरी कोट, डॉमेनिक प्रजासत्ताक, इक्वेटोरियल गुएनी, जर्मनी, इंडोनेशिया, कुवेत, पेरू, पोलंड आणि द. आफ्रिका हे १० अस्थायी सदस्य उपस्थित होते. भारत आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नव्हते. या चर्चेची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही. 

बैठकीमध्ये चीनने पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळत जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. काश्‍मीरमधील स्थिती तणावपूर्व आणि धोकादायक आहे. भारताने एकतर्फी कोणतीही कारवाई करू नये, असा पवित्रा चीनने घेतला होता. बैठक संपल्यानंतर लगेचच चीनच्या राजदूतांनी हेच मुद्दे पुन्हा एकदा पत्रकारांशी बोलताना मांडले. 

भारताचा जुना मित्र पुन्हा एकदा भारताच्या पाठिशी उभा राहिला व चीनचे सर्व मुद्दे खोडून काढत जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न द्विपक्षीय असल्याचे स्पष्ट केले. रशियाचे प्रतिनिधी दिमित्री पोलयान्स्की याबाबत म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न द्विपक्षीय आहे, या आमच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही. आज केवळ परिस्थिती व एकमेकांची मते समजून घेण्यासाठी बैठक होती. ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे.’’ 

इम्रान यांची ट्रम्प यांच्याशी चर्चा 
इस्लामाबाद : जम्मू-काश्‍मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयामध्ये सुरक्षा परिषदेच्या झालेल्या बैठकीत याच विषयावर मंथन झाले, या अनुषंगाने इम्रान खान यांनी ट्रम्प यांना विश्‍वासात घेतल्याचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले. या वेळी इम्रान यांनी काश्‍मीरमधील घडामोडींच्या अनुषंगाने चिंता व्यक्त करत हे सगळे प्रादेशिक शांततेला धोकादायक असल्याचे मत मांडल्याचे कुरेशी यांनी सांगितले. 

दहशतवाद थांबविला तरच पाकशी चर्चा !
पाकिस्तानने दहशतवाद थांबविला तर त्यांच्याशी द्विपक्षीय प्रश्‍नांवर चर्चा सुरू करण्यात येईल, असे भारताने आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांमध्ये जम्मू-काश्‍मीर विषयक आयोजित बंद दार बैठकीनंतर भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायम प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पत्रकार परिषदेत भारताची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. तेथील जनतेच्या हितासाठी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारने निर्णय घेतले आहेत. त्याचे कोणतेही विपरित परिणाम झालेले नाहीत.’’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News