९ ऑगस्टला होणार 'ईव्हीएम हटाओ जनआंदोलन'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 July 2019
  • निवडणुकांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या म्हणजे ईव्हीएमच्या वापराविरोधात आंदोलन
  • ९ ऑगस्टला देशभर सर्व विरोधक सहभागी होणार

मुंबई : निवडणुकांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या म्हणजे ईव्हीएमच्या वापराविरोधात येत्या ९ ऑगस्ट रोजी देशपातळीवर विविध संघटना, राजकीय पक्ष जनआंदोलन उभारणार आहेत. राज्यातही प्रमुख विरोधी पक्षांसह सुमारे ३०० विविध संघटना आंदोलनात सहभागी होणार आहेत.

ईव्हीएममध्ये गैरप्रकार होत असल्याने निवडणुका मतपत्रिकेच्या माध्यमातूनच घ्याव्यात, अशी देशभरातील विरोधी पक्षांची मागणी आहे. ईव्हीएममध्ये फेरफार होत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या आहेत. तसेच विविध ठिकाणी जनआंदोलनेदेखील करण्यात आली आहेत. याचाच एक भाग म्हणून येत्या ९ ऑगस्ट रोजी ‘भारत छोडो दिनाचे’ औचित्य साधून हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

ऑगस्ट क्रांती मैदान ते चैत्यभूमी असा मुंबईत लाँग मार्च काढण्यात येणार आहे. यामध्ये आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित विकास आघाडी या राजकीय पक्षांसह विविध छोटे पक्ष, आदिवासी लोकसंघर्ष मोर्चा, ठाणे मतदार अभियान, अनहद संघटना, भारत बचाव आंदोलन आणि ३०० संघटना सामील होणार आहेत.

या वेळी ईव्हीएमच्या प्रतिकृतीचे दहन केले जाणार आहे. तसेच ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्यासाठी www.evmhatao.org  हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन आपचे दिनेश शिंदे, तसेच लोकांचे दोस्त या संघटनेचे रवी भिलाणे यांनी केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News